गणपती
गणपती ' गणानाम् अधिपती इति गणपती | ' अशी संस्कृत व्याख्या असणाऱ्या गणपती या शब्दाचा मराठी अर्थ " गणांचा अधिपती " असा होतो. शिव आणि पार्वतीचा पुत्र अशी लोकप्रिय प्रतिमा असलेल्या या देवतेने हिंदू धर्मात इष्टपुजेचे स्थान मिळवले आहे. हिंदू धर्मातील त्याला मिळालेल्या आद्य पुजेच्या बहुमानावरुन त्याची लोकप्रियता लक्षात येते. पण मुर्तीशास्त्र आणि अभ्यासक यांच्या मते गणपती हि यक्ष देवता आहे. गणपतीचे मुळ स्वरुप हे 'विघ्नकर्ता' या रुपात असून काळानुरूप गाणपत्य संप्रदायाकडून त्याचे विघ्नहर्ता असे रुपांतरण केले गेले. हिंदूंच्या पाच प्राचीन प्रमुख संप्रदायांत ह्या गाणपत्य संप्रदायाचा अंतर्भाव होतो. गणपती हे प्रमुख उपास्य दैवत असणाऱ्या हिंदूंच्या एका संप्रदायास ' गाणपत्य संप्रदाय ' ही संज्ञा असून ह्या संप्रदायाच्या अनुयायांना ‘ गाणपत्य ’ म्हणतात. इसवी सनाच्या पाचव्या ते नवव्या शतकांच्या दरम्यान केव्हा तरी हा संप्रदाय उदयास आला असावा, असे रा. गो. भांडारकरांचे मत आहे. ह्याच कालखंडात रचलेल्या भवभूत...