क्षेत्र महाबळेश्वर
प्राचिन ते अर्वाचीन इतिहास आणि संस्कृतीच्या खुणा जपणारे श्री क्षेत्र महाबळेश्वर... क्षेत्र महाबळेश्वर महाबळेश्वर या सर्वश्रुत पर्यटनस्थळातील सर्वात सुंदर ठिकाण कोणते असेल तर ते क्षेत्र महाबळेश्वर (Old Mahableshawar).. इंग्रजांच्या सांस्कृतीक अतिक्रमणापासून अंतर राखून राहिलेले भारतीय इतिहासातील महत्त्वाचे ठिकाण ! स्कंद पुराणातील सह्याद्री खंडावर आधारित ' श्री कृष्णामाई महात्म्य ' व ' महाबळेश्वर (स्थळ) महात्म्य ' या ग्रंथांमध्ये महाबळेश्वर क्षेत्राची व पंचगंगा मंदिराची माहिती मिळते. 'महाबळेश्वर' या स्वयंभू शिवलिंगामुळे या ठिकाणास महाबळेश्वर हे नाव प्राप्त झाले असावे. शिवरुप महाबळेश्वर, विष्णुरुप अतिबळेश्वर, ब्रह्मरुप कोटेश्वर अशी शिवालये एकमेकाशेजारी आहेत. या तिन्ही मंदिरांची निर्मिती महाराष्ट्रात एकछत्री अंमल गाजवणारे देवगिरीचे सम्राट सिंघण देव (द्वितीय) यांनी इ.स. १२१५ मध्ये केली. पुढे याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी जानेवारी १६६२ मध्ये सोनोपंत डबीर यांचेकरवी जिजाऊ आईसाहेबांची सुवर्णतुला करुन फार मोठा ...