भार्गवराम परशुराम आणि परसबाळ
भार्गवराम, परशूराम आणि परसबाळ ( #परशुराम #Parshuram ) भार्गव अर्थात महर्षी भृगू यांचे वंशज. आचार्य श्रेष्ठ भृगू आणि त्यांच्या वंशजांना अग्नीचे उपासक मानले जाते. आचार्य भृगुऋषी आणि त्यांच्या वंशजांनी आजच्या भडौच अर्थात खम्भातच्या खाडीवर राज्य केले, यामुळे हा परिसर भृगू-कच्छ या नावाने ओळखला जाऊ लागला. (ऋग्वेद 8-10-2-4 , तैत्तरेय संहिता 7-1-8-1, पंच ब्राह्मण 21-10-6, विष्णुधर्म 1-32 तसेच महाभारत अनु. 56) पुढे भडौचचा भूतपूर्व राजा शर्याती याची पुत्री "सुकन्या " हिचा विवाह भृगूपुत्र "महर्षी च्यवन " यांच्याशी लावून दिला गेला. यानंतर भार्गव वंशीय लोक संपूर्ण भारतभर विखूरले गेले आणि याच वंशात ऋषी जमदग्नी पोटी "राम" यांचा जन्म झाला. भार्गव (भृगू) वंशीय असल्याने भार्गवराम हे नाव त्याला प्राप्त झाले. ऋषी ऋचीक यांचे पुत्र ऋषी जमदग्नी आणि रेणू राजाची कन्या रेणूका यांच्या पोटी जन्म झालेल्या रामाने तपश्चर्येने भगवान शिवाकडून एक परशू (कुऱ्हाड) प्राप्त केली आणि यावरुनच त्याला परश...