काय आहे कृष्णा, कऱ्हा, खंडोबा आणि सिद्धनाथ यांचे परस्परांशी नाते..


कृष्णा कोयनेचं.... चांगभलं...

भुईंज.. "या पवित्र गावात माझा जन्म झाला हे माझ्या अनेको जन्मांचे पुण्य असावे" हे मला खरे वाटू लागले आहे. अनादी काळापासून अस्तित्वात असलेल्या या नगरीचा धार्मिक, अध्यात्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा खूप मोठा आहे. याच्या जितके खोलात जाऊ तितक्याच नवीन गोष्टी हाताशी लागताहेत..


        अशीच एक पिठ्यांपिठ्या चालत आलेली परंपरा म्हणजे "सिद्धनाथाचे कृष्णा स्नान". तसे पाहता भुईंज क्षेत्राचा सिद्धनाथाशी दूराण्वये काही संबंध नाही. पण अगदी फलटण तालुक्यातील "काळज" पासून ते दौंड तालुक्यातील "यवत" (जि.पुणे) इ. ठिकाणचे सिद्धनाथ दैवत असणारे गावकरी श्रावणातील पौर्णिमेआधी भुईंजला कृष्णामाईचे जल घ्यायला येतात. (विशेष म्हणजे कृष्णेचे हे पाणी फक्त भुईंज मधूनच नेले जाते)

             सिद्धनाथ ग्रामदैवत असलेल्या गावांतील तरुण १००-१२५ कि.मी. ची पायी दौड करत भुईंज मध्ये येतात. पावसाळ्यात उफाळणाऱ्या कृष्णेचे पात्र पौर्णिमेपर्यंत कमी झाले असले तरी पाण्याला भरपूर ओढ असते. या उफाणत्या पाण्यात पटापट डुबक्या घेऊन घाटाच्या दोन तीन पायऱ्या धुवत हे तरुण तिथे हळदी कुंकू व्हायला सुरुवात करतात. कापूर, उदबत्त्या लावत नारळ फोडतात. मग त्यातले जाणते तरुण पुढे होत नागवेलीच्या (खाऊच्या) पानावर कापूर पेटवून "कृष्णा कोयनेचं... चांगभले..." म्हणत तो पाण्यात सोडतात. (सर्वांनी एकत्र मिळून कापूर सोडला तरच तो पुढे जातो असे म्हणतात आणि याचे प्रात्यक्षिक सुद्धा आम्ही बघितले) बरोबर आणलेल्या कळश्या, घागरी, किटल्या बुडबुड करत पाण्याने भरुन घेतात.


             मग पुन्हा "कृष्णा कोयनेचं... चांगभलं.." म्हणत हे तरुण परतीच्या वाटेला लागतात. वाटेत कुठेही पाणी खाली ठेवायचे नाही हा नियम असतो. वाटेत हे कृष्णेचे थोडे पाणी जेजुरीला खंडोबाला घालतात आणि "कऱ्हेत" पुन्हा घागरी भरुन आपापल्या गावातील सिद्धनाथाला राखी पौर्णिमेदिवशी "कृष्णा-कऱ्हेचा" जलाभिषेक घालतात.

            धनगरवाडीचा खंडोबा, मालदेववाडीचा मालोबा, बदेवाडीची पद्मावती असे बारा वाड्यांतील देव पालखीत बसून कृष्णेत अंघोळीला येतात. हर बोला हर, चांगभलं, उदोउदो, येळकोटचा गजर करत नाव्हाळीतून आमच्या वाड्याकडे येणाऱ्या पालख्यांना खांदे देऊन पुजा करणे आणि मग आडावर विसाव्यासाठी थांबलेले देव आम्हाला नित्याचेच आहेत. हि सर्व संस्कृती काळाच्या ओघात बदलत चालली असली तरी आजही तग धरून आहे.


✍️ स्वप्नील महेंद्र जाधवराव.
#रणमस्तबहाद्दर

Comments

Post a Comment