संजीवन गुप्तहेर ०३


संजीवन गुप्तहेर
०३


बृहस्पतींचे निर्वाणीचे शब्द ऐकून कच घामाने डबडबून गेला. 'राक्षस म्हणजे आक्राळ विक्राळ देहाचे कुरुप आणि निर्दयी लोक असतात, ते देवता, मानव व ऋषीगणांवर फक्त अत्याचार करतात' अशाच कथा लहानपणापासून कचने ऐकलेल्या होत्या. त्यामुळे राक्षसांचे गुरु शुक्र देखील तसेच असतील या विचाराने कचच्या पुर्ण शरीराला कापरे भरले होते. तो अक्षरशः थरथरत होता. बृहस्पतींनी कचच्या खांद्याला धरुन त्याला आपल्या पाया जवळून उठवून आपल्या शेजारी बसवले. आपल्या उपरण्याने त्याच्या चेहऱ्यावर फुटलेला घाम टिपला. आणि बोलू लागले..

                "बाळ कच, घाबरु नकोस.. शुक्र माझा बालपणीचा सवंगडी आहे. तो फारच मायाळू आणि शांत मनाचा व्यक्ती आहे. पण तो जितका शांत तितकाच महत्त्वकांक्षी आहे. आपले इप्सित साध्य करण्यासाठी तो जिवाचे रान करतो. त्याची संजीवनी विद्या प्राप्त करण्याची मेहनत पाहून जगाला त्याच्या ध्येयवेडेपणाचे दर्शन घडलेच आहे. त्याच्या आश्रमात तुला कोणताच धोका उद्भवणार नाही.." हे धीराचे शब्द ऐकून कचच्या जीवात जीव आला. 

               बृहस्पती एक‌एक करुन आपल्या योजना कच ला सांगू लागले. कच संजीवनी विद्येच्या अपेक्षेने त्यांच्याकडे आलाय हे जर शुक्राचार्यांने समजले तर ते कधीच त्याला ती प्राप्त होऊ देणार नाहीत हे निश्चित होते. त्यामुळे कचला हि विद्या छळानेच मिळवावी लागणार होती. पण कचला हा अधर्म वाटत होता‌, आणि हा अधर्म करायला त्याचे मन धजावत नव्हते. आपल्या पित्याबद्दल एक अनीतीची भावना त्याच्या मनात आली. आपले पिता देवगुरु असूनही का आपल्याला हा अधर्म करायला सांगत आहेत.. या विचाराने तो संभ्रमित झाला होता..

                 कचला भानावर आणत बृहस्पती म्हणाले "कच माझ्या आणि शुक्रच्या रक्ताच्या थारोळ्यातील त्या शेवटच्या भेटीनंतर शुक्र जणू गायबच झाला. कितीतरी वर्ष त्याची खबर कोणालाच नव्हती. गुरुच्या अनुपस्थित 'आपल्यावर नजर ठेवून असणाऱ्या गरुडाला घाबरून ज्या प्रमाणे सर्प त्याचे बीळ सोडत नाही' तसेच राक्षस देखील कोणतीच कुरघोडी करत नव्हते. 'हि वादळापूर्वीची शांतता आहे' याची कल्पना मी देवराज इंद्राला दिली होती पण नेहमीप्रमाणे त्याने याकडे दुर्लक्षच केले. जेव्हा शुक्र विद्या प्राप्त करुन माघारी आला तेव्हा एक महाभयंकर वादळ त्याच्या कवेत होते आणि हे वादळ जर शुक्र ने मुक्त केले तर त्यात देवता पाचोळ्या प्रमाणे उडून जाणार हे नक्की.. त्यामुळे राक्षसांनी देवतांच्या विरोधात युद्ध पुकारायच्या आधीच काहीही करुन मला ती संजीवनी विद्या शुक्र कडून मिळवणे अतिशय आवश्यक आहे. यासाठी धर्म-अधर्म बाजूला सारून कोणत्याही मार्गाने एक निष्णात गुप्तहेर बनून तू ती विद्या प्राप्त कर" 

                खरं तर गुप्तहेर म्हणजे काय हे देखील कच ला माहिती नव्हते. 'कोणालाही न समजता (गुप्तपणे) एखादी माहिती काढून आणणारा' एवढाच काय तो त्याने शब्दशः त्याचा अर्थ लावला होता. बृहस्पती आता त्यांची मुख्य योजना कच ला सांगत होते. त्यांची योजना ऐकताच कच ताडकन उठला "काय..? मी हे कदापि करु शकत नाही.. हा अधर्म आहे.. बाबा.." "कच.. एका गुप्तहेराच्या आयुष्यात धर्म आणि अधर्म या गोष्टींना कोणतीच जागा नाही.. त्याच्या योजनेची पूर्तता हाच त्याचा धर्म आहे..!" बृहस्पती दटावणीच्या स्वरात बोलत होते. कच खाली मान घालून आपल्या प्रश्नांचे वावटळ मनातच दाबत होता.  

           "कच.. उद्या पहिल्या प्रहरी दक्षिणेकडे मार्गस्थ हो.." असं म्हणत बृहस्पती आश्रमाकडे जायला निघाले. दोघा पिता पुत्रांच्या संभाषणात उगवतीचा सुर्य मावळतीकडे झुकला होता. मावळत्या सूर्याला पाहत कच स्वत:ला सावरत उद्यासाठी तयार करत होता. 


              पहिल्या प्रहरीच आपल्या पित्याचा आशिर्वाद घेऊन कच दक्षिणेकडे मार्गस्थ झाला होता. चंद्रवंशी आणि भार्गव राजांची राज्य पायाखाली तुडवत कच आता राक्षसांच्या राज्य सीमेवर आला होता. संपुर्ण मार्गात दक्षिणेतील ओबडधोबड डोंगररांगा, वनराई, पशु-पक्षी, नुसत्या दर्शनाने मनाला आनंद देणारी पण त्याहूनही जास्त सुगंधी पुष्प संपदा, खळखळून वाहणाऱ्या नद्या या गोष्टींनी कच वर मोहिनी घातली होती. काही काळासाठी आपण राक्षस राज्यात आहोत की स्वर्गात याचाच त्याला विसर पडला. तेव्हड्यात सिंहाच्या एका कर्णकर्कश डरकाळी सोबत तो भानावर आला. राक्षसांच्या राज्यात जायचे या विचारानेच तो पुरता घाबरला होता. पण शुक्राचार्यांचा आश्रम देखील याच घनदाट अरण्यात होता. संपुर्ण शरीराचे डोळे करुन दाही दिशा न्याहाळत कच अंग चोरुन त्या अरण्य वाटेतून मार्ग शोधत होता...
               
क्रमशः
रणमस्तबहाद्दर
                                   ✍️ स्वप्नील महेंद्र जाधवराव.


भाग ०२ : 

भाग ०४ : 
https://swapnsutra.blogspot.com/2020/05/blog-post_28.html




Comments

  1. khup sunder sawpnil pudhil bhaagachi utsukta..

    ReplyDelete
  2. मस्तच रे 👌👌

    ReplyDelete
  3. खऱ्या अर्थानं मूळ उद्देशाकडे प्रस्थान झालं म्हणायचं पुढे अजून मजा येईल....

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

हैबतबाबा पवार आरफळकर

शेखमिरा संस्थान

गावकुसावरील देवता