छत्रपती गादी
छत्रपती गादी
भाग ४ (अंतिम)
इकडे सातारच्या दोन्ही छत्रपतींना १८५७ च्या उठावात सहभागी असल्याने कराची व अहमदनगर येथे नजरकैदेत ठेवले होते. पैकी छत्रपती प्रतापसिंहाचे दत्तकपुत्र तिसरे शाहू उर्फ जंगली महाराजांना जुलै १८५८ ला सोडण्यात आले. पुढे ते पुणे येथे भवानी पेठेत राहू लागले तिथेच १ जून १८९२ रोजी त्यांचे निधन झाले.
तर छत्रपती शहाजी उर्फ आप्पासाहेब महाराजांचे दत्तकपुत्र छत्रपती व्यंकोजीराजे हे देखील कैदेतून सुटून साताऱ्यात आले. व्यंकोजीराजे हे शिवरायांचे चुलते शरीफजीराजे यांच्या वंशातील असले तरी ते सामान्य कुटुंबातील म्हणून तत्कालीन रेसिडेन्ट फ्रेयर याने आक्षेप घेतला होता, त्यामुळे छ. आप्पासाहेबांनी त्यांच्या कुटुंबास १८४३ मध्ये 'राजाज्ञा' पदवी बहाल केली होती. भूतपूर्व छत्रपती शहाजी उर्फ आप्पासाहेबांच्या तिन्ही राणीसाहेब व इंग्रजांनी छत्रपती व्यंकोजीराजेंना छत्रपतींच्या सर्व संपत्ती, अधिकार व बिरुदावल्यांचे वारस म्हणून घोषित केले होते. (तथापि छत्रपतींची बहुतांश स्थावर मालमत्ता इंग्रजांनी जप्त करुन घेतली होती.) छत्रपती व्यंकोजीराजेंचे २३ डिसेंबर १८६४ रोजी निपुत्रिकच निधन झाले.
यामुळे आप्पासाहेब छत्रपतींच्या थोरल्या राणीसाहेब सगुणाबाई यांनी १८ मे १८६५ रोजी शेडगावकर भोसले घराण्यातील मुलगा दत्तक घेऊन त्यांना छत्रपती राजाराम तिसरे उर्फ बाळासाहेब महाराज नावे गादीवर बसवले. सगुणाबाई आईसाहेबांनी छत्रपती घराण्याची स्थावर मालमत्ता कंपनी सरकारने ताब्यात घेतलेली असल्याने १८७४ रोजी त्याविरुद्ध अपिल केले पण त्याचा फायदा झाला नाही. त्यांच्या मृत्यूपश्चात छत्रपती कुटुंबास नवा राजवाडा सोडून जलमंदिर वाडा व सुरुचा (सुरुची) वाडा येथे रहायला जाणे भाग पडले. (नवा राजवाडा आजही सरकारजमाच आहे.)
छत्रपती राजाराम तिसरे यांस इंग्रज सरकारने दक्षिणेतील प्रथम श्रेणीचे सरदार असा किताब दिला होता. त्यांच्यानंतर त्यांचे थोरले सुपुत्र शिवाजीराजे तिसरे हे छत्रपती झाले. ५ नोव्हेंबर १८१४ रोजी छ. शिवाजीराजेंच्या मृत्यूनंतर त्यांचे धाकटे बंधू प्रतापसिंह दुसरे उर्फ भाऊसाहेब महाराज सातारा छत्रपती गादीवर आले. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी ताराबाईंनी शेडगावकर भोसले घराण्यातून मुलगा दत्तक घेऊन त्यांचे छत्रपती चौथे शाहू असे नामकरण केले.
या छत्रपती शाहूराजे चौथे यांनी दुसऱ्या महायुद्धात प्रत्यक्ष सहभाग घेतला होता. त्यांना शिकारीची आवड होती. १९५० साली शिकारीस गेले असताना जंगलात त्यांचा अपघाती मृत्यू झाला. धारच्या पवार घराण्यातील त्यांच्या राणीसाहेब राजमाता सुमित्राराजे या सातारकर छत्रपती घराण्यास ऊर्जितावस्था प्राप्त करुन देणाऱ्या ठरल्या. सातारकर छत्रपती घराण्याची आजमितीस असलेली आर्थिक व सामाजिक प्रतिष्ठा ही फक्त आईसाहेबांची देण आहे. या उभयतांस प्रतापसिंहराजे (तिसरे), अभयसिंहराजे, विजयसिंहराजे व शिवाजीराजे (चौथे) असे चार पुत्र होते.
छत्रपती प्रतापसिंह तिसरे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी कल्पनाराजे व पुत्र उदयनराजे यांच्यासह अभयसिंहराजेंचे वैमनस्य झाले. बाबासाहेब पुरंदरे यांना हाताशी धरुन मुद्दामहून 'थेट वंशज' अशा केलेल्या हेतूपुरस्सर प्रचाराने सर्वच कुटुंबात आणखी कलह वाढून सर्वांनीच नावापुढे छत्रपती महाराज पदवी लावण्यास सुरुवात केली. छत्रपती अभयसिंहराजेंनी घराण्यास पुन्हा राजकीय उंची मिळवून दिली.
आजमितीस छत्रपती उदयनराजे खासदार असून जलमंदिर राजवाड्यात राहतात, त्यांस युवराज वीरप्रतापसिंहराजे नावाचे चिरंजीव आहेत. छत्रपती शिवेंद्रसिंहराजे उर्फ बाबामहाराज सार्वजनिक बांधकाम मंत्री असून ते सुरुचा (सुरुची) वाडा येथे राहतात, त्यांस युवराज रुद्रनीलसिंहराजे नावाचे सुपुत्र आहेत. तर छत्रपती विजयसिंहराजेंचे पुत्र छत्रपती विक्रमसिंहराजे अदालतवाडा येथे राहतात.
![]() |
| छत्रपतींचा नवा राजवाडा, सातारा |
राजर्षी शाहूपुत्र छत्रपती राजाराम दुसरे यांच्या मृत्यूनंतरच करवीर गादीच्या वारसाचा गदारोळ माजला होता. राजाराम महाराजांना प्रिन्सेस पद्माराजे ह्या एकुलत्या एक कन्या होत्या आणि त्यांनाच नंतर गादीवर बसवण्यात यावे याबद्दल राजारामांच्या थोरल्या पत्नी ताराराजे प्रयत्न करत होत्या. पण व्हायसरॉय लिनलिथगो याने मराठमंडळात स्त्रीच्या राज्यपदाची चाल नाही असे सांगून हा प्रस्ताव फेटाळून लावला. यावर उपाय म्हणून राजा असा निवडावा की ज्याचे पद्माराजेंशी लग्न लावून देता येईल व त्याच कोल्हापूरच्या महाराणी बनतील अशी मसलत ठरली. ताराराजेंनी पत्राद्वारे आपली पहिली पसंती आपले भाचे बडोद्याचे राजकुमार रणजितसिंह गायकवाड यांना दिली.
इकडे राजर्षी शाहूराजेंच्या पत्नी लक्ष्मीबाई साहेबांनी डिसेंबर १९४० च्या बैठकीनंतर इंग्रजांना लिहिलेल्या पत्रात आपली थोरली मुलगी राधाबाई आक्कासाहेब यांचा मुलगा महाराज विक्रमसिंह पवार यांस दत्तक घ्यावे, राजारामांचे देखील त्यावर खूप प्रेम होते असे स्पष्ट लिहिले होते. असा दत्तक प्रकार यापूर्वीही कोल्हापूर घराण्यात झाल्याचे देखील सर्वज्ञात होते. पण ही सुरुवातीपासून आपल्या सासुबाईंचीच इच्छा आहे व आपल्या पतीस असे वाटतच नव्हते असे सांगून ताराराजेंनी त्यास विरोध केला.
विशेष म्हणजे सर्वानुमते कागलकर घाटगेंचे मुल दत्तक घेण्यास ठाम विरोध होता. घाटग्यांचा राज्यकारभारात अवाजवी हस्तक्षेप होत असल्याने राजर्षी शाहू, राजारामराजे व राणीवसा या सर्वांनी एकमुखाने यास विरोध केला होता.
भोसले कुळातीलच कुणीतरी दत्तक घ्यावा म्हणून व्हायरसरॉय आग्रही होता. त्याने सातारा छत्रपतींचे नवजात वारस प्रतापसिंह तिसरे यांना दत्तक घेण्याचे देखील सुचवले. सातारा गादी बरखास्त करुन कोल्हापूरात छत्रपती कुटुंब एकछत्री नांदेल व याने ताराराजेंची व गादीची प्रतिष्ठा वाढेल असा युक्तिवाद त्याने केला. पण याविरोधात छ.राजारामांच्या दोन्ही राणी ताराराजे व विजयमालाबाई यांनी संयुक्त पत्राद्वारे व्हायसरॉय लिनलिथगोस कळवले की, 'गेल्या २०० वर्षांपूर्वीच दोन्ही गाद्या स्वतंत्र झालेल्या आहेत. कोल्हापूर गादीने साताऱ्यापेक्षा दर्जा, श्रीमंती, राज्यविस्तार या सर्वांमध्ये फार प्रगती करुन स्वतःची वेगळी संस्कृती, ओळख व मरातब मिळवला आहे आणि आजमितीस सातारा एक छोटीशी जहागीर बनून राहिला आहे.'
एका अनौपचारिक पत्रात कर्नल गैसफोर्ड यास ताराराजेंनी आपल्या सावंतवाडीकर सरदेसाई बहिणीचा मुलगा शिवराम सावंत भोसले यांच्या नावाचा देखील प्रस्ताव पाठवला. पण हा भोसले असूनही छत्रपती घराण्याशी थेट संबंधित नसल्याने नाकारला गेला. भोसल्यांचेच गोत्र असलेला रामचंद्र नरसिंहराव घोरपडे या मुलाचा राणीसाहेबांनी ठेवलेला प्रस्ताव देखील नाकारला गेला. छ.राजारामानंतर वर्षभर गादी रिक्तच होती. सरतेशेवटी शेवटचा पर्याय म्हणून खानवटकर भोसले घराण्यातील दत्तक घ्यायचे ठरले पण या घराण्यातील मागे घेतलेले दोन दत्तक वयाच्या ३५ नंतर वेडसर होत असल्याचे लक्षात आल्याने त्यांच्या सावर्डेकर व टिटवेकर शाखा बाद करण्यात आल्या व सरतेशेवटी चौरेकर घराण्यातील नवजात बाळ शिवाजी पाचवे या नावाने दत्तक घेण्यात आले. छ.राजाराम द्वितीय यांचे दत्तकपुत्र छत्रपती शिवाजी पाचवे यांच्या १९४६ मध्ये झालेल्या आकस्मित मृत्यूने करवीर छत्रपती गादी पुन्हा रिक्त झाली.
छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या कन्या राधाबाई आक्कासाहेब यांचा विवाह मध्यप्रदेशातील देवासचे (थोरली पाती) महाराज तिसरे तुकोजी पवार यांच्यासोबत झाला होता. पुढे त्यांचे सुपुत्र विक्रमसिंहराजे यांचा देवासच्या गादीवर १८ मार्च १९३८ रोजी राज्याभिषेक झाला. त्यांनी दुसऱ्या महायुद्धात प्रत्यक्ष सहभाग घेतला होता आणि त्यांना इंग्लंडचा राजा सहावा जॉर्ज याने के. सी. एस. आय. पदवी दिली होती. इकडे कोल्हापूर गादीच्या वारसाचा कथला चालूच होता शेवटी विक्रमसिंह महाराजांनी आपले राज्य व देवास (सिनियर) गादी आपले एकुलते एक चिरंजीव कृष्णराव तृतीय यांना सुपुर्द करुन स्वतः कोल्हापूर छत्रपती गादीवर आरुढ झाले. १ जून १९४७ रोजी त्यांचा छत्रपती शहाजी दुसरे या नावाने राज्याभिषेक झाला. भारत स्वतंत्र झाल्यानंतर जवळपास २ वर्षांनी १ मार्च १९४९ रोजी करवीर संस्थान भारतात विलीन करण्यात आले. प्रिन्सेस पद्माराजेंचा विवाह तोरखेडचे जहागीरदार रघुजीराव कदमबांडे यांच्यासोबत १६ फेब्रुवारी १९५९ रोजी लावण्यात आला.
छत्रपती शहाजीराजे दुसरे यांचे एकुलते एक चिरंजीव कृष्णराव तृतीय हे देवास गादीचे अभिषिक्त महाराज असल्याने करवीर गादीवर वारसदाराचा प्रश्न पुन्हा उभा राहिला. महाराजांनी पद्माराजे यांचे चिरंजीव राजवर्धन कदमबांडे यांनाच दत्तक घ्यावे असे सर्वांचे म्हणणे होते, पण शहाजीराजेंनी आपल्या कन्येचा मुलगा दिलीपसिंह भोसले नागपुरकर यांस दत्तक घेण्याच्या हालचाली सुरू केल्या. याची चाहूल लागताच कोल्हापुरात प्रचंड गदारोळ माजला. सायकल फेऱ्या, कोपरा सभा, रात्रीचे मशाल मोर्चे काढून लोक शहाजीराजेंच्या निर्णयास विरोध करत होते. २४ जून १९६२ रोजी न्यू पॅलेसवर मोर्चा काढण्यात आला व संपूर्ण कोल्हापुरात कडकडीत हरताळ पाळण्यात आला. छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी विजयमाला राणीसाहेबांच्या नेतृत्वाखाली बायका मुलांसह असंख्य कोल्हापूरकर रस्त्यावर उतरले व काळे निषाण फडकवत, घोषणा देत न्यू पॅलेसवर धडकले. वाड्यावर प्रचंड पोलीस बंदोबस्त होता. लोक गेटवरुन उड्या मारुन आत शिरले. तथापि निर्णयात बदल होणार नाही असे शहाजी महाराजांनी सांगताच गोंधळ उडाला, जोरदार दगडफेक झाली, पोलीस वाहने जाळण्यात आली. संतप्त तरुणांनी न्यू पॅलेसवरच काळे निषाण फडकले. ठरलेल्या तारखेच्या आधीच कदाचित बंगळूर येथे शहाजीराजेंनी गुपचूप दिलीपसिंहांचा दत्तकविधी उरकून त्यांचे शाहू असे नामकरण केले. दत्तकविधानाचे वृत्त कळताच जनतेचा प्रक्षोभ शिगेला गेला. ३ जुलै १९६२ रोजी कोल्हापूरात घराघरांवर काळी निशाणे फडकावून हरताळ पाळला गेला. शाळा कॉलेज बंद पाडली गेली. शिरोळ नृसिंहवाडी रस्त्यावर विजेचे खांब पाडले गेले. तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री लालबहादुर शास्त्री व राष्ट्रपती राधाकृष्णन यांच्यापर्यंत हे प्रकरण गेले.
दत्तकविधान झाले पण जनतेचा रोष इतका होता की शहाजीराजांना सार्वजनिक ठिकाणी जाणे सुद्धा मुश्किल झाले. कोल्हापूरची ओळख असलेला दसरा चौकातील १९६२ चा शाही दसरा तर रद्द झालाच पण तिथपासून पुढे तो १९८१ पर्यंत म्हणजे तब्बल २० वर्षे हा शाही दसरा सोहळा होऊ शकला नाही. तद्नंतर हळूहळू छत्रपती दुसरे शाहू लोकांमध्ये मिसळू लागले व जनतेने छत्रपती म्हणून त्यांना स्विकारले.
आजमितीस छत्रपती शाहूराजे दुसरे कोल्हापूर (करवीर) गादीचे छत्रपती आहेत, ते न्यू पॅलेस येथे राहतात. त्यांस युवराज संभाजीराजे व महाराजकुमार मालोजीराजे असे दोन सुपुत्र आहेत ज्यांना अनुक्रमे यौवराज शहाजीराजे व कुमार यशराज असे सुपुत्र आहेत.
अशाप्रकारे आपला जीव, प्रतिष्ठा आणि संपत्तीचे बलिदान करुन छत्रपती गादी चिरंतन ठेवण्याचे प्रयत्न सर्वच छत्रपती आणि त्यांच्या निष्ठावंतांनी केली. आदिल, मुघल, पोर्तुगीज, सिद्दी, इंग्रजांचा बिमोड करुन शककर्ते महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेली ही छत्रपती गादी मुघल, इंग्रज, पेशवे, गद्दार आणि गृहकलह अशा सर्वच वावटळींमध्ये अत्यंत चिवटपणे महाराष्ट्राची अस्मिता बनून आजही शाबूत आहे.
आता लोकशाहीच्या काळात पिढ्यानपिढ्याच्या बलिदानाच्या भक्कम सिंहासनावर असलेल्या या छत्रपती गादीच्या सन्मानाची जबाबदारी स्वतः छत्रपती घराण्यावर आहे. त्यांच्या वर्तनातूनच गादीचा सन्मान अबाधित राहणार आहे.
तथापि आजवर गादीवर आलेले बहुतांश छत्रपती हे लोकाभिमुख व जनकल्याणीच असल्याने स्वाभिमानाच्या या अखंड परंपरेचा आदर करणे हे सर्व महाराष्ट्र आणि भारतीय जनांचे कर्तव्य आहे.
#रणमस्तबहाद्दर
#GameofThrones
जय शिवराय! जयतु छत्रपती!
✍🏻 स्वप्नील महेंद्र जाधवराव.


Comments
Post a Comment