गावकुसावरील देवता

गावकुसावरील देवता


 माणसाच्या सांस्कृतिक अस्तित्वापासुन देवतांचे अस्तित्व आहे असे इतिहास सांगतो तर देवतांनी सृष्टी निर्माण केली असे धर्म सांगतो. जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात भिती, प्रेम, इच्छा यांच्या माध्यमातून  निसर्गपुजक सभ्यतेने देवत्वाचा आकार घेतला. शेंदूर फासलेले दगड आणि त्यांच्यात पुजले जाणारे देवत्व न बघितलेला एकही मराठी/भारतीय व्यक्ती भेटणार नाही. माणसाच्या सांस्कृतिक उत्क्रांतीनंतर देवत्वात सुद्धा बदल होत गेले ओबडधोबड दगडांचे देव मुर्त आकार घेऊ लागले. पण यातून काही देव पिछाडीवर पडले आणि गावातून निघून वेशीवरचे धनी झाले.



मरीआई

साधारणतः प्रत्येक गावाच्या वेशीवर मांग वाड्यात  मरीआई हि स्त्री देवता असते. या देवतेला मरीआई-महालक्ष्मी काही ठिकाणी जरी-मरी, कडकलक्ष्मी, महामारी तर कोकणात गांवदेवी म्हटले जाते. मातंग समाज हा या देवीचा पुजारी असतो. शेंदूर फासलेले अनेक दगड मंदिरात असतात पैकी दोन मोठे पाषाण या दोन देवींच्या नावाने पुजले जातात. "मारी" हा दक्षिणी तमिळ शब्द असून तो वर्षावाचक आहे,ती पर्जन्य देवतेला वर्षनशील बनवते ती मारी असे मत दिवगंत रा. चिं. ढेरे ह्यांनी नोंदवले आहे. थोडक्यात मरीआई हे "धरणीचे"प्रतिक आहे. पूर्वी देवीच्या रोगाची साथ आल्याने खूप लोक दगावले जात असत. आषाढ महिन्यात पावसामुळे जलस्त्रोत दुषित होत असत व आजार पसरत असे. त्यामुळे बरेचदा तो देवीच्या प्रकोपामुळे पसरला आहे असा समज होता. आषाढ महिन्यात नैवेद्य करून आणि गाडा फिरवून पुढे देवीचा कोप होऊ नये पीक उत्तम यावे व संपत्ती वाढावी अशी मनोकामना केली जाते. ग्राम्य जिवनातील उपयुक्त पशू "रेडा" हे देवीचे वाहन आहे. समुद्र मंथनातून महालक्ष्मीचा जन्म झाला तिचाच अवतार लखाबाई सुद्धा पाण्यातून जन्माला आली अशी लोकधारणा आहे.
               "बसली जळाला लखाबाई बसली जळाला
                  शोधी पोतराज पाण्याच्या तळाला"

मरीआई/ जरी-मरी/ लखाबाई

       या देवतेचा प्रमुख उपासक म्हणजे "पोतराज" दक्षिण भारतातील ग्रामदेवतांच्या बलिक्रिया पार पाडणारा उपासक. आंध्रप्रदेशात मदगी किंवा मादगूड म्हणून ओळखला जाणारा हा समाज तमिळनाडू राज्यातही अस्तिवात आहे. पोतराज हा शब्द द्रविड भाषेतील पोत्तुराजु या शब्दाचा मराठी अपभ्रंश आहे. पोत्तु किंवा पोतू म्हणजे रेडा किंवा बोकड. बोकडाची बलिप्रक्रिया पार पाडणारा पोत्तुराजु अशीही त्याची ओळख दिली जाते. पोतराज पुरुष असूनही त्याच्या डोक्यावर स्रीप्रमाणे केस असतात. त्यांचा आंबाडा बांधलेला असतो. कमरेच्या घागर्‍याला नवे-जुने अनेक हिरवे खण लोंबत असतात. गळ्यात बांगड्यांची माळ, कमरेला सैलसर घुंगराची माळ अडकवलेली असते. पायात खुळखुळ्या म्हणजे भले मोठे पोकळ पितळी वाळे असतात. कपाळावर हळदी-कुंकवाचे पट्टे असतात. हातात "कोरडा" असतो,ज्याने तो स्वत:च्या अंगावर फटके मारुन घेतो. पोतराज अंगावर जो वेष धारण करतो त्याला आभरान म्हणतात. देवीची गाणी म्हणने, साकडे घालणे, धुपात्री करणे तसेच संक्रांत व पिकपाण्याचे भविष्य सांगणे इ. कामे वेगवेगळे पोतराज करतात. दहिवडी (सातारा) हे पोतराजांचे प्रमुख ठिकाण आहे.
"खंद्यावर कोरडा मरीआई न जुपलं रेड्याला...
बसली गाड्याला, लखाबाई आलीया वाड्याल्या..."
अशा लोकगीतांत पोतराज देवीचे वर्णन करतात.

पोतराज 


म्हसोबा

म्हसोबा हा सर्वांना परिचित देव असला तरीही बराच गूढ असा देव आहे. ज्योतिबा फुले म्हसोबाला महसुलाचा अधिपती असे म्हणतात. म्हणजे थोडक्यात एका ठराविक क्षेत्राचा महसूल गोळा करणारा! म्हसोबाच्या प्रतिकात एक रेडा दर्शविला जातो. हा रेडा म्हणजेच महिष! महिष म्हणजेच महेश! म्हणजे हा शंकराचा ग्राम्य स्वरूपातील टाक आहे. आता थोडे पुराण कथेकडे वळू. देवीने जेव्हा महिषासुर मर्दन केले तेव्हा त्याच्या शरीरातून स्वतः शिव प्रकट झाले. चांगले आणि वाईट हे दोन्ही एकाच परमेश्वराची निर्मिती आहे हे सांगण्याचा त्यामागील उद्देश होता. शेतकी जीवनात पशूचे महत्व खूप आहे. म्हसोबा हा खरेतर म्हैसोबाचा अपभ्रंश आहे. म्हसोबा हा शेतात विहिरीजवळ असतो. त्याचे ठराविक क्षेत्र असते. त्या क्षेत्रात सर्प वावर करतो असा समज प्रचलित आहे. म्हसोबा हा त्या क्षेत्राचे रक्षण करतो हाही दुसरा अर्थ यातून निघतो. म्हसोबाला अमावास्येला नारळ फोडण्याची प्रथा आहे. म्हैस, सर्प व शेतात निर्जन ठिकाणी वास्तव्य हे हा देव शिव-शंकर असल्याचेच पुरावे आहेत. म्हसोबा देवाचा राखणदार (सेनापती) या स्वरुपात सुद्धा मंदिराबाहेर पुजला जातो. देवतांच्या नावाने दिले जाणारे कोंबडा-बकऱ्याचे बळी आणि अंड-रोट म्हसोबा जवळच दिले जातात.

म्हसोबा


वेताळ

एक प्राचिन देवता आणि भुतांचा राजा म्हणून वेताळ पुजला जातो. शिवाच्या सैन्यात गणांसोबत भुत-प्रेतांचा देखील समावेश असतो पैकी गणांचा सेनापती नंदी तर भुतांचा राजा वेताळेश्वर आहे. गावाच्या वेशीवर शिवाचा अवतार वेताळेश्वराचे मंदिर असते. पांढऱ्या चुण्याने रंगवलेले दोन पाषाण राजा वेताळ आणि त्याच्या सेनापतीचे यांचे प्रतिक आहेत. पांढरा ध्वज हे वेताळाचे निषाण असते. वेताळबा भुतांपासून आणि असूरी शक्तींपासून गावाचे रक्षण करतो अशी मान्यता आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात प्रामुख्याने हि देवता वेशीवर पहायला मिळते. तसेच संपूर्ण भारतात वेताळाची मंदिरे आहेत. वेताळबाच्या मंदिरावर छत बांधले जात नाही. इथे अमावस्येला नारळ फोडण्याची आणि अंडं-रोट वाहण्याची प्रथा आहे. अमावस्येच्या रात्री सर्व भूत पिशाच्च देवाची वाजत गाजत, दिवट्या नाचवत मिरवणूक काढतात अशी धारणा आहे. या मिरवणुकी पाहिल्याच्या अनेक रोचक कथा गावखेड्यात ऐकायला मिळतात. स्त्रियांनी या देवतेची उपासना करायची नसते त्यामुळे त्यांना या मंदिरात जायला सुद्धा बंधन असते.

वेताळेश्वर 


सातीआसरा

ह्या सात देवी सदा एकत्र पूजल्या जातात. सात जणी बहिणी, मोठ्या बाया इ. नावांनी या देवी ओळखल्या जातात. प्राचिन काळापासून उपास्य असलेल्या "सप्तमातृका" यांचे हे ग्राम्य रुप आहे. ब्राह्मी, वैष्णवी, माहेश्वरी, इंद्राणी, कौमारी, वाराही व चामुंडा, अशा या सात मातृदेवता आहेत. तसेच अनेकवेळा गणेशी, नरसिंही ह्या देवता देखील यात समाविष्ट केल्या जातात. यांच्यासोबत गणपती किंवा कार्तिकेय किंवा म्हसोबा पुजला जातो, ज्याला ग्रामिण भागात गवळी/कृष्ण समजले जाते. नदी, विहिरी, तलाव अशा पाण्याच्या ठिकाणी साती आसरांचे ठाण असते. या अत्यंत कडक स्वभावाच्या मानल्या जातात. साती आसरांचे गोड्या व खाऱ्या असे प्रकार असतात त्या अनुक्रमे शांत व उग्र समजल्या जातात. आसरा हा अप्सरा शब्दाचा अपभ्रंश आहे असा एक मतप्रवाह फार प्रचलित आहे. पाश्चात्त्य संस्कृतीमधील mermaids हे याचे मिळतेजुळते उदाहरण आहे. पाण्यात राहणाऱ्या या अती सुंदर स्त्रिया व्यक्तीस भुरळ पाडून पाण्यात खेचून नेतात अशी दोन्ही संस्कृतींमध्ये समान धारणा आहे. पण प्रामुख्याने पंच तत्वापैकी जल तत्वाच्या पुजेचे त्या प्रतिक असाव्यात. आषाढात उफाळलेल्या नद्यांची ओटी भरली जाते तर काही ठिकाणी नदीकाठी साती आसरांचे पुजन केले जाते. पाणवठ्यात विशिष्ट पद्धतीची परडी सोडून कुळाचार केला जातो.
"सात जणी बहिणी, आठवा कान्हा,
कान्हा खेळतो, या गोकुळामंदी गं कृष्ण नांदतो..."

वाहनांसह असलेली सप्तमातृका पट्टी सोबत गणपती आणि कार्तीकेय 


साती आसरा सोबत म्हसोबा असणारा टाक


मारुती

हे देखील अशाच प्राचिन ग्राम संस्कृतीचे प्रतीक असलेली लोकप्रिय देवता, पण सुदैवाने रामभक्ती आणि बलोपासनेच्या माध्यमातून गावच्या पारावर टिकून आहे. मारुती या शब्दाचा उल्लेख ऋग्वेदात देखील आढळतो. मरुत् या गणाची (लोकसमुहाची) हि अधिष्ठात्री देवता. वीर मारुती आणि दास मारुती या त्याच्या दोन रुपांपैकी वीर मारुती हे यक्ष उपासनेशी संदर्भित आहे. अनेक आदिवासी जमाती मारुतीस आपला पुर्वज मानतात पैकी बजरंगी, हनुमान, वानर या नावांशी संबंधित गोत्रे देखील त्यांच्यात आढळून येतात.

वीर मारुती


            ह्या सोवळ्या-ओवळ्यात बंदिस्त न होणाऱ्या देवता ! प्रत्येक गावात असलेल्या यांच्या अस्तित्वावरुन त्यांची तेव्हाची लोकप्रियता लक्षात येते. ग्राम संस्कृतीसोबत या देवताही आपले अस्तित्व मागे टाकू लागल्या आहेत. श्रावणातील देव-देव सुरू होण्यापूर्वी आषाढात या प्राचिन ग्रामदेवतांची पुजा केली जाते. त्यामुळे तरी त्यांच्या अग्रपुजेचा मान अजून टिकून राहिला आहे.
   
#रणमस्तबहाद्दर
                                          ✍️ स्वप्नील महेंद्र जाधवराव.

Comments

  1. स्वप्नील चा अभ्यास भरपुर आहे..
    आम्हाला भरपुर माहिती मिळते त्यामुळे....

    ReplyDelete
  2. अतिशय अद्भुत आणि अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती दिलीत दादा अभ्यासपूर्ण मांडणी

    ReplyDelete
  3. खूपच छान महत्वपूर्ण माहिती सांगितली आहे👌💐

    ReplyDelete
  4. याच माहितीच्या शोधात होतो...अप्रतिम माहिती !!

    ReplyDelete
  5. लाखो वर्षांच्या विश्वाच्या इतिहासात मानवी संस्कृतीच्या ज्ञात असलेल्या हजारो वर्षांच्या इतिहासात मानवी संस्कृतीशी जोडले गेलेले पदर शोधण्याचा प्रयत्न

    ReplyDelete
  6. अतिशय दुर्मिळ आणि अत्यंत महत्वाची माहिती आम्हाला तुमच्याकडून मिळाली, खुप खुप धन्यवाद 🙏💐☺

    ReplyDelete
  7. धन्यवाद दादा

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

हैबतबाबा पवार आरफळकर

शेखमिरा संस्थान