क्षेत्र महाबळेश्वर

 प्राचिन ते अर्वाचीन इतिहास आणि संस्कृतीच्या खुणा जपणारे श्री क्षेत्र महाबळेश्वर... 

क्षेत्र महाबळेश्वर

महाबळेश्वर या सर्वश्रुत पर्यटनस्थळातील सर्वात सुंदर ठिकाण कोणते असेल तर ते क्षेत्र महाबळेश्वर (Old Mahableshawar).. इंग्रजांच्या सांस्कृतीक अतिक्रमणापासून अंतर राखून राहिलेले भारतीय इतिहासातील महत्त्वाचे ठिकाण ! स्कंद पुराणातील सह्याद्री खंडावर आधारित 'श्री कृष्णामाई महात्म्य' व 'महाबळेश्वर (स्थळ) महात्म्य' या ग्रंथांमध्ये महाबळेश्वर क्षेत्राची व पंचगंगा मंदिराची माहिती मिळते.

            'महाबळेश्वर' या स्वयंभू शिवलिंगामुळे या ठिकाणास महाबळेश्वर हे नाव प्राप्त झाले असावे. शिवरुप महाबळेश्वर, विष्णुरुप अतिबळेश्वर, ब्रह्मरुप कोटेश्वर अशी शिवालये एकमेकाशेजारी आहेत. या तिन्ही मंदिरांची निर्मिती महाराष्ट्रात एकछत्री अंमल गाजवणारे देवगिरीचे सम्राट सिंघण देव (द्वितीय) यांनी इ.स. १२१५ मध्ये केली. पुढे याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी जानेवारी १६६२ मध्ये सोनोपंत डबीर यांचेकरवी जिजाऊ आईसाहेबांची सुवर्णतुला करुन फार मोठा दानधर्म केला. तसेच मंदिरांचा जीर्णोद्धार केला.

महाबळेश्वर शिवलिंग 

              गर्भगृह, सभामंडप आणि सभामंडपात असणारी देवकोष्ट अशी या मंदिराची रचना आहे. गर्भगृहात महाबळेश्वराचे शिवलिंग घडीव नसून स्वयंभू रुद्राक्षाच्या आकाराचे आहे. ज्यातून सतत जलस्रोत वाहत असतो. सभामंडपातील उजव्या देवकोष्टात शिवशंभूची शेज, त्रिशूळ आणि डमरु गेली ३०० वर्षे जतन करून ठेवलेले आहेत. तर डावीकडे भैरवाची मुर्ती आहे. मंदिरावर जास्त प्रमाणात शिल्पकला आढळत नसली तरी आतमध्ये गणपती तसेच आणखी एका देवतेची मुर्ती (ती देवता कोणती आहे माहिती असल्यास मार्गदर्शन करावे) व उत्ततरकालीन पार्वतीची मूर्ती . व महाकाय नंदी आहे. या मंदिरांच्या कळसाची रचना काहीशी वेगळी आहे असे कळस इतर ठिकाणी पाहण्यात नाहीत.

महाबळेश्वर मंदिर 

महाबळेश्वर मंदिरातील विशाल नंदी 



पंचगंगा मंदिर..

दक्षिणपथाची वरदायिनी असलेल्या कृष्णा नदीचे उगमस्थान म्हणून या क्षेत्रास विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. महाबळेश्वर मंदिराच्या दक्षिणेस असणाऱ्या पंचगंगा मंदिरात कृष्णेचा उगम होतो. सदरहू पंचगंगा मंदिरात कृष्णा, वेण्णा, कोयना, सावित्री आणि गायत्री या नद्या उगम पावतात. पैकी कृष्णा, वेण्णा, कोयना पश्र्चिम महाराष्ट्रात उतरुन एकरुप होतात तर सावित्री आणि गायत्री कोकणात उतरतात.  या मंदिरात दर बारा वर्षांनी कन्यागत महापर्वावर भागिरथी कृष्णेस भेटावयास येते अशी मान्यता आहे. (जगाची पापे धुवून मलीन झालेली गंगा (भागिरथी) स्वतःला पवित्र करण्यासाठी कृष्णेच्या चरणी येते असा धार्मिक उल्लेख आहे) तसेच दर साठ वर्षांनी कपिलाषष्ठीच्या योगावर सरस्वती नदी गायत्रीस भेटायला येते अशीही मान्यता आहे. 

पंचगंगा मंदिर 


                या मंदिरात प्रवेशद्वारातून आत आल्यावर दोन्ही बाजूंनी मोकळी देवकोष्टं आहेत तर समोर असलेल्या पाच देवकोष्टात उगम पावलेले पाच नद्यांचे पाच प्रवाह एकत्रितपणे एका सवत्स धेनूच्या मुखातून मधोमध असलेल्या ब्रम्ह कुंडात पडतात. या कुंडासमोर मंदिराच्या प्रवेशद्वारापुढे सवत्स धेनु असलेले विष्णु कुंड आहे. यातच कन्यागत पर्वाचा सोहळा होतो. मुळ मंदिरावर कोणतेही छत बांधलेले. नाही  स्थानिकांच्या मते मंदिर ६०० वर्षे जुने असले तरी ऐतिहासिक उल्लेखानुसार १७ व्या शतकात याचा जिर्णोद्धार झाल्याचे लक्षात येते.

पाठीमागे पाच नद्यांची पाच देवकोष्टं आणि त्यातून एकत्रित केलेला प्रवाह सवत्स धेनूच्या मुखातून ब्रम्ह कुंडात पडतोय.  


महाबळेश्वर व पंचगंगा मंदिरांच्या मधे असणारे रुद्रेश्वर महादेव मंदिर व रुद्रतिर्थ अहिल्याबाई होळकरांनी बांधलेले आहे. तर पुर्वी अतिबळेश्वर मंदिरासमोर देखील हंसतिर्थ नावाचे एक कुंड होते असे उल्लेख आहेत. 

या मंदिर समुहापासून काही अंतरावर असणाऱ्या मठात समर्थ रामदासांनी दासबोधाची प्रत शुद्ध केली होती.

भरतखंडात विविध मंदिरांची निर्मिती आणि जिर्णोद्धार करून हिंदूत्वाची पुनर्बांधणी करण्याचा लौकिक मिळवणारे सम्राट सिंघण देव (द्वितीय), छत्रपती शिवाजी महाराज आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या तिघांनीही आपलं योगदान महाबळेश्वराचरणी अर्पण केले यातूनच या स्थानाचे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व अधोरेखित होते.

#रणमस्तबहाद्दर

                                     ✍️ स्वप्नील महेंद्र जाधवराव.

क्षेत्र महाबळेश्वर दर्शन
०५-०३-२०२१

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

हैबतबाबा पवार आरफळकर

शेखमिरा संस्थान

गावकुसावरील देवता