३० एप्रिल १९४५ च्या घटनेनंतर हिटलर जिवंत होता का ? इव्हा ब्राऊन आणि एडोल्फ हिटलर यांनी खरंच आत्महत्या केली होती का?

 

#द_सेव्हन्थ_सिक्रेट


३० एप्रिल १९४५ च्या घटनेनंतर हिटलर जिवंत होता का ? इव्हा ब्राऊन आणि एडोल्फ हिटलर यांनी खरंच आत्महत्या केली होती का?


                हुकुमशाहांबद्दल एक वेगळंच आकर्षण पहिल्यापासून माझ्या मनात होतं. त्यांचा रंजक उदयास्त मला शालेय जीवनापासून मोहित करतो आहे. मध्यंतरी अचानक हुकुमशाहांबद्दल वाचण्याची लहर आली. त्याच शोधात हातात पडलेली रहस्यमय कादंबरी म्हणजे आयर्विंग वॅलेस लिखीत आणि विजय देवधर अनुवादित "द सेव्हन्थ सिक्रेट..."

                ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या 'आधुनिक इतिहास' या विषयाचे प्राध्यापक डॉ. सर हॅरीसन अॅशक्रॉफ्ट त्यांचं चौदावं आणि अविस्मरणीय पुस्तक "हेर हिटलर" हा चरित्रग्रंथ प्रकाशित करण्याच्या तयारीत होते. त्यातच पश्चिम बर्लिनमधुन आलेल्या एका पत्राने त्यांची झोप उडवली. त्याच पत्राच्या सत्यतेची पडताळणी करण्यासाठी त्यांनी थेट बर्लिन गाठले आणि तीथेच त्यांचा अपघाती 'खून' झाला.

                 या सर्व घटनांनी भांबावून गेलेली सर अॅशक्रॉफ्ट यांची मुलगी युवा इतिहासकार एमिली अॅशक्रॉफ्ट त्या घटनाक्रमाचा शोध घेण्यासाठी पश्चिम बर्लिनमध्ये येते. थर्ड राईशच्या काळातील वास्तुकलेवर आधारित आपल्या पुस्तकासाठी माहिती मिळवायला आलेला 'रेक्स फोस्टर', हिटलरने काढलेल्या चित्रांचा संग्रह करणारा रशियन म्युसियमचा क्युरेटर 'नील किरवोव' आणि उर्वरित नाझींना शोधून संपवायच्या मिशनवर असणारी मोसाद एजंट व जेरुसलेम पोस्ट वृत्तपत्राची वार्ताहार 'तोवाह लेविन' यांची व एमिलीची तिथे भेट होते.


                 वेगवेगळ्या देशांतून वेगवेगळ्या कारणांसाठी आलेले हे लोक शेवटी एकाच ध्येयाने पछाडतात आणि ते म्हणजे "हिटलरच्या मृत्यूचे रहस्य !" पुर्व एस.एस.गार्ड (नाझी) पण आता कट्टर नाझी विरोधक अशी खोटी ओळख बनवणारा बर्लिन पोलिस प्रमुख 'वुल्फगॅंग श्मिड्स' आणि एक वृद्ध स्त्री 'एव्हलिन हॉफमन' यांचे या संशोधनाविरुद्धचे प्रयत्न आणि त्यामागील कारणे, यातच समोर आलेले सातव्या बंकरचे रहस्य, या संशोधकांचे आयुष्य व त्यांनी या संशोधनासाठी घेतलेली कठोर मेहनत यांची लेखकाने घातलेली गुंफण वाखाणण्याजोगी आहे. 
 
            अगणित रहस्यांनी ओतप्रोत भरलेली कादंबरी.. कादंबरीतील प्रत्येक व्यक्ती त्याचा भुतकाळ, वर्तमान, हिटलरशी असणारे नाते आणि बुरख्यामागील त्याचे खरे अस्तित्व या गोष्टी लेखकाने अगदी सहस्यमय आणि रोचक पद्धतीने मांडलेल्या आहेत. प्रत्येक पात्र अगदी जिवंत केले आहे. जसे जसे शेवटाकडे जाऊ तसे रहस्याची एक एक गाठ अलगद सुटत जाते. त्यातच हिटलरचा उदय अस्त आणि त्याच्या अंगी असणारे विविध कलागुण यांची नकळत ओळख आपल्याला घडत जाते. 

                रहस्याची आवड असणाऱ्या आणि एखाद्या ऐतिहासिक लेखकाचे त्याच्या पुस्तकासाठीचे प्रयत्न अनुभवु इच्छिणाऱ्यांसाठी एक उत्तम कादंबरी...


                    ✍️ स्वप्नील महेंद्र जाधवराव.

#रणमस्तबहाद्दर

Comments

Popular posts from this blog

हैबतबाबा पवार आरफळकर

शेखमिरा संस्थान

गावकुसावरील देवता