श्रीहरी विष्णूच्या छातीवर लाथ मारणारे, महालक्ष्मीचे वडील, भृगू संहितेचे जनक आचार्य भृगूऋषी कोण होते ?

आचार्य भृगूऋषी महाराज



हजारो वर्षांपासून श्री #भुईंज तिर्थक्षेत्री समाधीस्थ असणारे ऋषीश्रेष्ठ आचार्य भृगूऋषी महाराजांच्या समाधी मठ वर्धापनदिन सोहळा रथसप्तमी दिवशी साजरा केला जातो. सृष्टीच्या निर्मितीसाठी ब्रम्हदेवाने निर्माण केलेल्या सप्तर्षींपैकी आद्य ऋषी म्हणजे "ऋषीश्रेष्ठ भृगूऋषी महाराज." ब्रम्हाचे मानस पुत्र (Mind born son) आणि प्रजापती (सर्व जीवजंतूंचा ईश्र्वर / सृष्टीच्या‌ निर्मितीसाठी मदत करणारा ) असे त्यांचे उल्लेखही अनेक ठिकाणी आढळतात. हिंदू मान्यतेनुसार सृष्टीची भौगोलिक रचना भृगू महाराजांनी केली. खगोलशास्त्रावरील त्यांचा "भृगू संहिता" हा ग्रंथ जगप्रसिद्ध आहे. तसेच त्यांना भारतीय फलज्योतिष शास्त्राचे जनक मानले जाते. महर्षी मनुच्या मनुस्मृती नुसार भृगू पृथ्वीच्या निर्मितीपासून अस्तित्वात आहेत.



"भार्गव" गोत्रिय लोक भृगूंचे वंशज मानले जातात. भृगुंना प्रजापती दक्ष पुत्री "ख्याती" पासून "धाता" आणि "विधाता" हे दोन पुत्र आणि "जगदंबा महालक्ष्मी" ही कन्या झाली. तसेच "काव्यमाता" पासुन राक्षसगुरु महर्षी "शुक्राचार्य" आणि "पुलोमा" पासुन महर्षी "च्यवन" हे पुत्र झाले. यांच्याच वंशात पुढे जमदग्नी ऋषी आणि माता रेणुकेपोटी विष्णुने सहावा परशुराम अवतार घेतला. तसेच शुक्राचार्यांची कन्या देवयानी आणि चंद्रवंशी राजा ययाती यांच्या पोटी जन्म घेतलेल्या महाराजा यदुने जगप्रसिद्ध यदुवंशाची स्थापना केली. ज्यात विष्णुने आठवा श्रीकृष्ण अवतार घेतला.

खगोलशास्त्राच्या आणि फलज्योतिष शास्त्राच्या दृष्टीने भृगूंचे योगदान उल्लेखनीय आहे. शिव पुराण आणि वायू पुराणानुसार श्वसुर प्रजापती दक्षाने केलेल्या यज्ञात प्रमुख ऋषी म्हणुन भृगू उपस्थित होते. तसेच महाभारतातील प्रसिद्ध द्यूतसभेत सुद्धा ते आमंत्रित होते. श्रीमन् भगवत गीतेत श्रीकृष्ण म्हणतो "सर्व ऋषीगणांमध्ये भृगूऋषी देवतांच्या प्रचंडतेचे (समृद्धीचे) प्रतिक आहेत." सावित्री नदीकाठी सर्व ऋषीगणांनी एकत्र महायज्ञ करायचा ठरवल्यावर त्याचा यज्ञवेदी (प्रमुख) होण्याचा मान कोणाला द्यावा यासाठी त्रिदेवांची परीक्षा घेण्याची जबाबदारी भृगूंवर होती याच गोष्टींवरुन ऋषीगणांत त्यांचे श्रेष्ठत्व सिद्ध होते. याच परीक्षेदरम्यान आपला जावई श्रीहरी विष्णुला भृगूऋषींनी छातीवर मारलेली लाथ "मला वंदनीय आहे" असे म्हणत विष्णुने तिचा ठसा कायम सांभाळला आहे. आजही पंढरपूरच्या विठ्ठल आणि तिरुपतीच्या बालाजी मुर्तीवर आपल्याला तो बघायला मिळतो.‌
या प्रसंगानंतर महर्षींनी आपल्या भुईंजच्या आश्रमीच कायम वास्तव्य केले‌. व्दापार युगात कृष्ण देखील भृगूंच्या सानिध्यात ह्या आश्रमात राहिला होता. राक्षसगुरु शुक्राचार्यांना मृत व्यक्तीस जिवंत करण्याची 'संजीवन विद्या' अवगत होती. तसेच जवळच च्यवनेश्वरच्या डोंगरावर समाधीस्थ भृगूपुत्र च्यवन ऋषींनी आयुष्यभर तजेलदार राहण्यासाठी च्यवनप्राशचा शोध लावला. जेव्हा आचार्य भृगूऋषी महाराजांनी भुईंजमध्ये संजीवन समाधी घेण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांना त्यापासून परावृत्त करण्यासाठी कन्या वैकुंठस्वामिनी जगदंबा महालक्ष्मी भुईंज क्षेत्री अवतरली पण आचार्यांचा निर्णय ठाम होता. त्यांच्याच आदेशानुसार आजही आई महालक्ष्मी भुईंज गावी वास्तव्य करुन आहे. भक्ताच्या एका हाकेत धाऊन येणारी महालक्ष्मी पंचक्रोशीचे आराध्य दैवत आहे.

काही वर्षांपूर्वी प.पू. आण्णा महाराज आणि ग्रामस्थांच्या प्रयत्नातून भृगूऋषी मठाचा जिर्णोद्धार झाला. दरवर्षी रथसप्तमी दिवशी हरीनाम सप्ताहाची सांगता होऊन भृगूऋषींचा समाधी उत्सव गावात साजरा केला जातो. ग्रामदैवत महालक्ष्मीच्या दसऱ्याच्या यात्रेबरोबरच ही गावची दुसरी यात्रा म्हणुन प्रसिद्ध आहे. भुईंज गावची माती सुद्धा इतकी पवित्र आहे की नारायणपूर येथील दत्तमठात ती भस्म (विभुती/अंगारा) म्हणून वाटली आणि वापरली जाते.

आचार्य श्रेष्ठ श्री भृगूऋषी महाराज की जय !
आई महालक्ष्मी माता की जय !
हर बोला हर !

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

हैबतबाबा पवार आरफळकर

शेखमिरा संस्थान

गावकुसावरील देवता