पश्चिम महाराष्ट्रातील तिर्थक्षेत्र महालक्ष्मी मंदिर, भुईंज
महालक्ष्मी मंदिर, भुईंज
मंदिराची निर्मिती नक्की कधी झाली हे सांगता येत नाही, पण श्री देवी पुराण, श्री स्कंद पुराण आणि श्री भृगू संहितेत भुईंज या तीर्थक्षेत्राचा उल्लेख आढळतो. कुंभमेळ्या नंतर साधू कृष्णेत पवित्र स्नान करून याच ठिकाणी काही काळ वास्तव्य करतात. दक्षिण देशातून आलेल्या आषाढी दिंड्यांसाठी आणि ज्ञानोबांच्या पालखीच्या मानाच्या अश्वांसाठी इथला मुक्काम महत्त्वाचा असतो.
धार्मिक माहिती :-
सप्तर्षींपैकी आद्य ऋषी ज्यांनी संपूर्ण सृष्टीची निर्मिती केली असे आचार्य श्रेष्ठ श्री भृगुऋषी महाराजांची संजीवन समाधी इथे आहे. तसेच आपल्या वडिलांना समाधी घेण्यापासून थांबवायला आलेल्या आणि त्यांच्याच आदेशावरून भुईंजमधे थांबलेल्या वैकुंठस्वामिनी जगदंबा महालक्ष्मीचेही पुरातन मंदिर आहे. याच भृगू मठात द्वापार युगात श्री कृष्णाने काही काळ वास्तव्य केले होते.
मंदिराची रचना :
मंदिर कोणी व केव्हा बांधले याची नोंद सापडत नाही. वेळोवेळी अनेकदा या मंदिराचा जिर्णोद्धार झाला आहे. त्यामुळे मंदिराच्या बांधकामात विविधता आढळते. पांडवांनीही अज्ञातवासात असताना या मंदिराचा जिर्णोद्धार केल्याची कथा आहे. पुर्वाभिमुख मंदिर अंत:पुर, गर्भगृह आणि सभामंडप अश्या तीन भागात विभागले गेले आहे. रचना पाहता या तिन्ही बांधकामांचा काळ वेगवेगळा वाटतो. वर्षातून दोनदा देवीचा किरणोत्सव होतो. उगवत्या सूर्याची किरणे मुर्तीवर पायापासून कमरेपर्यंत पडतात. हल्लीच मंदिराचा जीर्णोद्धार झाल्याने शिखरामधे पुर्णतः बदल झाला आहे. सध्या मंदिरात असलेली आईची मुर्तीही अलिकडच्या काळातील आहे. चतुर्भुज मूर्तीच्या हातात शंख चक्र आणि पद्म आहे. देवीची पुरातन मुर्ती धोम(वाई) येथे आहे. (यामागेही एक अविश्वसनीय कथा आहे) नवरात्रीत देवीची चांदिची प्रतिमा मुळ जागेवर बसवतात. जवळच दक्षिणेला भृगुऋषींचा मठ आहे. त्यात भृगुऋषींची देवीकडे पाठ केलेली ध्यानस्थ मुर्ती आहे.
मंदिर परिसर :-
मंदिराची बाजुची तटबंदी ढासळलेली आहे. पण कृष्णानदी कडून येणाऱ्या पायऱ्या आणि बुरुज अजुनही खुप उत्तम स्थितीत आहेत. परीसरात अनेक वीरगळी आणि सतीशिळा पहायला मिळतात. सौभाग्य द्योतक असणाऱ्या गजलक्ष्मीचीही मुर्ती येथे आहे. परिसरात नयनरम्य असा कृष्णा घाट आहे. तसेच ऋषींसाठी न्हानीघर नावाने ओळखले जाणारे तपस्थान देखील आहे.


Comments
Post a Comment