दत्तात्रेय आणि दत्त संप्रदाय

दत्तात्रेय आणि दत्त संप्रदाय



हिंदू धर्मातील ऋषी, सन्यासी, योगी आणि दैवत म्हणून दत्तात्रेयांकडे पाहिले जाते. सप्त‌र्षींपैकी एक असणाऱ्या "ब्रम्हर्षी अत्रि" आणि सात पवित्र पतिव्रता स्त्रियांपैकी एक असा नावलौकिक असलेल्या "सति अनुसुया" यांच्या पोटी दत्तांचा जन्म झाला.  अत्रिंनी अग्नी, इंद्र आणि इतर वैदिक दैवतांवर अनेक श्लोकांची रचना केली. ऋग्वेदात सर्वात जास्त उल्लेख असणारे ऋषी म्हणून त्यांची ओळख आहे. ऋग्वेदाच्या पाचव्या मंडलास "अत्रि मंडल" म्हणून ओळखले जाते, ऋग्वेदातील ८७ श्लोक अत्रि आणि त्यांच्या वंशजांना समर्पित आहेत. ऋषी अत्रिंना तीन पुत्र होते, पैकी "चंद्र" ब्रम्हाचा, "दत्त" विष्णुचा आणि "दुर्वास" शिवाचा अवतार मानले जातात. चंद्रपासून चंद्रवंशाची उत्पत्ती झाल्याने अत्रि हे चंद्रवंशीयांचे "गोत्र" मानले जाते. 
              महाराष्ट्रात दत्त मुर्तीची रचना त्रिमुखी आणि सहा हात असणारी अशी आहे पण माहूर सारख्या अनेक मध्ययुगीन मंदिरांमध्ये आणि अग्निपुराणातील मुर्तीशास्त्रानुसार दत्त मुर्ती एकमुखी आणि दोन हात असणारी आहे.
             दत्त "अद्वैत" सिद्धांताचे उपासक आणि प्रचारक होते. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आणि गुजरात मध्ये दत्तांना त्रिमुर्तींचा एकत्र अवतार समजले जाते. तर उर्वरित भारतात तसेच गरुड पुराण, ब्रम्ह पुराण आणि सत्त्वता संहितेत दत्तांना महाविष्णूचा अवतार मानले जाते. तर शैव परंपरेतील नाथ संप्रदायानुसार दत्त हे आदिगुरु आहेत. अवधूत संप्रदायातील नव नारायणापैकी एक, दशनामी आणि शाक्त संप्रदायानुसार शक्ती उपासक, संत तुकाराम, संत एकनाथ यांच्या भक्ती संप्रदायाचे पुज्य, महानुभाव पंथाच्या पाच कृष्णांपैकी आदिगुरु, लाल पाद्रिस या १० व्या शतकातील नाथ आणि कानफट्या संप्रदायाप्रमाणे असणाऱ्या योगींचे मुळ, तसेच गुरुचरित्र (दत्त) संप्रदायानुसार १४ व्या शतकातील श्रीपाद श्रीवल्लभ, १५ व्या शतकातील नरसिंह सरस्वती, १८ व्या शतकातील स्वामी समर्थ अशा अनेक रुपात जवळपास सर्वच संप्रदायात दत्त पुजनीय आहेत.
         त्याचबरोबर इ.स. १५५० मध्ये दत्तात्रेय योगींनी "दास गोसावी" यांना दत्तसंप्रदायाची दिक्षा दिली. पुढे दास गोसावी यांनी हे मराठीतील ज्ञान त्यांच्या तेलुगू शिष्यांना दिले. प्रा. रा. चि. ढेरे यांच्या मते दत्त आणि दास गोसावी हे तेलुगू दत्त संप्रदायाचे खरे गुरु आहेत. याच दत्त संप्रदायाने दक्षिणेत अद्वैतवादाचा प्रसार केला. यांचे तेलुगू ग्रंथ निजगुणशिवयोगी यांनी कन्नड तर लिंगायत संत शांतलिंगस्वामी यांनी मराठीत अनुवादित केले.
            विविध संप्रदाय, पंथ आणि सिंद्धांत यांना एकत्रित आणून "सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो, अहं ब्रह्मास्मि|" अशा अद्वैत वादाचे मुळ घालणारा नेपाळ पासून दक्षिण भारतापर्यंत पसरलेला दत्त संप्रदाय उत्तरोत्तर प्रसिद्धीस जात आहे.

#रणमस्तबहाद्दर
                              ✍️ स्वप्नील महेंद्र जाधवराव.

             

Comments

Popular posts from this blog

हैबतबाबा पवार आरफळकर

शेखमिरा संस्थान

गावकुसावरील देवता