धावजी पाटील, सुरुर
काळुबाईचे बंधू, पट्टशिष्य आणि महाराष्ट्रातील अघोरी विद्येचे केंद्र...
श्री धावजी पाटील मंदिर, सुरुर
![]() |
| धावजी पाटील दरबार मंदिर सुरुर ता.वाई (सातारा) |
महाराष्ट्रात धावजी पाटील माहिती नसणारा काळुबाईचा उपासक सापडणे दुर्मिळ आहे. काळुबाईचे बंधू म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या धावजी पाटलांचा इतिहास देखील फार रंजक आहे. १९ व्या शतकात अनेक महान व्यक्तिंनी जन्म घेतला ज्या आपल्या कार्यकर्तृत्व आणि लोकप्रियतेच्या बळावर देवत्वास प्राप्त झाल्या यापैकीच धावजी पाटील एक !
स्त्री जितकी मातृदेवता म्हणून प्रसिद्ध झाली, तितकेच तिचे संहारक रुपही प्रसिद्धीस पावले. याच अघोरी रुपाचे नाव म्हणजे "काली". काली हि अघोरी, तंत्रविद्या, जारण मारण आणि काळ्या जादूची आद्य देवता. या महाकालीचे मुख्य ठिकाण म्हणजे कलकत्ता/बंगाल, आणि याच मुळे काळी जादू हि बंगाली विद्या या नावाने देखील प्रसिद्धी पावली. संपुर्ण भारतवर्षात काली विविध नावांनी लोकप्रिय आहे. महाराष्ट्रात तिचे उग्र रूप काहीसे सौम्य झाले आणि काली "काळुबाई" म्हणून पुजली जाऊ लागली. मध्यप्रदेशात धारची "गडकालीका", पश्चिम महाराष्ट्रात मांढरदेव आणि कुसुंबीची काळुबाई, विदर्भात चंद्रपूरची महाकाली या परमार वंशीयांच्या कुलदेवी कालीचेच स्वरुप आहेत.
![]() |
| काळुबाई मांढरदेव देवस्थान |
याच काळेश्वरीचा बंधू म्हणून महाराष्ट्रभरात प्रसिद्ध असणारा देव म्हणजे सुरुरचा धावजी पाटील.... सुरुर हे गाव तसे ऐतिहासिक ! '१४ वर्षांच्या वनवासानंतर १ वर्षाच्या अज्ञातवासाच्या काळात पांडव याच परीसरात काही काळ वास्तव्यास होते' या अख्यायिकेला पाठबळ देणारी अनेक उदाहरणे आहेत. जसे की पांडवांकरवी झालेले महालक्ष्मी मंदिर भुईंज पुनर्निमाण, भैरवनाथ मंदिर किकली बांधकाम आणि सुरुर मधील पांडवजाई मंदिर.. याच पांडवजाई मंदिराच्या परिसरात १८ व्या शतकात धावजी पाटील यांचा जन्म झाला.
लहानपणापासूनच धावजीचा तंत्र, मंत्र, काळी विद्या यांकडे कल होता. घरातल्यांनी लग्न लावून दिले तरी त्यांच्यात काही बदल झाला नाही. अखेर पत्नीला सोडून ते बंगालच्या दिशेने निघाले. तेव्हा एका साधूने त्यांना कलकत्त्याला जाऊन कालिकामातेची उपासना करण्याचा सल्ला दिला. तिथे १४ वर्षे राहून तंत्रविद्या, काळी जादू यामध्ये ते पारंगत झाले. नंतर कालिमातेच्या दृष्टांतानुसार ते सुरुरला परत आले.
![]() |
| धावजी बाबांच्या शिष्यांची समाधी |
इथे त्यांच्या कडून वेगवेगळे चमत्कार घडू लागले. भिती आणि प्रेम अशा संमिश्र भावनेने अनेक भक्त त्यांच्याकडे गर्दी करु लागले. जनमानसांचे प्रश्न सुटू लागले. त्याकाळातील प्रसिद्ध जाणू गारुडी आणि धावजी बुवांमध्ये झालेला अघोरी विद्येचा सामना आजही प्रचलित आहे. लमाणबाबा, कैकाडीबाबा, दाजीबुवा, पैलवान अशा अनेकांनी त्यांचे शिष्यत्व स्वीकारुन तंत्रविद्या अवगत केली. या काळात धावजी पाटलांनी मांढरगडावरील काळुबाईची उपासना सुरू ठेवली. आपल्या कार्य पुर्ततेची जाणिव झाल्यावर काळुबाईच्या आज्ञेनुसार इ.स. १८६८ साली धावजी बुवांनी जिवंत समाधी घेतली. त्यांच्यासोबत त्यांची पत्नीदेखील सती गेल्या.
मांढरगड हे नाव ज्यांच्या नावावरुन पडले ते काळूबाईचे निस्सिम भक्त मांगिर बुवा आणि गोंजीर बुवा यांनाही न मिळालेले "काळुबाईचे बंधू" हे मानाचे स्थान धावजी बाबांना त्यांच्या लोकप्रियतेच्या जिवावर मिळाले. आजच्या घडीला मांढरदेवी काळुबाईची वारी सुरुरला धावजी पाटलांचे दर्शन घेतल्याशिवाय पुर्णच होत नाही. बंगालमध्ये देखील धावजी पाटील हे धाऊजी बाबा किंवा धाऊजी पटेल या नावाने प्रसिद्ध आहेत. तंत्रविद्येत धावजी पाटलांना आजही फार मानाचे स्थान आहे.
सुरुर येथे समाधी मंदिराशेजारी धावजी पाटलांचा दरबारात आहे तिथे दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. अमावस्या आणि पौर्णिमा तर भक्तांसाठी पर्वणीच असते. श्रद्धेतून अवतरीत झालेला हा देव आज दारु, चिलीम, अंड-रोट, कोंबडं, बकरं, लिंबू, बिब्बा आणि बाहुल्यांच्या ओझ्याखाली अंधश्रद्धेच्या छायेत गेला आहे. पण काहीही असले तरी धावजी पाटील हा काळेश्वरी भक्तांसाठी सर्वात भक्कम आधारस्तंभ आहेत.
✍️ स्वप्नील महेंद्र जाधवराव.#रणमस्तबहाद्दर




खूप छान दादा ,
ReplyDeleteGIVE PHONE NO OF SURUR MANDIR.
ReplyDelete