इंग्रजांकडून मराठ्यांसाठी वापरले जाणारे पर्यायी नाव "सवाजी !"

सवाजी/सावजी (Savajee)

सध्याच्या काळात सावजी हा शब्द ऐकताच आपल्या मनात चिकन किंवा मटणाचा विचार येतो. आपल्या झणझणीत मसालेदार स्वादाने नागपूरच्या सावजी चिकनने ही लोकप्रियता कमावली आहे. सोमवंशी सहस्त्रार्जुन क्षत्रिय समाजाचा खत्री/सावजी हा एक भाग आहे आणि त्यांचीच हि प्रसिद्ध पाककला...

छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी, रायगड

             पण सावजी या शब्दाची ३५० वर्षांपासून ते गेल्या १५० वर्षांपूर्वी पर्यंतची ओळख काही वेगळीच होती. शिवकाळानंतर इंग्रज मराठ्यांना "सावजी/सवाजी" या नावाने ओळखत असत. इस्ट इंडिया कंपनीच्या पत्रव्यवहारात आणि नोंदी (records) मध्ये स्वराज्याचा/मराठ्यांचा सावजी असा उल्लेख आढळतो. सातारा भोवती वेढा घातलेल्या मुघलांची मराठ्यांनी केलेल्या लूटीसंदर्भात २ मार्च १७०० रोजी मुंबई वरुन सुरतला गेलेल्या कंपनीच्या पत्रात "The muguls sitting down before Sitora (Satara), and of the Savajees robbing and plundering all about him" [Factory Record's, Bombay Vol.17] मराठ्यांचा सवाजी असा उल्लेख आला आहे.

             २८ नोव्हेंबर १७०७ जुन्नर वरुन थोरल्या शाहूंनी 'दारुगोळा, बंदुका, सैनिक आणि पैशांच्या मदतीसाठी'  इंग्रजांना लिहिलेल्या पत्राचे उत्तर देताना २९ जानेवारी १७०८ ला मुंबईचा जनरल Sir Nich. Waite Knt. शाहूराजांचा "Wise and Valliant Son Raja of Savajees" असा उल्लेख करतो. तर याच पत्रात पुढे मराठा आणि कंपनी यांत असणाऱ्या संबंधांबद्दल जनरल लिहितो "A very Friendly Allyiagnce preserved between the Savajee Rajas and the Honourable the English Company; until the Conajee Angria (Kanhoji Angre) and other little fellows." या पत्रांवरुन लक्षात येते की इंग्रज (कंपनी) मराठ्यांचा आणि छत्रपतींचा सवाजी म्हणून उल्लेख करत असे. मराठ्यांसाठीचा सवाजी हा शब्द देखील Morrattas (मराठा) या प्रचलित शब्दाप्रमाणेच इंग्रजी रेकॉर्डस् मध्ये बऱ्याच वेळेस वापरला आहे.

पण सवाजी हा शब्द मराठ्यांसाठी कसा आला ? 


छत्रपती होण्यापुर्वी शिवाजी महाराजांचा उल्लेख "राजेश्री सिवाजी" असा केला जात असे. समकालीन कवी भूषण देखील आपल्या कवनात शिवरायांचा "सरजा सिवाजी" असा उल्लेख करतो. या सिवाजी (Sivajee) चे लोक म्हणजे "सिवाजीज्"(Sivajee's)  आणि त्याचे अपभ्रंशात्मक रुप म्हणजे "सवाजी किंवा सावजी" (Savajee) ! Savajee या शब्दाचा इंग्रजी उच्चार सिवाजी किंवा सवाजी असा होतो तर त्याचा मराठी उच्चार सावजी असा केला जातो. शिवरायांच्या
मृत्यूनंतर देखील त्यांचे वंशज आणि मराठे हे महाराजांच्याच नावाने "सवाजी" म्हणूनच इंग्रजांमध्ये ओळखले जात होते.

            आज शिवरायांच्या मृत्यूच्या ३४० वर्षांनंतर देखील मराठा नाव घेताच जगभरातील लोकांच्या डोळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांची मुर्ती उभी राहते. असे कधीही न उतरणारे गारुड छत्रपती थोरल्या महाराजांनी लोकांच्या मनावर घातले आहे.

                                 ✍️  स्वप्नील महेंद्र जाधवराव.

रणमस्तबहाद्दर

Comments

Popular posts from this blog

हैबतबाबा पवार आरफळकर

शेखमिरा संस्थान

गावकुसावरील देवता