बाहुलीचं बालपण...
बाहुलीचं बालपण...
कितीतरी वेळ उंबऱ्यावरच बसून मी एकटक रस्त्याकडे बघत होतो. ते निखळ आनंदी चेहरे अजूनही डोळ्यासमोर तसेच तरळत होते.
आमची रोजची सकाळच "वाड माऊशी..." या हाकेने होते. गावातील बेघर वस्तीतील पाच-दहा वर्षांची लहान मुलं हातात एक पिशवी आणि एक किटली घेऊन दररोज सकाळी पोटाची खळगी भरायला शिळं अन्न गोळा करत गावभर फिरतात. त्यांना उन, वारा, पाऊस काहीच बाधत नाही, टिचभर पोटाची भूकच त्यांना या सर्वांपासून वाचवत असेल कदाचित...
आमच्या मम्मीला या मुलांची फार ओढ. अगदी प्रत्येकाला ती त्याच्या नावानिशी ओळखते. दिवाळीचा फराळ असो की रक्षाबंधनाला त्यांना राख्या बांधणं, त्या मुलांसोबत कोणताही सण साजरा करताना तिचा उत्साह काही औरच असतो. गरमागरम चहा किंवा नुकतीच तव्यातून काढलेली चपाती समोर बसवून त्या मुलांना खायला लावणाऱ्या मम्मीचा अनेकदा आम्हा घरच्यांनाही राग येतो, कारण आमच्या आवडीची कोणतीतरी गोष्ट मम्मीने परस्परच त्यांना देऊन टाकलेली असते. पण यामुळेच त्या मुलांना देखील आमचं घर अगदी हक्काचं झालेलं आहे. दर दोन दिवसांतून "मावशे आज पेढा हाय का ?" हा त्यांचा प्रश्न ठरलेलाच असतो आणि तो आमच्या कानावर पडायच्या आतच मम्मी त्यांच्या प्रत्येकाच्या हातावर एकएक पेढा देऊन मोकळी झालेली असते.
ब्रश करत पायरीवर बसलो असतानाच नेहमीप्रमाणे सात वर्षांची एक आणि चार वर्षांची एक अश्या दोन बहिणी दारात उभ्या होत्या. मम्मीने त्यांना चपाती भाजी दिली आणि त्या दोघी जाऊ लागल्या. दोन पावलं चालून गेल्यावर दोघी काही तरी खुसपूस करत उभ्या राहिल्या. मम्मीने ते हेरलं आणि "काय झालं गं" म्हणत त्यांची चौकशी केली. दोघीही जरा गोंधळलेल्या होत्या. कसं बोलू हे कदाचित त्यांना कळत नसावं.. तेवढ्यात त्यातील मोठ्या बहिणीने हिम्मत केली "मावशे तुमच्याकडं यखादी तुटकी भावली हाय का ?" आश्चर्यचकित होऊन मी आणि मम्मी एकमेकांकडे पाहू लागलो. मघाशी त्या मुलींच्या चेहऱ्यावर होता त्या पेक्षा कितीतरी जास्त गोंधळ आमच्या चेहऱ्यावर होता.
आमचे गोंधळलेले चेहरे कदाचित त्या मुलीने देखील ओळखले असतील. त्यामुळेच ती पुढे बोलू लागली "शाळेला सुट्ट्या लागल्यात, ख्यळाय बाहेर गेलं की पुलिस वराडत्यात पण आमाला घरी लय कटाळा येतो. घरी ख्यळाय पण काय नाय, तुमच्याकडं यखादी मुडकी भावली आसल तर द्या की.. आम्हाला ख्यळायला हुईल" अगदी केविलवाण्या चेहऱ्याने ती तिची हकीकत सांगत होती. आम्ही दोघे देखील हतबलतेने त्यांच्याकडे पाहत होतो. कारण लहान कोणी नसल्याने घरात बाहुली असायचा संबंधच नव्हता.
तेवढ्यात हाताची घडी घालून त्या मुलींचं आणि आमचं संभाषण ऐकणारा चार वर्षांचा पुतण्या साई वर नजर गेली. तो शांतपणे आमचं बोलणं ऐकत होता. मम्मीने त्याला जवळ बोलावून त्याची एखादी बाहुली या मुलींना देण्यासाठी घेऊन यायला सांगितली. तो गडी देखील पळत जाऊन एक नाही तर दोन चांगल्या बाहुल्या घेऊन आला आणि आपल्या हाताने त्या मुलींना देऊ लागला. (येवढ्या लहान वयात त्याच्यावर असे संस्कार होतायेत याचा फार आनंद आहे)
बाहुलीला न्याहाळताना त्या बहिणींच्या चेहऱ्यावरील आनंद शब्दात वर्णीत करणे अशक्यच ! दररोज पोटाची भूक भागवण्यासाठी भीक मागणाऱ्या त्या जीवांना आज मनाची भूक भागविण्यासाठी देखील दुसऱ्यांकडे भीकच मागावी लागत होती हे पाहून काळीज हेलावत होतं.. आपण किती सुखी होतो आणि आहे हे तेव्हा पुन्हा जाणवलं.. परिस्थिती मुळे मनाची भूक न भागवू शकणारी अशी कितीतरी पाखरं आपल्या भोवताली असतील. विशेष म्हणजे त्यांची भुक देखील आपल्या सारखी अघोरी नसून अगदीच अल्पशी आहे. या लॉकडाऊनच्या काळात पोटाची भूक भागवणारे दानशूर तर फार भेटतील पण दिवसरात्र टोचत राहणारी मनाची भूक भागवणारा एखादा तरी देवदूत असेल का ? असेच विचार करत कितीतरी वेळ उंबऱ्यावरच बसून मी एकटक रस्त्याकडे बघत होतो. ते निखळ आनंदी चेहरे अजूनही डोळ्यासमोर तसेच तरळत होते.

Comments
Post a Comment