भार्गवराम परशुराम आणि परसबाळ


भार्गवराम, परशूराम आणि परसबाळ

( #परशुराम #Parshuram )

भार्गव अर्थात महर्षी भृगू यांचे वंशज. आचार्य श्रेष्ठ भृगू आणि त्यांच्या वंशजांना अग्नीचे उपासक मानले जाते. आचार्य भृगुऋषी आणि त्यांच्या वंशजांनी आजच्या भडौच अर्थात खम्भातच्या खाडीवर राज्य केले, यामुळे हा परिसर भृगू-कच्छ या नावाने ओळखला जाऊ लागला. (ऋग्वेद 8-10-2-4 , तैत्तरेय संहिता 7-1-8-1, पंच ब्राह्मण 21-10-6, विष्णुधर्म 1-32 तसेच महाभारत अनु. 56) पुढे भडौचचा भूतपूर्व राजा शर्याती याची पुत्री "सुकन्या" हिचा विवाह भृगूपुत्र "महर्षी च्यवन" यांच्याशी लावून दिला गेला. यानंतर भार्गव वंशीय लोक संपूर्ण भारतभर विखूरले गेले आणि याच वंशात ऋषी जमदग्नी पोटी "राम" यांचा जन्म झाला. भार्गव (भृगू) वंशीय असल्याने भार्गवराम हे नाव त्याला प्राप्त झाले. 



                ऋषी ऋचीक यांचे पुत्र ऋषी जमदग्नी आणि रेणू राजाची कन्या रेणूका यांच्या पोटी जन्म झालेल्या रामाने तपश्चर्येने भगवान शिवाकडून  एक परशू (कुऱ्हाड) प्राप्त केली आणि यावरुनच त्याला परशूराम हे नाव प्राप्त झाले. याच परशुरामाने एकवीस वेळा पृथ्वी नि:क्षत्रीय केली असा एक खोटा संभ्रम आहे. मुळात परशुरामाचे वैर हे चंद्रवंशी राजा कार्तवीर्य सहस्त्रार्जुन याच्याशी होते, इतरांशी नाही. या हैहय वंशीय राजाने माहिश्मती (महेश्वर) मध्यप्रदेश येथे राज्य केले. नर्मदेवर धरण बांधून त्याला फोडणाऱ्या रावणाला पराजित करत बंदीवासात टाकणारा हा कार्तवीर्य राजा आज हैहयवंशीय कलचुरी समाजाचे आराध्य दैवत आहे. श्री विष्णूचा सातवा अवतार श्रीराम यांनी सहावा अवतार परशूराम यांचा सितास्वयंवरा नंतर झालेल्या व्दंव्द युद्धात पराभव केला. याच स्वयंवरात परशूराम शिष्य दशानन रावण यांचा देखील श्रीरामाने पराभव केला होता. यानंतर परशूरामाने कोकण भूमीत निवास केला. 

              भार्गवराम किंवा परशूराम या दोन्ही पेक्षा महाराष्ट्राला जवळचे असणारे नाव म्हणजे परसबाळ ! हा परसबाळ जगदंबेचा सुपुत्र. आई यल्लम्मा-रेणुकेपोटी जन्म घेतलेला हा परसूबाळ देवी उपासकांच्या गळ्यातील ताईतच जणू. देवीच्या परडीत बुराड्यांच्या कुमार मुलांनी विनलेला वाटीच्या आकाराचा परसरामच परडीच्या सृजनतेला पुर्णत्व देतो. आईच्या मांडीवर खेळणारा लाडीक परसबाळ येवढीच याची ओळख. 



                एकाच व्यक्तीची विविध‌अंगी नटलेली किंबहुना नटवलेली हि व्यक्तीचित्रणे. सध्या परशुराम कोणी ब्राम्हण होता असाच सर्वांचा ग्रह आहे. पण एखादा व्यक्ती जेव्हा तपोसाधनेने "ऋषी" या पदाला प्राप्त होतो तेव्हा तो वर्णधार्मादी बंधनातून मुक्त झालेला असतो. "नदीचे मुळ आणि ऋषीचे कुळ विचारु नये" हि म्हण याच कारणाने मराठीत रूढ झाली असावी. भार्गव गोत्रीय लोक मुळचे अग्नीचे उपासक यामुळेच त्याकाळी यज्ञादी प्रसंगात पौराहित्य करण्याचे मान हे भार्गव वंशीयांकडे असत. स्वत: आचार्य भृगूऋषींनी प्रजापती दक्ष तसेच धर्मराज युधिष्ठिराने केलेल्या राजसूय यज्ञाचे पौराहित्य केले होते. महर्षी असल्याने राज्यपालन करणारे भृगू क्षत्रिय आणि पौराहित्य करणारे भृगू ब्राम्हण असा भेदाभेद करता येत नाही. पोटातील गर्भासकट क्षत्राणींचा (क्षत्रिय स्रीयांचा) वध करणाऱ्या भाकड कथांमधील नव्हे तर "आरं बाळू, आरं परसू, तुला झोप का येईना... आंबा दमली रं हलवून पाळणा.." या लोकगीतांमधील लडिवाळ परशूराम महाराष्ट्राला अभिप्रेत आहे. हजारो वर्षांपासून हा परशु कोणत्या एका जातीच्या बंधनात अडकला नाही तो महार, मांग, ब्राम्हण, मराठा अशा सर्वांच्याच घरात फक्त अंबिकेचा तान्हा म्हणून पुजला गेला.

यल्लारमाणिक उदं उदं..
परसराममाणिक उदं उदं..
उदं रेणूका उदं‌ उदं...


#रणमस्तबहाद्दर

                                   ✍️ स्वप्नील महेंद्र जाधवराव.

Comments

Popular posts from this blog

हैबतबाबा पवार आरफळकर

शेखमिरा संस्थान

गावकुसावरील देवता