संजीवन गुप्तहेर ०१


संजीवन गुप्तहेर
०१


तो काळच मुळात फार धामधुमीचा होता. सुख, आनंद, चैन या भोगविलासी गोष्टींपेक्षाही फक्त जिवंत राहणे तेव्हा जास्त महत्त्वाचे होते. सर्वत्र रक्ताचे पाट वाहत होते. रणांगणावर पडलेल्या अगणित मृत शरीरांच्या लगद्याला तुडवत एक धीरगंभीर आकृती पाऊले टाकीत होती. सहस्त्र सूर्यांप्रमाणे तेजस्वी असणारा तो चेहरा आज फारच कष्टप्रद दिसत होता. काठोकाठ भरलेल्या दुःखाश्रुंनी डोळ्यांचा बांध फोडला होता. डोळ्यातून ओघळलेले अश्रु गालावरुन खाली वाहत काहीश्या पिकलेल्या काळपट पांढऱ्या दाढीत एकरुप होत होते. डोळे पाण्याने डबडबले असले तरी त्यात एक विलक्षण आग दिसत होती. ती आग होती प्रतिशोधाची ! त्याने परिधान केलेले धवल चंद्रासारखे शुभ्र वस्त्र अनेक ठिकाणी लालबुंद झाले होते. पांढऱ्या पितांबराच्या सोग्यातून रक्ताचे थेंब पाझरत होते. हातात घेतलेल्या एका विशिष्ठ प्रकारच्या काठीवर भार देत त्या भक्कम देहाचे मार्गक्रमण सुरुच होते. कोण होता तो तेजस्वी पुरुष ?


                  तो जगाविरुद्ध जगणारा पुरुष होता भृगूनंदन शुक्र ! सर्व ऋषीगणांच्या विरोधात जात त्याने देवांच्या ऐवजी राक्षसांचा पक्ष निवडला होता. राक्षसांनी देखील त्याला आपला आराध्य मानत शुक्र'चा राक्षसगुरु महर्षी शुक्राचार्य केला होता. त्याने आपले संपूर्ण आयुष्यच या असंघटित जमातीच्या उद्धारासाठी खर्च करायचे ठरवले होते. पण आज त्याच राक्षसांची प्रेते आपल्या पायाखाली तुडवत चाललेला शुक्र कोणत्यातरी ध्येयाने पछाडल्या सारखा दिसत होता. पण... 

                  पण समोरुन कोणीतरी त्याला क्रोधाने पाहत होते. समोरच्या त्या व्यक्तीच्या डोळ्यांतून सुर्यदेव अक्षरशः आग ओकत होता. कपाळावर आठ्यांनी जाळे विणले होते. समोरही तितकाच तेजस्वी पुरुष निश्चलपणे उभा होता. तो समोरचा पुरुष म्हणजे भार्गव शुक्राचा जिवलग मित्र, सहपाठी आणि ऋषी अंगीरसांचा पुत्र बृहस्पती ! एकेकाळी एकाच शरीराचे दोन भाग असल्याप्रमाणे एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे हे दोन मित्र आज परस्परविरोधी शड्डू ठोकून उभे होते. त्यांच्यातील अपरिमित स्नेहाचे शत्रुतेत रुपांतरण व्हायला कारणीभूत होती ती देव'गुरु या पदावर झालेली बृहस्पती याची नियुक्ती !

                   दोन्ही मित्रांची झालेली ती नजरानजर खेद, क्रोध आणि प्रतिशोधाने ओतप्रोत भरलेली होती. देव आणि राक्षसांचा संग्राम आता रोजचाच झाला होता. घमंडी देवतांना शह देत मोजक्या सुज्ञ राक्षसांना हाताशी धरत एक गौरवशाली राक्षस साम्राज्य उभे करण्याचा शुक्राचार्यांचा मानस होता. पण त्रिदेवांच्या मदतीने देवता नेहमीच हे युद्ध जिंकत आले होते. या नित्याच्या युद्धात शेकडो देव-राक्षस मृत्यूमुखी पडत होते पण त्याहूनही कमकुवत अशी मानव ही जमात अकारण बळी जात होती. या सर्वाचा शेवट करायचा निर्धार शुक्राचार्यांनी केला होता. यासाठीच मृत व्यक्तीस जिवंत करणारी "संजिवनी विद्या" प्राप्त करण्याच्या निश्चयाने त्यांनी उत्तरेकडे मार्गक्रमण सुरू केले. 

              पण आपल्या कथेचा नायक तर या सर्वांपासून अगदीच अनभिज्ञ होता. आपल्या आयुष्यात तो पुर्णतः मश्गुल होता. तारुण्याच्या उंबरठ्यावर नुकतंच त्याने आपलं पाऊल ठेवलं होतं. फिकट लाल रंगाच्या ओठांवर तारुण्याची निशाणी असलेलं कोवळं मिसरूड दाट व्हायला सुरुवात झाली होती. नित्याच्या व्यायामामुळे शरीराचा बांधा सुडौल आणि आकर्षित झाला होता. तो श्वेतवर्णी रूपवान देह सहजपणे कोणालाही मोहित करु शकत होता. आश्रमाशेजारुन वाहणाऱ्या वेदवतीच्या पात्रात उभा राहून उगवत्या सूर्याला अर्ध्य देत होता. त्याच्या गळ्यातील रुद्राक्ष माळेवरुन उघड्या शरीरावर टपकणारे पाण्याचे थेंब सुर्यप्रकाश परावर्तित करत होते. मानेवर रुळणारे काळेभोर केस त्याच्या सौंदर्यात अधिकच भर घालत होते. हा मदनाचा पुतळा म्हणजे देवगुरु बृहस्पतीचा पुत्र कच !

               अर्ध्य देताना अचानक त्याची नजर समोर उभ्या असलेल्या आपल्या पित्याकडे बृहस्पती कडे गेली. त्यांना प्रणाम करताच त्यांनी कचवर एक कामगिरी सोपवली. वडिलांनी दिलेली पहिलीच कामगिरी ऐकताना काही काळापूर्वी वेदवतीच्या शितल पाण्यात उभ्या असलेल्या कच ला दरदरून घाम फुटला. त्याच्या डोळ्यांतून अश्रुधारा ओघळू लागल्या..‌. काय असेल ती भयानक कामगिरी ज्याने कच इतका हादरला होता ?

क्रमशः
#रणमस्तबहाद्दर
                                      ✍️ स्वप्नील महेंद्र जाधवराव.


प्रेरणा/संदर्भ : महाभारत, मत्स्य पुराण, अग्नी पुराण 
(टिप : सदरच्या कथेत राक्षस हा दैत्य/असूर/दानव साठी पर्यायी शब्द म्हणून वापरलेला आहे.)

भाग २ : 
https://swapnsutra.blogspot.com/2020/05/blog-post_24.html

Comments

  1. I am very excited about remaining story please complete this story as early as

    ReplyDelete
  2. उत्तम वर्णनात्मक लेखन

    ReplyDelete
  3. मार्मिक . अलंकारिक आणि साहित्यिक शब्द रचना...rada 🔥🔥🔥hwwa keli ya शब्दांनी

    ReplyDelete
  4. दादा
    एका महाकादंबरीचा प्रारंभ
    खूप खूप शुभेच्छा
    💐💐💐💐

    ReplyDelete
  5. स्वप्नील शब्दांची रचना खूप सुंदर आहे.विषय असा आहे की जबाबदारीने लिहावे लागेल. शुभेच्छा.

    ReplyDelete
  6. जाधवराव अगदी अवर्णनीय लिखान

    ReplyDelete
  7. उत्तम लेखनी

    ReplyDelete
  8. खूपच छान मांडणी आहे जाधवराव.. खूप दिवसांनी अशी कथा वाचत आहे.👌🏼👌🏼

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

हैबतबाबा पवार आरफळकर

शेखमिरा संस्थान

गावकुसावरील देवता