संजीवन गुप्तहेर ०२
संजीवन गुप्तहेर
०२
ओंजळीतून पडणाऱ्या प्रत्येक थेंबासोबत "ॐ भूर् भुव: स्व:" हे गायत्री मंत्राचे शब्द हवेत विलीन होत होते. अर्ध्य संपल्यावर त्याने अलगद झुकून सुर्यदेवास नमस्कार केला. कोवळ्या सुर्याच्या किरणांनी त्याचा गोरापान देह हिरण्यवर्णी भासत होता. काठावर उभे असणारे देवगुरु बृहस्पती देखील काही काळ आपल्या पुत्राकडे बघतच राहिले. साक्षात एखाद्या स्वरूपवान गंधर्वानेच आपल्या पोटी जन्म घेतला असवा असा त्यांना भास झाला.
डोळे उघडताच कच'ला त्याच्या पित्याचे दर्शन झाले. पाण्यातून बाहेर येताना काठावर ठेवलेले वस्त्र उजव्या बाजूने आपल्या पाठीवरुन घेत फिरवून डाव्या खांद्यावर टाकत आपल्या पित्याला त्याने प्रणाम केला. कितीतरी दिवसांनी आपल्या पित्याला समोर पाहून कच फारच आनंदी झाला होता. कधी आपले पिता इंद्रदरबारातून माघारी येतील आणि आपण त्यांचे शिष्यत्व पत्करुन ऋषी पदी जाण्याच्या आपल्या ध्येयाच्या बाजूने पहिले पाऊल टाकतोय याची तो गेले अनेक दिवस आतुरतेने वाट पाहत होता. आज तो दिवस उगवल्याने त्याचा चेहरा विलक्षण तेजाने भरला होता. पण बृहस्पतींच्या चेहऱ्यावर चिंतेची एक दाट छटा उमटली होती, जी कचच्या नजरेतून देखील सुटली नाही.
प्रश्नार्थक नजरेने कच आपल्या पित्याकडे पाहत होता. वेदवतीच्या तीरावर विशाल पिंपळवृक्षाखाली असलेल्या विस्तीर्ण पाषाणावर बृहस्पती आसनस्थ झाले. कच देखील त्यांच्या पायाजवळ जाऊन बसला. कितीतरी वेळ शून्यात बघत बृहस्पती शांतपणे बसले होते. कच अजूनही त्याच नजरेने त्यांच्याकडे पाहत होता. शेवटी बृहस्पतींनी बोलायला सुरुवात केली खरी, पण आज त्यांच्या शब्दात कमालीचा जडपणा जाणवत होता. "बाळ कच आता तुझा ऋषी पदी जाण्यासाठीचा अभ्यास सुरु करायची वेळ आली आहे.."
कच देखील याचीच वाट पाहत होता. आनंदीत होत कच "हो बाबा मी तयार आहे. शिष्य म्हणून कधी आपण मला चरणांवर घेताय याचीच मी वाट पाहतोय" असं उद्गारला. त्याला थांबवत बृहस्पती म्हणाले "नाही कच ! मी तुला शिष्य म्हणून स्विकारू शकत नाही." कचच्या पायाखालची जमीन आता सरकू लागली होती. 'आपण आपल्याच पित्याचे शिष्य होण्याच्या योग्यतेचे नाही आहोत का ?' असा विचार करुन तो खिन्न झाला. बृहस्पती पुढे म्हणाले "तुला राक्षसगुरु भृगुनंदन शुक्राचार्यांचे शिष्यत्व पत्करायचे आहे. तेच तुझ्यासाठी माझ्याहून उत्तम गुरू ठरु शकतात." कच आता पुर्णतः भांबावून गेला होता. "शुक्राचार्य..? पण बाबा आपण तर महर्षी आहात. साक्षात देवगुरु आहात... अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला माहित नाही ? अशी कोणती विद्या आहे जी तुमच्याजवळ नाही ?"
"संजीवनी विद्या" बृहस्पतींनी गंभीरपणे एकाच शब्दात उत्तर दिले. कच अवाक् होऊन फक्त पाहतच राहिला होता. "पण हे कसं शक्य आहे ? संजीवनी विद्या फक्त महादेवांना ठाऊक आहे आणि आजवर त्यांनी ती कुणालाही दिली नाही. अक्षरशः देवतांचे वैद्य असणाऱ्या अश्विनीकुमारांना देखील हि विद्या प्राप्त करता आली नाही. सामान्यांसाठी ती विद्या म्हणजे एक दिवास्वप्नच आहे..." "हो.. पण हे स्वप्न आता शुक्राचार्यांनी सत्यात उतरवले आहे ! आजवर अप्राप्य असणारी मृत व्यक्तीस जिवंत करणारी "संजिवनी विद्या" शुक्राचार्यांनी प्राप्त केली आहे" कचला पडणाऱ्या प्रश्नांचे उत्तर देताना बृहस्पती बोलत होते. पण कचच्या मनातील प्रश्न काही केल्या संपण्याचे नाव घेत नव्हते.
"बाबा.. मी देवगुरू बृहस्पतींचा पुत्र आहे, राक्षसगुरु शुक्राचार्य मला संजीवनी विद्या देतील ?" या कचच्या प्रश्नावर त्याचा हात हातात घेत बृहस्पती म्हणाले "बाळ.. राक्षसांचा आणि मानवांचा होणारा अमानुष संहार थांबवून देवतांचा नाश करण्यासाठी शुक्राचार्यांनी अथक परिश्रमाने हि विद्या प्राप्त केली आहे. ते सहजासहजी ती तुला देणार नाहीत... आणि म्हणूनच तुला एक शिष्य नव्हे तर गुप्तहेर बनून शुक्राचार्यांच्या आश्रमात जायचयं... गुरु शिष्याच्या कोणत्याही भावनिक बंधनात न अडकता 'संजीवनी विद्या' हेच तुझं अंतिम ध्येय असायला हवे"
"अंतिम ध्येय ?"
"हो अंतिम ध्येयच..!"
क्रमशः
रणमस्तबहाद्दर
✍️ स्वप्नील महेंद्र जाधवराव.
पहिल्या भागाची लिंक : https://swapnsutra.blogspot.com/2020/05/blog-post_12.html?m=1
भाग तीन :
https://swapnsutra.blogspot.com/2020/05/blog-post_26.html

Mast complete kar
ReplyDeleteस्वप्नील अतिशय उत्तम..पुढील भागाची प्रतीक्षा.....एखादया पौराणिक कादंबरीचा एखादा भाग वाचल्या प्रमाणे वाटत होतं...लिहित रहा.
ReplyDeleteदादा छानच
ReplyDeleteदादा अप्रतिम शब्दरचना
ReplyDeleteछान च दादा एकदम सश्यासारखे वाटतं आहे तुझे लेखन
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDelete