संजीवन गुप्तहेर ०७


संजीवन गुप्तहेर
०७


देवयानीची विविध पुष्पांप्रती असणारी आसक्ती आता कचने पुरेपूर ओळखली होती. त्यातच वर्षातून फक्त एकदाच उमलणारे अतिशय दुर्मिळ असे हे वसंतमुखीचे पुष्प तीचे सर्वात आवडते होते. कचने हिच कडी पकडून आपली योजना आखली होती. आपल्या योजनेत कच इतका व्यग्र झाला होता की आपला शत्रु देखील आपल्यावर नजर ठेवून आहे याचा त्याला विसर पडला होता. दुसऱ्या प्रहरीच कच देवयानीचा निरोप घेऊन निबीड अरण्यात वसंतमुखीच्या शोधात निघून गेला. त्याच्यावर पाळत ठेवून असणारे राक्षस देखील सावध झाले होते. 'देवगुरुंचा पुत्र राक्षसगुरुंचा पट्टशिष्य होतो' हि सल अनेक राक्षसांच्या मनात रुतत होती. 

               दुरवर अरण्यात त्याला वसंतमुखीचा दरवळ जाणवला. तो त्या दिशेने वाटचाल करु लागला. समोर वसंतमुखीचे सुंदर पुष्प कचच्या नजरेस पडले. किती सुंदर होते ते निसर्गाचे धन... पुष्प तोडण्यासाठी कचने आपला हात हळुवारपणे त्याच्या देठास घातला तेवढ्यात खड्गाच्या एका जोरदार प्रहारासह त्या फिकट रंगाच्या पुष्पावर रक्ताची गर्द लाल चिळकांडी उडाली आणि कचची एक भुजा फुलाच्या देठाप्रमाणे तुटून जमीनीवर पडली. कच असह्य वेदनेने तळमळला. तसा तर तो युद्ध विद्येतही पारंगत होता पण आज त्याला प्रतिकार करायचाच नव्हता. सगळ्या घटना त्याच्या योजनेप्रमाणेच घडत आहेत असे त्याला वाटत होते. पण राक्षस देखील त्यांच्या अशा काही स्वतंत्र आणि क्रुर योजना तयार करून असणार हे त्याच्या लक्षात आले नाही. राक्षसांनी झपाझप कचचे हातपाय धडापासून वेगळे केले. त्याच्या छातीवर आणि पोटावर आपल्या शस्त्रांनी अगणित वार केले. कच हे सगळं सहन करायला तयार होता, पण राक्षस आज एवढ्यावरच थांबणार नव्हते त्यांनी कसल्या तरी उग्र दर्पाचा चिवट पदार्थ त्याच्या अर्धमेल्या शरीरावर ओतला आणि त्याला अग्नीच्या स्वाधीन केले. यज्ञकुंडातील समिधांप्रमाणे त्याचे शरीर अग्नीने गिळंकृत केले होते. 



                या सर्वच गोष्टींपासून अनभिज्ञ असणाऱ्या आश्रमात एक आनंदाचे वातावरण होते. काही राक्षसपुत्रांनी आचार्यांसाठी विशिष्ट पद्धतीचे एक पेय बनवले होते. आचार्य त्याचा आस्वाद घेण्यात गुंग‌ होते. इकडे देवयानी सुकर्णला घेऊन कचच्या शोधासाठी अरण्यात गेली होती. अरण्यात कुठेच त्यांना कचचा मागोवा लागत नव्हता. तेवढ्यात त्यांना वसंतमुखी पुष्पाच्या सुगंधाने खुनावले. कच याच दिशेने गेला असणार अशी चाहूल त्यांना लागली. त्या दिशेने पुढे गेल्यावर कचचे अंगवस्त्र एका झाडाच्या फांदीत अडकलेले आढळले. समोर वसंतमुखीच्या फिकट रंगाच्या पुष्पावर पडलेल्या गर्द लाल रंगाच्या रक्त बिंदूंनी देवयानीचे लक्ष वेधून घेतले. जवळच काही तरी जाळल्याचे अवशेष होते, पण त्याची राख आजूबाजूला कुठेच दिसत नव्हती. या ठिकाणी नक्की काय घडले असावे हे त्या दोघांच्याही लक्षात येत नव्हते. 

              त्यांनी पुन्हा सर्व अरण्य शोधण्यास सुरुवात केली. त्या निबीड शांत अरण्याला आता अंधाराने पुर्णतः ग्रासले होते. ते घनदाट अरण्य अधिकच भयावह वाटत होते. सुकर्ण आणि देवयानीने शेवटी परतीचा रस्ता धरला. 'तिघे अचानक कुठे गायब झाले' या विचाराने इकडे आश्रमातही कल्लोळ उठला होता. त्या दोघांना पुन्हा आश्रमात आलेले पाहून आचार्यांच्या जिवात जीव आला. पण आचार्यांची प्रश्नार्थक नजर 'कच कोठे आहे ?' हेच विचारत होती. देवयानीने घडलेला घटनाक्रम शुक्राचार्यांच्या कानावर घातला. शुक्राचार्यांना देखील काही काळासाठी काय करावे हे समजेनासे झाले. "बाबा.. इथे कच अनेकांच्या डोळ्यांत खुपत होता. त्याच्यासोबत नक्कीच काहीतरी घातपात केला असणार.." देवयानी उद्वीग्णपणे बोलत होती. 

              राक्षसगुरुंना देखील याची जाणीव होती त्यामुळेच ते शांतपणे ऐकत होते. देवयानी पुढे बोलू लागली "बाबा.. तुम्ही तर अस्थींना देखील पुनः जिवीत करु शकता..! आता आपणच काहीतरी करा.." "अगं हो पण.. कचचा मृतदेह देखील आपल्याला मिळाला नाही. मग त्याला पुनः जिवंत करुन मी माझ्या शिष्यांच्या पापाचे प्रायश्चित्त कसे घेऊ ?" रात्रभर वाद प्रतिवाद केल्यावर सुर्योदयाबरोबर शुक्र देवयानीला घेऊन आपल्या संजिवन प्रयोगाच्या पर्णकुटीमध्ये गेले. तेथील पिठासणावर आसनस्थ होत ध्यानस्थ झाले आणि कचचे आवाहन करु लागले. थोड्याच वेळात त्यांच्या सर्वांगाला दरदरून घाम फुटला. चेहरा रागाने लालबुंद झाला. हाताच्या मुठी वळल्या. डोळ्यांतून अश्रूधारा ओघळू लागल्या. बाहू स्फुरण पावले.. इतके की त्यावर बांधलेली रुद्राक्षमाला तुटून रुद्राक्ष सर्वत्र विखुरले गेले आणि त्यांनी खाड्कण डोळे उघडले. 

              पित्याचा असा अवतार पाहून देवयानी देखील भयभीत झाली. "देवयानी मला माफ कर ! मी कचला जीवंत करु शकत नाही." शुक्राचार्य खजीलपणे म्हणाले. "पण का बाबा ?" देवयानी संभ्रमित होऊन म्हणाली. "देवयानी फार मोठा अनर्थ घडला आहे. माझ्या शिष्यांनी माझ्यासोबत फार मोठा छळ केला आहे. आज सकाळी राक्षसकुमारांनी मला अर्पण केलेल्या पेयामध्ये कचच्या अस्थी मिश्रीत होत्या." पित्याचे हे शब्द ऐकताना दुःख,राग आणि आश्चर्य या संमिश्र भावनेने देवयानीने डोळे विस्फारले.. संपुर्ण घटनाक्रम आता दोघांच्याही लक्षात येऊ लागला. 'कचचा वध करुन त्याचा मृतदेह पेटवायचा आणि त्याच्या अस्थींनी बनवलेले पेय शुक्राचार्यांना अर्पण करायचे. ज्यानेकरुन तो पुन्हा जिवंत होणार नाही' हि राक्षसांची योजना यशस्वी ठरली होती.

               आपले हुंदके आवरत देवयानी विचारु लागली "बाबा आता काय..?" देवयानीचा कचप्रती स्नेह ओळखून आचार्य बोलू लागले "बाळ तुला म आणि कच पैकी कोणा एकाची निवड करावी लागेल..!" "नाही बाबा.. मला तुम्ही दोघेही हवे आहात.." देवयानी आता अकंठ दुःख सागरात बुडाली होती. "बाबा काही तरी मार्ग काढा ना.." असे आर्जव ती वारंवार करु लागली. देवयानीचा शिघ्रकोपीपणा पाहता ती संजीवनी विद्येच्या योग्यतेची नव्हती त्यामुळे शुक्राचार्यांपुढे शेवटचा पर्याय होता तो म्हणजे कचच्या मृत आत्म्यास संजीवनी विद्या शिकवणे..! राक्षसगुरु पुन्हा ध्यानस्थ झाले आणि त्यांनी संजीवनी विद्येची दिक्षा कचला दिली. अस्पष्ट अक्षरे पुटपुटत त्यांनी संजीवनी विद्येच्या प्रयोगाला सुरुवात केली. आणि मंत्राच्या शेवटच्या अक्षरासह ढाडकन ते जमीनीवर कोसळले. त्यांच्या पोटातून रक्ताचे पाट वाहू लागले आणि त्यातून कच पुन्हा जिवीत झाला. 

                   आता या त्रिलोकात महादेवा व्यतिरीक्त कच हाच एकमेव संजीवनी विद्येचा आश्रयदाता होता. आपली उद्दिष्टपुर्ती झाली हि भावना त्याच्या चेहऱ्यावर तेज बनून ओसंडत होती. संजीवन विद्येसोबतच अनाहूतपणे राक्षसगुरुंचा‌ देखील मृत्यू झाला होता. राक्षसगुरुंचा मृत्यू म्हणजे राक्षसांच्या एकात्मतेचा आणि पर्यायाने राक्षसांचाच सर्वनाश होता. एकाच दगडात दोन पक्षी मारले गेले होते. पण..

क्रमशः
रणमस्तबहाद्दर

                                          ✍️ स्वप्नील महेंद्र जाधवराव.



भाग ०८ :
https://swapnsutra.blogspot.com/2020/06/blog-post_10.html


सुरुवाती पासून वाचण्यासाठी :
https://swapnsutra.blogspot.com/?m=1
                

Comments

  1. खूप छान नेहमीपर्णाने
    शुभेच्छा

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

हैबतबाबा पवार आरफळकर

शेखमिरा संस्थान

गावकुसावरील देवता