सातपाटील कुलवृत्तांत
सातपाटील कुलवृत्तांत
माणूस हा मुळातच भटका प्राणी..! शेतीचा शोध लावून त्याने काहीशी स्थिरता शोधाण्याचा प्रयत्न केला खरा, पण ते त्याला अजूनही जमले नाही हे आजही मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या स्थलांतरांवरुन अगदीच स्पष्ट आहे.
तब्बल ८०० पानांच्या "सातपाटील कुलवृत्तांत" मध्ये अशी अनेको संक्रमणे सामावून घेताना लेखक रंगनाथ पठारे यांनी वाचकांना ७०० वर्षांच्या कालभ्रमंती सोबत इंग्लंड, अफगाणिस्तान पासून सातारच्या करंजे गावापर्यंतची स्थलभ्रमंती अगदी सहजपणे घडवून आणली आहे. विशेष म्हणजे इतका मोठा आवाका असूनही कोणताही धागा कुठेही सुटताना दिसत नाही. प्रत्येक घटना आणि पात्र गुलमोशीच्या फुलात फुल गुंफून तयार केलेल्या सुंदर हाराप्रमाणे हळूवार गुंतवलेले आहे. कादंबरीतील पहिले पात्र श्रीपती हे देवगिरी सत्तेच्या अखेरच्या काळातील तर शेवटचे पात्र देवनाथ एकविसाव्या शतकातील असूनही कुठेही सांस्कृतिक सरमिसळ झालेली दिसून येत नाही. याऊलट साहेबराव, दसरत, जानराव, रखमाजी, पिराजी, शंभुराव या सर्व नायकांचे अनुक्रमे निजामशाही, पानिपत युद्ध, दुसऱ्या बाजीरावाचा काळ, इंग्रज सत्ता या विविध कालखंडातील ऐतिहासिक पार्श्वभूमी सोबत केलेले व्यक्ती आणि समाज चित्रण वाचकांस बांधून ठेवते.
सर्व नायकांमधील स्त्री दाक्षिण्य हा समान दुवा असला तरी त्यात कालानुरुप होत गेलेले चढउतार उल्लेखनीय आहेत. पत्नी, मैत्रिण, रखेल या प्रत्येकच रुपातील त्याच्या उत्तरकालीन 'ती'चा जरब अनाहुत अंगवळणी पडणारा आहे. लेखकाची दुसरी प्रभावी बाजू म्हणजे त्यांनी मांडलेला वृद्धापकाळ... आयुष्याच्या संध्याकाळी कर्माच्या चोपडीवरील बेरीज वजाबाकीचा हिशोब मांडतांना आलेला क्षीणपणा, अपराधी भाव आणि हतबलता पठारेंनी सुंदरपणे हाताळली आहे. नानाविध घटनांनी भरलेले आयुष्य रेखाटाना विविध पात्रांच्या विविध छटा सहजपणे पचनी पडतील इतक्या सुलभ आहेत. पण अनेक अनपेक्षित घटनांचा क्रम डोळ्यापुढे सर्रकन उभा करुन लेखक वाचकास विस्मीत करायला कुठेही कमी पडला नाही. त्या घटनेतून अगदी विरुद्ध टोकाला पोहचलेले आयुष्य पुन्हा पहिल्या टोकाशी जोडताना लेखकाने वापरलेले कसब वाखाणण्याजोगे आहे. सरतेशेवटी कादंबरीची सर्वात जमेची बाजू म्हणजे ८०० पानांत प्रत्येकच घटनेची एकमेकांशी घातलेली उत्तम सांगड हीच ठरते...
या कादंबरीबद्दल खूप ऐकलं आणि वाचलं होतं. अशातच काही दिवसांपूर्वी पत्रकार राहूल काका तांबोळी यांचे स्टेटस पाहून ती त्यांच्याकडून हक्काने मागून घेतली. दुसऱ्या दिवशी सकाळीच कादंबरी घेऊन काका दारात हजर होते पण ती देताना "दादा, मस्त कादंबरी आहे, मी तीन दिवसांत वाचून काढलीये तुला पाच दिवस देतो.. पुढे खूप नंबर लागलेत" अशी डेडलाइनची तलवार टांगून गेले. तरीही आपली चव घेत घेत खाण्याची रसग्रहण वृत्ती न सोडता मी ती डेडलाइन दुप्पट लांबवली. याला कारण देखील हिच कादंबरी आहे. कारण याचा लेखक स्वत:च्या जागेवर आपल्याला नकळत आकृष्ट करतो. अनाहूतपणे आपणही आपल्या पुर्वजांची पिठीका धुंडाळू लागतो. शुद्ध वंशाचा आणि श्रेष्ठत्वाचा दंभ ठेचत लेखक आपल्या पुर्वजांच्या दंतकथांचे मलभ आपल्याच मेंदूवर गुरफटण्यात यशस्वी ठरतो. सेऊनदेश, देवगिरी, लासणूर, सिंदखेडराजा, पुणे, भुईंज याचसोबत यादव-जाधव-जाधवराव हा माझ्या पुर्वजांचा प्रवास देखील असाच विस्मयकारक घटनांनी भरलेला असणार याच विचारात मी "इतिहास फक्त पराक्रम लिहितो पण तो खाजगी आयुष्यापासून अगदीच गाफील असतो" हे तत्त्व अलगद मान्य करत लहानपणी ऐकलेल्या दंतकथा आठवू पाहत होतो. याच काळात काही अ-मराठा मित्रांसोबत या संक्रमणाच्या अनुषंगाने झालेली चर्चा देखील फार रंजक ठरली.
स्वतःच्या पुर्वजांचा इतिहास पुन्हा उलगडू पाहणाऱ्या माझ्या सारख्याला या कादंबरीने बांधून घेतले नसते तर नवलच..! बाकी हि कादंबरी कायमच संग्रही राहिल यात शंकाच नाही..
#रणमस्तबहाद्दर
✍️ स्वप्नील महेंद्र जाधवराव.
#आवडलेलंपुस्तक ❤️
#नक्कीवाचा

प्रिय स्वप्नील, या कादंबरीने भुरळ पडली आहेच पण तुमच्या या परिक्षणाने वेगळी ओळख करून दिली. अतिशय लहान वयात असणारी दृष्टी, समज थक्क करणारी, खूप कौतुक वाचते रहा, लिहिते रहा
ReplyDelete