एकाच वेळी राज्य करणारे एकाच नावाचे मराठ्यांचे दोन छत्रपती...
एकाच वेळी राज्य करणारे एकाच नावाचे मराठ्यांचे दोन छत्रपती...
एकाच नावाच्या दोन भावांबद्दल तुम्ही कधी ऐकले आहे का ?
महाराष्ट्रावर एकाच वेळी दोन सख्ख्या चुलत भावांनी राज्य केले आहे. निसर्गतः हे दोन्ही बंधु एकमेकांचे प्रबळ विरोधकही होते हे वेगळं सांगायला नको.
आपल्या पुर्वजांची नावे येणाऱ्या पिढीला देण्याची परंपरा जगभरात फार पूर्वीपासून आहे. त्यामुळे एकाच घराण्यात एकच नाव पुन्हा वापरल्याचे दिसून येते. पण एकाच पिढीत एकच नाव दोन भावांना दिल्याचे दुसरे कोणते उदाहरण ऐकिवात नाही. छत्रपती घराणेही या प्रथेस अपवाद नाही. पण एक नाव ज्याने एकाच वेळी दोन राज्यांची स्थापना केली ते नाव म्हणजे....
"छत्रपती शिवाजी दुसरे"
खरंतर या नावाची जादूच ही और आहे. स्वराज्याची स्थापना करणारे शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज ! त्यांचे नाव आपल्या आपत्यास देण्याच मोह कुणाला होणार नाही. त्यातही हा मोह शिवरायांच्याच मुलांनाच झाला नसता तर आणखी नवल..
आपला मुलगा देखील आपल्या पित्याप्रमाणे कर्तृत्ववान व्हावा याच इच्छेने शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती राजाराम महाराज या दोघांनीही आपल्या मुलांची नावे "शिवाजी" अशी ठेवली. इतिहासात हे दोन्ही शिवाजी 'छत्रपती शिवाजी दुसरे' या नावाने अजरामर झाले.
शंभुराजे आणि महाराणी येसूबाई यांना १८ मे १६८२ रोजी गांगवली, मानगाव येथे पुत्ररत्न प्राप्त झाले. शिवरायांच्या स्मृतीप्रीत्यर्थ त्यांचे नाव शंभुराजेंनी आपल्या पुत्रास दिले. इतिहासात हे शिवाजी 'छत्रपती शाहू महाराज' या नावाने प्रसिद्ध असले तरी त्यांचे मुळ नाव शिवाजी असल्याचे अनेक पुरावे मिळतात. यापैकी सर्वात महत्त्वाचा पुरावा म्हणजे शाहूंची राजमुद्रा..
वर्धिष्णुर्विक्रमे विष्णोः |
सा मूर्तिरिव वामनी | शंभूसुतोरिव |
मुद्रा शिवराजस्य राजते ||
(अर्थ : विष्णुरूपी वामनाच्या वाढत जाणाऱ्या मुर्तीप्रमाणे संभाजीचा पुत्र "शिवाजी" ची मुद्रा राज्य {राज्यविस्तार} करो )
![]() |
| छत्रपती शिवाजी दुसरे (शाहू महाराज) यांची राजमुद्रा |
सदरहू मुद्रेतून शंभुपुत्राचे "शिवाजी" हे नाव अगदी स्पष्ट होते. वयाच्या सातव्या वर्षी हे बाल शिवाजी औरंगजेबाच्या कैदेत पडले. त्यावेळी औरंगजेबाने त्यांचे नाव बदलून "शाहू" असे नामकरण केले व 'राजा' हा किताब दिला. ज्या 'पहाडी चूहा'ने त्याला इतके सळो की पळो केले त्यांचे शंभुपुत्राला दिलेले नाव औरंगजेबाने बदलून घेतले यात काही विशेष नाही. काही अभ्यासकांच्या मते शहाजीराजे यांचे नावावरुन शाहू हे नाव औरंगजेबाने घेतले असावे. पण कपटी औरंगजेबाचे भोंसले घराण्यासोबतचे वैर बघता तो इतकी सहृदयता दाखवेल असे वाटत नाही.
![]() |
| छत्रपती शिवाजी दुसरे तथा शाहूमहाराज सातारा |
हे दुसरे शिवाजी (शाहू) आपल्या आजोबांइतकेच पराक्रमी ठरले. नेतृत्व, संघटन कौशल्य, राज्यकारभार कुशलता यांचे जोरावर त्यांनी संपूर्ण राज्य केले. स्वराज्याचे मराठा साम्राज्यात रुपांतरण केले. शाहू १२ जानेवारी १७०८ रोजी अजिंक्यतारा (सातारा) येथे स्वत:स राज्याभिषेक करवून घेत छत्रपती झाले. १५ डिसेंबर १७४९ रोजी राजधानी सातारा येथे त्यांना देवाज्ञा झाली.
११ मार्च १६८९ रोजी छत्रपती संभाजी महाराजांची हत्या झाली आणि काहीच दिवसांत जुल्फिकार खानाने रायगडास वेढा घातला. त्या वेढ्यातून सुटून जात छत्रपती राजाराम महाराजांनी जिंजी येथे आपली राजधानी हलवली. इथेच 6जून १६९६ रोजी महाराणी ताराबाई आणि राजाराम महाराजांना झालेल्या सुपुत्रास देखील "शिवाजी" असे नामकरण करण्यात आले.
![]() |
| छत्रपती शिवाजी दुसरे कोल्हापूर (काहींच्या मते हे छत्रपती शाहूंचेच उत्तरकालीन चित्र आहे.) |
३ मार्च १७०० रोजी राजाराम महाराजांचे सिंहगडावर निधन झाले. औरंगजेबाचे दुष्ट कालचक्र स्वराज्यावर घोंगावत असताना वयाच्या चौथ्या वर्षी या बाल शिवाजींना स्वराज्याचे छत्रपती घोषित करुन राज्यकारभाराची सुत्रे ताराबाईंनी आपल्या हाती घेतली. या शिवाजींची राजमुद्रा शककर्ते शिवराय यांच्याशी साधर्म्य दाखवणारी होती.
"प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता
रामसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते |"
( अर्थ : ज्याप्रमाणे प्रतिपदेचा चंद्र वाढत जातो, आणि साऱ्या विश्वात वंदनीय होतो, तशीच रामाचा (राजाराम) पुत्र शिवाजी याची मुद्रा कल्याणकारी राज्य करील. )
![]() |
| छत्रपती शिवाजी दुसरे कोल्हापूर यांची राजमुद्रा |
१७०७ रोजी शाहूंच्या सुटकेनंतर छत्रपती घराण्यात गादीवरुन अंतर्गत कलह माजला. यातूनच १७१० मध्ये ताराराणी आणि दुसऱ्या शिवाजींनी कोल्हापूर गादीची स्थापना केली. इ.स. १७१४ मध्ये अंतर्गत बंड करत राजारामांचे दुसरे सुपुत्र 'संभाजी दुसरे' यांनी कोल्हापूरचे राज्य आपल्या ताब्यात घेतले व ताराराणी व शिवाजी दुसरे या मायलेकांना कैदेत टाकले. याच कैदेत असताना रायगड येथे १४ मार्च १७२६ रोजी त्यांचे निधन झाले. या दुसऱ्या शिवरायांची कारकीर्द आपल्या पित्याप्रमाणेच अल्प आणि धामधुमीची ठरली.
हे दुसरे शिवाजी कोल्हापूर गादीचे संस्थापक असल्याने त्यांना तिकडे 'थोरले शिवाजी' तर शिवरायांना 'शककर्ते शिवाजी' म्हणून ओळखले जाते. पण छत्रपती घराण्याची वंशावळ पाहता अभ्यासकांमध्ये हे 'दुसरे शिवाजी' या नावानेच प्रसिद्ध आहेत.
विशेष बाब म्हणजे ताराबाईंच्या सल्ल्याने सातारचे दुसरे शिवाजी (शाहू) महाराजांनी त्यांच्या उत्तर काळात कोल्हापूरचे दुसरे शिवाजी यांचे चिरंजीव "रामराजा" यांना आपला उत्तराधिकारी घोषित केले. शाहूंच्या मृत्यूनंतर इ.स.१७४९ रोजी दुसऱ्या शिवाजींचे सुपुत्र दुसऱ्या शिवाजींचे दत्तकपुत्र म्हणून मराठा साम्राज्याचे छत्रपती होत सातारा गादीवर विराजमान झाले.
✍️ स्वप्नील महेंद्र जाधवराव.
रणमस्तबहाद्दर






खरच खूप महत्वपूर्ण माहिती दिली सर
ReplyDelete