पापविनाशक भृगुतीर्थ
भुईंज (ता.वाई जि.सातारा) च्या सौंदर्याचा गाभा म्हणजे कृष्णामाईचा घाट..! याच घाटावरील बुरुजावर हि मुर्ती कितीतरी काळापासून दुर्लक्षित आहे. खरंतर भुईंज या परिसराला फार मोठा धार्मिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. पण तरीही भुईंजचा धार्मिक इतिहास हा भृगुऋषी या नावापासून सुरु होऊन शेवटी भृगुऋषी याच नावाजवळच येऊन थांबतो...
![]() |
| गरुड आणि मारुतीसह लक्ष्मीवल्लभ श्रीहरी विष्णू |
हि मुर्ती आहे लक्ष्मीवल्लभ श्रीहरी विष्णुची..! समपाद अवस्थेत उभ्या असणाऱ्या चतुर्भुज मुर्तीच्या वरच्या उजव्या हातात चक्र तर डाव्या हातात शंख धारण केले असून खालच्या उजव्या हातात गदा (दंड) आणि डाव्या हाताने कटीवर बसलेल्या लक्ष्मीला सांभाळले आहे. या लक्ष्मी वल्लभाच्या उजव्या बाजूस गरुड तर डावीकडे हनुमान नमस्कार मुद्रेत उभे आहेत. विष्णु, गरुड आणि मारुतीने मुकुट परिधान केले असून लक्ष्मीच्या डोक्यावर मुकुट नाही तसेच कोणाच्याही गळ्यात व शरीरावर कोणतेही अलंकार दिसून येत नाहीत. (किंवा कालौघात नष्ट झाले असावेत.)
पण प्रश्न तर हा येतो की हि मुर्ती इथे का व कशी ?
या प्रश्नाचे उत्तर आपल्याला घेऊन जाते स्कंदपुराण आणि मार्कंडेय पुराणात..
'त्रिदेवांच्या परिक्षेनंतर महर्षी भृगू भुईंज क्षेत्री आले आणि समाधिस्थ झाले. त्यांच्या पाठोपाठ वैकुंठस्वामिनी जगदंबा महालक्ष्मी या क्षेत्री आली' हि कथा तर सर्वश्रुत आहे. पण हा घटनाक्रम इतका सरळ आणि एका दिवसांत घडलेला नाही. स्कंदपुराणांतर्गत येणाऱ्या कृष्णामहात्म्यातील 'भार्गवतीर्थवर्णनं' नावाचा 'भुईंज' या तिर्थक्षेत्राशी संबंधित असलेला ४८ वा अध्याय या घटनाक्रमाबद्दल आपल्याला सखोल माहिती देतो.
ती माहिती अशी, की - सावित्री नदीकाठी सर्व ऋषीमुनींनी एकत्रितपणे योजलेल्या महायज्ञाचा यज्ञवेदी (प्रमुख) कोण असावा यासाठी देवत्रयींमध्ये सर्वश्रेष्ठ कोण हे ठरवण्याची महत्त्वाची जबाबदारी भृगुंवर होती. त्याच परीक्षेवेळी त्यांनी श्रीहरी विष्णुला छातीवर लाथ मारली. तरीही क्रोधित न होता विष्णूने त्यांना वंदन केले, आणि हिच गोष्ट विष्णुची महत्ता दाखवायला पुरेशी होती. पण पुढे जाऊन हि गोष्ट जेव्हा त्यांनी सर्व ऋषींना सांगितली तेव्हा
ऐसी भृगूची ऐकोनि बोली ॥ म्हणे तयाला ऋषिमंडळी ॥ साक्षात अच्युत तया मारिली ॥ लाथ कैसा पवित्र तू ॥११॥
जयाचे ऐकता भक्तचरित्र ॥ पापवर्तता होय वज्र ॥ तया मारिता लाथ रे विप्र ॥ अससी कैसा पवित्र तू ॥१२॥
असे म्हणत सर्वांनी भृगुंना दुषणे दिली. खिन्न झालेल्या भृगुऋषींनी "मला पुन्हा पावन होण्याचा मार्ग सांगा" म्हणून सर्व सर्वांना विनंती केली. यावर सर्वांनी एकमुखाने कृष्णाकाठी असणाऱ्या, "विश्वतारक" अशा तीर्थाची माहिती दिली व "तिथे जाऊन स्नान कर, तपश्र्चर्या कर त्याने तू पाप मुक्त होशील आणि पुढे जाऊन ते तीर्थ तुझ्याच नावाने प्रसिद्ध होईल" असे सांगितले. (गावाच्या भुईंज या नावामागचा अर्थ याच ओळींमध्ये आहे.) पश्चिम पुुुुर्व वाहणारी कृष्णा नदी या ठिकाणी उत्तर दक्षिण होते. भुईंजजवळ कृष्णामाई चंद्राकार (चंद्रकोरीप्रमाणे) वळण घेते. असे चंद्राकार वळण हिंदू धर्मामध्ये अतिशय पवित्र मानले जाते. अशाच वळणामुळे पंढरपूर मध्ये भीमा नदी 'चंद्रभागा' नामाधिमान पावली..
![]() |
| आचार्य भृगुऋषी महाराज समाधी मठ, भुईंज |
त्यानंतर आचार्य भृगुऋषींनी या ठिकाणी येऊन अनेक वर्षे खडतर तपश्चर्या केली. आणि एकदिवशी संत निवृत्तीनाथांच्या अभंगाप्रमाणे -
"उगवले बिंब। प्रगटले स्वयंभ॥
नाम हे सुलभ। विठ्ठलराज॥"
असे साक्षात जगत्पालक भगवान श्रीहरी विष्णु या धरतीवर भृगुप्रेमाने प्रकट झाले आणि "तुम्ही पाप मुक्त झालात" असे त्यांना सांगून अंतर्धान पावले... भुईंजच्या जन्माची हिच कथा हि छोटीशी मुर्ती आपणांस सांगून जाते.
![]() |
| घाटावरील लक्ष्मीवल्लभ मुर्तीचे अंदाज चित्र |
सदरची मुर्ती तितकीशी जुनी नाहिये पण शे पाचशे वर्षांपूर्वी या सर्व घटनेच्या माहितीगाराने तिथे तिची निर्मीती केली. याच आधारावर भृगुंनी स्नान केलेले कृष्णा नदीतील पापविनाशी तिर्थ हे दोन नंबरच्या घाटावर 'कृष्णाई गणेशाच्या' उजव्या बाजूस आहे हे आपण ठामपणे सांगू शकतो.
पुढे जाऊन या तीर्थाचे महत्त्व सांगताना स्कंदपुराणातील कृष्णामहात्म्यात "या तीर्थातील स्नानाने ब्रह्महत्येसारखे महापाप देखील धुवून जाते" असे वर्णन येते. तर मार्कंडेय पुराणानुसार 'या तीर्थात स्नान करुन भृगुऋषींच्या समाधीचे दर्शन घेतल्याने सर्व "ग्रहपीडा" दूर होते' अशी माहिती मिळते. सदर धारणेला खगोलशास्त्र आणि फलज्योतिष शास्त्रातील त्यांचे अतुलनीय योगदान, 'भृगुसंहिता' ग्रंथ तसेच जगाच्या भुगोलाची रचना व नियमन भृगुंनी केली हि मान्यता कारणीभूत असावी.
![]() |
| कृष्णामाई घाट.. समोर दिसणाऱ्या याच बुरुजावर श्री विष्णूची मूर्ती आहे. |
कृष्णाघाट हे माझ्या निवांतपणाचं हक्काचं ठिकाण.. तिथल्या अनेक गोष्टी मी कायम निरखून पाहत असतो, त्यातून नेहमीच नवनवीन माहिती हाती लागते. आज अशाच या छोट्याशा दुर्लक्षित मुर्तीने भुईंज मधील लक्ष्मीवल्लभ श्रीहरी विष्णु व भृगुऋषींचे अस्तित्व, सर्व पापांपासून मुक्ती देणारे पावन तीर्थ आणि विशेष म्हणजे आपल्या गावाच्या नावाचा अर्थ या अनेक गोष्टींचा उलगडा केला...
कधी भुईंजला आलात तर या लक्ष्मीवल्लभाला अवश्य भेट द्या..
#रणमस्तबहाद्दर
✍🏻 स्वप्नील महेंद्र जाधवराव.




Nice information swapnil ..
ReplyDeleteJabardast ❤️🤗
ReplyDeleteखूपच छान भाऊ.. नवीन माहिती मिळाली. ����
ReplyDeleteछान माहिती दिलीस स्वप्निल
ReplyDeleteVery nice information.
ReplyDeleteBhuinj बदल सविस्तर माहिती दिली ही माहिती मला कळायला मी bhuinj कर असुन सुद्धा 64 वर्षे या लागले
ReplyDeleteVery nice me bhuinj kar
ReplyDeleteसुंदर माहिती दिली आहे..
ReplyDeleteNice information
ReplyDeleteinformative Article😊 thank you
ReplyDelete👌🏻👌🏻👌🏻👍
ReplyDeleteमि ही भुईंजची असुन मला काहीच माहित
ReplyDeleteनव्हते आता गेले तर आवर्जून दर्शन घेईन
धन्यवाद स्वप्निल खुप, छान माहिती दिली