कौलं..
खरंतर हि कौलं फार उपयुक्त..! उन्हाळ्याच्या दिवसांत पत्र्यामध्ये जाणवणारी धग या कौलात कधीच जाणवत नाही, तर हिवाळ्याच्या रात्रींमध्ये हि कौलं घराला उबदारपणा देतात. आमच्या वाड्याच्या बहुतांश भागात काळी खापरी कौलं होती तर नव्याने बांधलेल्या एका खोलीवर बँगलोरी कौलं होतं.. बँगलोरी कौलं खापरी कौलांपेक्षा जास्त मजबूत व आकर्षक असल्याने नंतर सर्वत्र त्यांचीच मागणी जास्त वाढत गेली. लहानपणी मुख्य गावातील बहुतांश घरं आणि वाड्यांवर हि काळी किंवा लाल कौलंच आपली सावली धरुन असायची..! येवढच काय तर या खापरी कौलांवर भाजून केले जाणारे कितीतरी पदार्थ त्याकाळी प्रसिद्ध होते..
पावसाळ्याच्या सुरुवातीला कुंभाराचा एक व्यक्ती न चूकता येवून उन्हाळ्यात माकडांनी केलेला उच्छाद निस्तरुन घर शेकरुन जायचा.. अशा व्यक्ती प्रत्येक गावात अगदी हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्याच असायच्या, कारण हे काम फारच कलात्मकतेने संथपणे आणि संयमाने करायची गरज असायची. त्या कुंभाराचं घर जवळच असल तरी त्या दिवशीचा त्याचा चहा नाष्टा ते जेवण सगळंच आमच्या घरी ठरलेलं असायचं हे नक्की..
स्वयंपाकाच्या खोलीवर कौलात धूर जाण्यासाठी केलेली एक छोटीशी चिमणी होती. त्यात खरोखरच चिमणी राहते असं लहानपणी वाटायचं. त्याच्याच शेजारी पडद्याआड गेलेल्या दूरदर्शनच्या पडद्याची आठवण म्हणून जुना अँटिना कितीतरी वर्षे तसाच पडलेला होता.. कौलांच्या मध्ये कुठे रंगीत तर कुठे साध्या (पांढऱ्या) काचा बसवलेल्या होत्या ज्यातून येणारा दिवसा सुर्याचा आणि रात्री चंद्राचा प्रकाश आणि त्यात उडणारे धुलीकण मनातील बालपणाचा एक कोपरा नेहमी ओलावायचे.
दुर्दैवाने आधुनिकीकरणाच्या नावाखाली या सगळ्या गोष्टी कालौघात गेल्यात.. पण आजही पावसाळ्याच्या सुरुवातीला तो कौलं शेकारणारा कुंभार न चुकता घरी येतो.. कमीतकमी हक्काचा चहा प्यायला तरी...!
#रणमस्तबहाद्दर
✍🏻 स्वप्नील महेंद्र जाधवराव.

Comments
Post a Comment