आईसाहेब म्हाळसाबाई लखुजीराजे जाधवराव.

 महाराष्ट्राची अज्ञात वीरांगणा,

आईसाहेब म्हाळसाबाई लखुजीराजे जाधवराव. 


म्हाळसाबाईंची सर्वात सोपी ओळख म्हणजे आऊसाहेब जिजाऊंच्या आई किंवा लखुजीराजेंच्या पत्नी..! पण त्यांचं कर्तृत्व हे एवढ्यावरच सिमित होणारं नाही आहे. 


             म्हाळसाबाई या ‘वणंगपाळ बारा वजीरांचा काळ अशी’ ख्याती असणाऱ्या फलटणच्या वणगोजी नाईक निंबाळकर यांच्या बहिण होत्या. त्यांचे माहेरचे नाव गिरजाबाई असावे असा अंदाज इतिहास अभ्यासक मांडतात. लखुजीरावांच्या आई ठाकराईराणी देखील याच घराण्यातील होत्या त्यांच्याच मध्यस्थीने लखुजी-म्हाळसा संबंध झाला असावा. या उभयतांना चार पुत्र व जिजाऊ हि कन्या झाली.  याव्यतिरिक्त लखुजीराजेंचे यमुनाबाई व भागिरथीबाई असे आणखी दोन संबंध झाले.



                  म्हाळसाऊंचे पती लखुजीराजे त्याकाळचे दख्खनेतील सर्वात मोठे सरदार होते. सुरुवातीच्या काळातच लखुजीनी स्वपराक्रमाने सिंदखेडच्या देशमुखीसह २७ महाल आणि ५२ चावड्यांची देशमुखी जहागिरी आपल्या नावे वंशपरंपरागत करुन घेतली. तर पुर्वपार असणारी पंचहजारी मनसब दहा हजारी मनसबदारी पर्यंत वाढवली. (जाधवरावांची बखर पृ.६ ते ९). अजेय देवगिरी किल्ला शौर्य आणि शिताफीने सर करुन जिंकणारे लखुजी आजवरच्या इतिहासातील एकमेव वीर आहेत. (वऱ्हाडचा इतिहास पृ. ३२९-३) इतकेच नव्हे तर पुढे लखुजी निजामशाहीच्या दक्षिणी फळीचे नेते झाले. (मकुइ भाग-१ पृ.२५) तसेच सहसा मराठ्यांना न दिल्या जाणाऱ्या बर्गीय आणि नाईकवाडी पायदळ सैन्याचे नेतृत्व ते करीत होते अशा नोंदी समकालीन फिरिस्ता आणि सय्यदअली यांच्या ग्रंथातून आढळतात. मुळात उपलब्ध नोंदींवरुन लखुजींचा स्वभाव अतिशय खाटाटोपी दिसतो. त्यांनी वेळोवेळी निजाम आणि मुघलांची बाजू बदलत युद्धजन्य परिस्थिती कायम ठेवत तिन्ही शाह्या एकमेकांशी लढवत ठेवल्या. या गोष्टींचा फायदा महाराष्ट्रातील अनेक मराठा घराण्यांच्या उत्कर्षाला झाला. पुढे जाऊन लखुजीराजेंचे महत्त्व इतके वाढले की ‘दक्षिणेचा जुना माहितगार आणि वजनदार सरदार मोगलांना येऊन मिळाला हे जाणून शहजाद्यालाही न मिळणारी २४ हजार स्वाराची मनसब आणि १५ हजार घोडे स्वाराचा अधिकार त्यास देऊन आपल्या दरबारात ठेवले' (हिस्ट्री ऑफ मराठा खंड-१ पृ.७१) (इंग्लिश फॅक्टरी इन इंडिया खंड-१ व सुरत खंड -१०२ फॅक्टरी रेकॉर्ड इन ऑफिस पृ.१०) 

                येवढी माहिती सांगायचं कारण इतकंच की, लखुजीराजेंच्या अनुपस्थितीत म्हाळसाबाई व जाधवरावांच्या इतर स्त्रीया हा सर्व लवाजमा संभाळत असत. म्हाळसा बाईंनी दस्तुरखुद्द गादीवर बसून न्यायनिवाडे केल्याचे, कारभार केल्याचे, दान पत्र दिल्याचे संदर्भ मिळतात, तर प्रसंगी पदर कमरेला खोचून, घोड्यावर मांड ठोकून नंग्या समशेरी हातात घेत लढयांचेही नेतृत्व केले. (विऐले, पृ.२३ ते ४३ व राजे जाधवरावांची बखर) पण म्हाळसाबाईंच्या कर्तृत्वाचा सर्वोच्च बिंदू ठरला तो २५ जुलै चा दिवस.. 

                लखुजीराजेंचा वाढता दरारा निजामशहा आणि वजीराच्या डोळ्यात खूपत होता. यातूनच २५ जुलै १६२९ रोजी लखुजीराजेंच्या हत्येचा कट ठरवला गेला. देवगिरीवर दरबार भरवून लखुजीराजेंना आपल्या लवाजम्यासह मुजऱ्यास येण्याचे फर्मान काढले. दरबारी रिवाजाप्रमाणे लखुजीराजे त्यांचे पुत्र अचलोजीराजे आणि राघोजीराजे व नातू राजे यशवंतराव हे निहत्तेच (निशस्त्र) दरबारात मुजऱ्यास गेले. पायथ्याशी लखुजीराजेंचे बंधू राजे भुतजी व त्यांचे सुपुत्र बहादुरजी व पत्नी म्हाळसाबाई आपल्या कुटुंबकबिल्यासोबत छावणीत होत्या. तिकडे देवगिरीवर निजामशहा भर दरबारातून उठून गेला आणि ठरल्याप्रमाणे पाहरेकऱ्यांनी निशस्त्र लखुजीराजे आणि इतर मंडळींवर हल्ला चढवला. त्याही अवस्थेत हा ८० वर्षांचा योद्धा शत्रूवर तुटून पडला होता असे उल्लेख मिळतात. पण यात निभाव लागणे अशक्य होते. देवगिरी दरबारात जाधवरावांच्या कर्त्या पुरुषांची प्रेतं रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. 

                  हि बातमी वादळासारखी पायथ्याशी असणाऱ्या जाधवरावांच्या गोटावर धडकली. पण या धडकेने डगमगतील त्या म्हाळसाबाई कसल्या ? आपल्या मुलाला आणि दिराला घेऊन स्वत: नेतृत्व करत म्हाळसाबाईंनी थेट देवगिरीवर चढाई केली. यावेळी कोणती चकमक झाल्याची नोंद मिळत नाही. पण बादशहाच्या दरबारावर त्याच्याच मुलुखात चढाई करणे किती जिकरीचा निर्णय होता याचा अंदाज लावता येतो. सर्व जाधवराव पुरुषांची प्रेतं घेऊन म्हाळसाबाई सिंदखेडराजाला आल्या. (राजे जाधवरावांची बखर व सिंदखेडराज्याचा इतिहास पृ.५ ) 

श्रीमंत लखुजीराजे जाधवराव यांची समाधी, सिंदखेडराजा

              सिंदखेडराजा येथे शाही इतमामात सर्वांचे अंत्यसंस्कार करुन निजामशाहीलाही लाजवेल अशी जगातील सर्वात मोठी हिंदू राजाची समाधी भूतजींकरवी बांधून घेतली. या समाधीत लखुजीराजेंचा पुर्णाकृती ‘सिंहासनाधीश’ पुतळा देखील बसवला. विशेष म्हणजे या वेळी म्हाळसाबाई सती गेल्या नाहीत. समकालीन भाटांच्या कवनानुसार पुढे शिवरायांच्या जन्मानंतर इ.स. १६३३ रोजी जिजाऊ पहिल्यांदाच माहेरपणाला सिंदखेडराजा इथे आल्या. (राजे जाधवरावांचा इतिहास पृ.६ व दि लाईफ ऑफ शिवाजी पृ.२२) 

                  दोन वर्षे सिंदखेडराजाला मुक्काम करुन माघारी पुण्याला जाताना जिजाऊ आणि बाल शिवबांसोबत आई म्हाळसाबाई आणि अचलोजीराजेंचे पुत्र सृजनसिंह (संताजी) व यशवंतरावांचे सुपुत्र राजे लखमोजी हे देखील पुण्यास आल्याचे समजते. पुढे तहयात म्हाळसाबाई पुण्यातच राहिल्या व त्यांचा मृत्यू देखील इकडेच झाला अशी माहिती मिळते‌. जिजाऊंच्या अनुषंगाने पुढे म्हाळसाबाईंच्या कार्याचे संदर्भ मिळत नसले तरी अशा प्रभावशाली व्यक्तीमत्वाच्या आईने जिजाऊंना स्वराज्यनिर्मीतीत मदत केली नसेल तरच नवल.. 


दुर्दैवाने इतिहासाच्या पानांमध्ये आज एक धाडसी रणरागिणी, एक उत्तम महिला प्रशासिका, एक खंबीर पत्नी आणि एक गौरवशाली माता म्हणून आदर्शवत ठरतील अशा मातोश्री म्हाळसाबाईंचा नामोल्लेख नसणे मराठदेशासाठी अशोभनीय आहे. 


आज लखुजीराजेंच्या स्मृतीदिनानिमित्त रणरागिणी मातोश्री म्हाळसाबाई सरकारांना त्रिवार मानाचा मुजरा 🙏🏻🚩

#रणमस्तबहाद्दर 

                                    ✍🏻 स्वप्नील महेंद्र जाधवराव.


फोटो : नेट साभार (सदरहू तसबीर म्हाळसाबाईंची नसून ती प्रतिकात्मक स्वरुपात वापरली आहे.)

Comments

Popular posts from this blog

हैबतबाबा पवार आरफळकर

शेखमिरा संस्थान

गावकुसावरील देवता