सन १८३९ ची परदेशवारी..
सन १८३९ ची परदेशवारी..
आजही परदेशात जाणें अनेकांचे स्वप्न असले तरी परदेशवारी हि लोकांसाठी तितकी आश्चर्याची गोष्ट राहिलेली नाही, किंबहुना अनेकांसाठी तर ही नित्याचीच गोष्ट झाली आहे.
पण साधारणतः २०० वर्षांपूर्वी हि गोष्ट भारतीयांसाठी इतकी सोपी नव्हती. त्यात हिंदू लोकांमध्ये तर समुद्र ओलांडणे हे महापाप समजले जाई. विलायतेला गेलेला आणि तिथल्या सामान्य इंग्रज लोकांनी पाहिलेला पहिला हिंदू व्यक्ती हा मराठी होता आणि विशेष म्हणजे तो आपल्या सातारचा होता. यशवंतराव राजे शिर्के असे त्याचे नाव. सुदैवाने या यशवंतरावास 'स्मरण वही' (डायरी) लिहायची होती.
तसे याआधी रघुनाथराव पेशव्याने आरदाशिर फारशी आणि आबा काळे असे दोन वकील लंडनला पाठवले होते. पण त्यांचा अधिक तपशील मिळत नाही त्यामुळे यशवंतरावाने लिहिलेल्या स्मरण वहीच्या माध्यमातून हिंदू लोकांच्या पहिल्या विदेश वारीतील गमती जमती आणि नुकतेच आधुनिकीकरणाचे डोहाळे लागलेले इंग्लंड आज आपण अनुभवणार आहोत.
![]() |
| *For illustrative purpose only |
हा यशवंतराव आपल्या भाऊबंदकीत चाललेला नित्याचा वाद मागे टाकून सातारच्या छत्रपतींचा वकील म्हणून इंग्लंड दरबारी दाद मागायला निघाला होता. त्याच्याबद्दल बोलताना के.सी.ठाकरे म्हणतात "क्षत्रिय मराठा समाजात समशेरीचा पराक्रम त्रिलोकविश्रुत आहे पण समशेरबहाद्दरीच्या जोडीने कलमबहाद्दरी गाजविणारा मराठा बच्चा यशवंतराव शिर्क्याशिवाय दुसरा आढळत नाही." वळणदार मोडी अक्षर, लिखाणाची सफाई आणि बारीकसारीक मजकूरही तपशीलवार लिहून ठेवण्याची त्याची दक्षता वाखाणण्याजोगी होती. तर आता थेट यशवंतरावांच्या शब्दातूनच त्यांची परदेशवारी थोडक्यात वाचूयात..
"जेष्ठमासी वद्य १३ शके १७५८ व सन १८३६ जून सुक्रवार (दि.२७ में १८३६) रोजी मुहूर्त पाहून निघते समई उभयेता बंधुसरकार (छत्रपती प्रतापसिंह व शहाजीराजे) श्री देवीपासी येऊन उभे राहून विलायतेस जाणारा कागदाचा रुमाल श्रीचे पुढे ठेविला आणि आम्हास उचलावयास सांगितला."
येथून मुंबईला येऊन 'De Ulma' (उलमार) नावाच्या फ्रेंच कप्तानाच्या 'जॉर्ज कुबेर' नावाच्या जहाजातून जायचा बेत ठरला होता पण इंग्रजांच्या आडकाठीने तो रद्द झाला. पुढे १९ मार्च १८३९ रोजी 'रिलायन्स नं. ४७१५' नावाच्या जहाजातून यशवंतराव आदी ८ मंडळींचा प्रवास केपटाऊनच्या मार्गे सुरू झाला.
![]() |
| *For illustrative purpose only |
"तारीख २६ मार्च्य चैत्र शु. ११ सोमवार रोजी अकरा वाजता मुकाम तालीकोट प्रांत मलबार या बंदरावर जाहाजवाले याणी जाहाज नांगर सोडून खुंटविले. मुंबईहून निघाल्या दिवसापासून आम्हास वांती लागली. सोबत नसता व पुढील मागिल आंदेशा मनांत न आणिता महाराज सरकारावर प्रसंग फार जबरदस्त.यामुळे घरचे वगैरे सर्व प्रकरण सोडोन देऊन, प्राणावर उधार होऊन, जी गोष्ट कधी जाहली नाही ती स्वीकारुन, आपला देश टाकून मुंबईपासून विलायेत मैल सुमारे १३५० येकून सात हजार कोस पाण्यातून ज्या मार्गे आलो त्या मार्गानी आहे. तिकडे एकसे चवतीस रोजानी परमुलखी जाऊन पोहोचलो. मुकाम लंडन शेहर प्रांत विलायेत इंगलीस्थान या शेहरात लिवरपुलाहून पुर्व दिवसी आगीच्या गाडीतून शुक्रवारी संध्याकाळी सात वाजता निघालो ते दुसरे दिवशी २९ जमादिलावल ता. १० आगष्ट श्रावण शु.१ शके १७६१ रोज शनवारी साहा वाजता रहावयाच्या जागी सुखरूप पोहोचलो.
प्रवास संपला आता लंडन फिरुन येऊ..
"लंडनात वगैरेकडे सर्व हिंदू लोक इंगलिश प्रांती आल्याचे माहीत जाहले. मुक्कामी पोहोचल्यावर दक्षण हिंदुस्थानातून गोरे लोक तेथे (माघारी) गेलेले जे कोणी लंडनात होते ते येऊन भेटू लागले. जमशेटजी बाटलीवाले मुंबई मुकामचे याची व हापेसवाल्याचे येजमान सर च्यारलिस फारबस (Charles Forbs) साहेब याची दोस्ती जाणून याणी आमचा बंदोबस्त व बातमी ठेवून, खाण्यापिण्यास हेंदू चालीप्रमाणे पीठ तांदळाचा व वैगरेचा बंदोबस्त करुन आपले घरी गेले आणि घरीहून हरएकविसी आमचा पुस्तपणा ठेऊ लागले. आमचे पुढे माहाराज सरकारातून पाठवलेला येक मुसलमान सयद मीर आफजल आली तो येऊन भेटला. त्याजबरोबर लखनोरचा नबाब व टिपूचा लेक ज्यांबुदीन नामे तेही भेटले."
"आम्ही त्या मुलखी नवेच गेलेले व हिंदुलोक कधी कोणी त्या मुलखी गेलेलाच नहुता. तेव्हा तेथील माणसे दरोबस्त आम्हास पाहण्यास फार चाहत असे. जिकडे आम्हास जाणे तिकडे जाण्यास तेथील रिवाजाप्रमाणे गाडी उंचीपैकी आणऊन त्यातून जाणे होत असे. तेव्हा रस्त्यातून जाते समयी पाहावयास मनस्वी माणसाची गर्दी हरहमेस होत होती. कोण्ही दोस्त मंडळी झालेली आपलाले घरी आम्हास नाच तमासा वगैरे पाहावयास नेत असत. ते तमाशे वगैरे जे पाहू ते फारच चमत्कारिक. तसे दुसरे मुलखी कोठेच नसेल व आपल्या प्रांती तर नाहीच. तेव्हा तपशील काय लिहावा ?"
"इकडील हावा फार थंड ती असी की इंग्रजी महिना माहे हे महिन्यापासून तिकडील उन्हाळ्याचे दिवस. सेतात पेरण्या होणे व माणूस सेताततून फिरणे व बागबगीचे पाहणे होत असते. तो उन्हाळा म्हणजे फार नाही. जसे आपल्याकडील थंडीचे दिवस पौष मासाचे असतात त्यापेक्षा काही कमी. असे तिकडे उन्हाळ्याचे दिवस व थंडीचे दिवस नवंबरापासून येतात. ती थंडी फार मोठी पराकाष्टेचीच असती. नद्या व किरकोल बागातील वगैरे पाणी सुधा थिजून दगडी प्रमाणे होते. केवळ पांढरा खडकच दिसतो. त्याजवरुन माणसे हाजारो फिरत असतात. वरते जितके पाणी जमलेले तितके दगडाप्रमाणे आणि त्याचे खाली नद्यातून पाणी पुस्कल खोल असते."
"लंडन हे शेहर आदमासे पाच लक्षाचे वर साहा लक्ष परयेंत घरे आहेत. ती घरे व रस्ते, सडका व दुकानदारीच्या जागा व रात्रौ रोषनाई वगेरे सर्व फार चांगले. माणूस उदेगी फार. त्याच्या कळा कुशळता फारच. विशेष सर्व माणूस गोरे लोक. हा विलायेत टापू आदमासे तीनसे कोस परयेंत लांबी व रुंदी आडीचशे परयेंत इतक्या भोवताले दरोबस्त पाणी. खुसकीचा रस्ता या टापूस नाही. लंडनाखेरीस आणखी या मुलकात शेहरे आहेत व खेडी तर पुस्कलच असतील. त्यातून येकंदर गोरे लोक लाहान मोठे आदमासे दोन कोट परयेंत व वरते काही, त्याप्रमाणे ठिकाण लागला."
"विलायेत मुकामी धान्ये सातूप्रमाणे बारीक गहू व सातूही आहेत. आणि पांढरे वाटाणे व बताटे व आणखी बारीक काये असते व तेल काढण्याचे एक त्यास फले बारीक येतात. (कदाचित ऑलिव्हस्) तांदूळ बाहेरुन जाहाजातून येतात. तेथे पिकत नाहीत. ही सेते पिकवण्यास बैल नाहीत. घोडे आऊतास धरीत असतात. अउते इंग्रजी चालीप्रमाणे. घोड्याच्या जाती दोन तीन आहेत. बैल ठेवितात ते गाईपुरते. गाई पुस्कल. दुधेही त्यास पुस्कल असतात. आम्ही मुंबईहून निघालो तेव्हा दरोबस्त जीणस धान्ये वगैरे पुस्कल घेतला होता. आणि पाणीयाची पिपे लाकडी कोरी करऊन त्यात पाणी आपले माणसाकडून भरऊन जाहाजावर चढविले. नंतर तालिकोट व सांटी लायन (सेण्ट लायन) या बंदरात पिपे भरुन घेतली. जाहाजात जागा स्वतंत्र अर्धे जहाज भाड्यानी घेतले. त्यात इंग्रजी माणूस न यावे. त्या आपलेच जाग्यात लोखंडी चूल मांडून तिजवर तांदूल भाजून येकवेला करावयाचे. बाकी कोणास काही लागल्यास फुटाणे हरभरे खावे."
"विलायतेत पाणीयाची तर सोयी चांगलीच. ती असी की शेहरातून टेम्स (Thames) नदी पार मोठी चालली आहे. तिचे पाणी शेहराचे वरलेकडोन नळानी घेऊन नळ बांधून ती नदी सर्व शेहरात नळ घरोघर फिरविले आहेत. ते पाणी घरातले घरात घेऊन खर्च लागेल तितके करावे. शेहरात जागोजागी पाण्याचे खजिने मात्र आहेत. तेहि झाकलेले. विलायत देशात आज ईश्वरी कृपा पूर्ण आहे. तेणे करुन मनुष्याचे आयुष्याची वृद्धि व चैनात. माणूस खरे व खरे चालीने वागावयाचे. देशात पैसा द्रव्य जव्हाहीर पुस्कल. त्या लोकास नित्ये आनंद. शेहेर चांगले. त्यातून गाड्या रथ. त्याचे फिरणे हिंडणे त्याचे त्यास सोभिवंत आहे. दिसण्यात आले. आसो. परंतु जातीवर्ण एकसारखा व एकच जात. दुजा विच्यार नाहीच. दुसरी जातच त्या लोकास माहीत नाही."
नव्याचे नऊ दिवस म्हणत सुरुवातीस चांगले वाटणाऱ्या या गोऱ्या लोकांचे 'खरे रंग' दोनच वर्षांत यशवंतराव शिर्क्यास कळून चुकले. 'या देशी न्याय नाही' हे लक्षात घेऊन शेवटी निराश आणि हतबल यशवंतराव दि.१ जुलै १८४१ गुरुवारी सकाळी, 'ओरिएण्टल आगबोटीने सौदॅम्टन बंदरातून, अलेक्झांडरीयाच्या मार्गाने (सुएझ कालव्यातून अवघ्या ६८ दिवसांचा प्रवास) मुंबईला निघाले.
यशवंतरावांच्या नजरेतून हि लंडनवारी तुम्हाला कशी वाटली हे अवश्य कळवा..
#रणमस्तबहाद्दर
✍🏻स्वप्नील महेंद्र जाधवराव.


यशवंतराव शिर्के यांची ही रोजनिशी आपणाकडे आहे काय ?
ReplyDeleteके.सी. ठाकरेंनी आपल्या पुस्तकात या रोजनिशीचा काही भाग इ.स.१९४८ साली छापला आहे. आजमितीला हि रोजनिशी उपलब्ध आहे का याची माहिती मिळत नाही.
Deleteअप्रतिम प्रवासवर्णंन खरंच खूप भारी वाटलं वाचून ...त्या काळात एकरुप झाल्यागत वाटलं ...
ReplyDeleteआपल्याकडील कुणी माणूस त्या काळी परदेशात पोहचला होता, हेच नवल व कुतूहल वाटतं.
ReplyDelete