फारस आणि भारत

 फारस आणि भारत

टाटा, होमी भाभा, सायरस पुनावाला अशा एक ना अनेक प्रसिद्ध व्यक्तींमुळे 'पारसी' समुदाय आज आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहे. पण फारस (ईरान) आणि भारताचं नातं फार जुनं आणि घट्ट आहे..

भारताशी धार्मिक-सांस्कृतीक आणि दैवतांची देवाण घेवाण करणारा, हडप्पा काळात व्यापार करणारा, मराठीला शेकडोंची शब्दसंपदा देणारा, मुस्लिमांना संस्कृती आणि स्थापत्य देणारा हा फारस देश आपल्या भारताशी कधीही वेगळा न होण्याइतका घट्ट जोडला गेलाय..

आज पारसी नववर्षानिमित्त (फरवर्दिन) भारत आणि फारसच्या याच अतुट नात्याविषयी काहीसं..

आज ज्या लोकांना आपण पारसी समजतो साधारणतः ते सर्व जोरोस्ट्रिएन आहेत. ज़राथुस्ट्र (जारोस्टर) या धर्मोपदेशकाने इ.स.पुर्व पाचव्या शतकात स्थापन केलेला जगातील सर्वात जुन्या एकेश्वरवादी धर्मापैकी हा एक आहे. हा धर्म त्याचे नाते इ.स.पुर्व दोन हजार वर्षांपूर्वीच्या मुळच्या पारशी संस्कृतीशी जोडतो. ही संस्कृती भारताच्या हिंदू संस्कृतीशी साधर्म्य दाखवणारी बहूईश्वरवादी होती. या दोन्ही संस्कृतींनी इतर गोष्टींसोबतच अनेक दैवते आणि दैवी कथांची देवाण घेवाण केली.
                 वरुणाला हरवून इंद्राने देवराज पद मिळवले हि कथा फारस मधून भारतात आली तर फारसी लोकांची अनेक दैवते भारतातून आल्याचे समजले जाते. तसेच भारतातील प्रसिद्ध ऋषी भृगू हे देखील मुळचे फारसचे आहेत. फारसमध्ये सर्वश्रेष्ठ मानली जाणारी अग्नीपुजा हेच भारतातील भृगुवंशीयांचे वैशिष्ट्य आहे. दक्ष प्रजापतीच्या यज्ञापासून ते पांडवांच्या राजसूय यज्ञापर्यंत हिंदू धर्मकथांतील महत्त्वाचे समजले जाणारे अनेक यज्ञ स्वत: भृगू ऋषी व त्यांच्या वंशजांनी केल्याचे पुराणांमध्ये वर्णित आहे. आज पारशी लोक ज्या एकमेव परमेश्वराला मानतात त्या 'अहुरा मज़्दा' याचे ऋग्वेद २:१:६ मध्ये 'असुर महत' असे वर्णन सापडते. यातून भृगूवंश आणि असूर यांचे नाते देखील लक्षात येते. हा झाला पौराणिक संबंध आता ऐतिहासिक संबंध पाहू.. 



                  अगदी हडप्पा काळापासून भारत आणि फारसचा व्यापारी संबंध आहे. इ.स. पुर्व तिसऱ्या शतकाआधी फारसी साम्राज्य पुर्वेला अफगाणिस्तान पासून पश्चिमेला युरोप आणि दक्षिणेला इजिप्तपर्यंत विस्तारलेले होते. याच काळात इ.स.पुर्व सहाव्या शतकात स्थापन झालेल्या जरथ्रुष्ट्री या जगातील सर्वात मोठ्या एकेश्वरवादी धर्माने यहुदी या एकेश्वरवादी धर्माला तर यहुदीने ख्रिस्ती व इस्लाम या धर्मांना प्रेरणा दिली. अलेक्झांडर या ग्रीक राजाने इ.स.पुर्व ३०० मध्ये फारसवर विजय मिळवून तिथले बरेच धार्मिक साहित्य नष्ट केले. तरीही इ.स. पूर्व ६०० ते इ.स. ६०० अशी हजार वर्षे जरथ्रष्ट्री हा तिथला राजधर्म म्हणून प्रसिद्ध होता. पुढे इ.स. ६३३-६५४ मध्ये मुस्लिमांनी केलेल्या आक्रमण आणि बेशुमार कत्तलीमुळे फारस मधला पारशी धर्म नष्ट होऊन पारशी लोकांना पलायन करावे लागले.
                आदिवासी मुस्लिम टोळ्यांना या फारस ने संस्कृती आणि कलेचे दान दिले. पारसी संस्कृतीच्या प्रभावात मुस्लिमांमध्ये शिया हा नवा पंथ उदयास येऊन वास्तुकला, चित्रकला, संगीत आणि मजार (कबर) पुजा या गोष्टी मुस्लिम धर्मात रुजल्या गेल्या. मुळच्या अरबी लोकांमध्ये हराम असणाऱ्या सर्व गोष्टींमुळे सुन्नी आणि शिया हा नवा वाद देखील उदयास आला. दक्षिण भारतात राज्य करणारे बहमनी हे शिया तर उत्तरेतील मुघल हे सुन्नी मुसलमान होते.
                समुद्रामार्गे पलायन करुन पारशी लोकांनी भारताच्या गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांत शरण घेतली. त्याचबरोबर बहमनी सत्ता इत्यादी गोष्टींमुळे महाराष्ट्र आणि दक्षिणेवर मोठा फारसी प्रभाव पडला. हजारो फारसी ग्रंथ आणि शिलालेख या भरतभुमीत निर्माण झाले. जवळपास ६००-७०० वर्षांच्या मुस्लिम कालखंडात फारसी ही राजभाषा असल्या कारणाने इतर भारतीय भाषेप्रमाणे मराठीसाठीही फारसी अविभाज्य अंग झाली.  सामान , हकीकत, सरकार, शाहीर, शाई, खलिता, कुमक, अत्तर, अब्रू, जाब, शपथ, कारभार, खुलासा, दरबार, पेशवा, पोशाख , सौदागर, कामगार, गुन्हेगार, फडनविस , दिरंगाई, बाग, बगीचा, मशीद, महिना, मोहोर, मेणा, रसद, रवानगी, लेजीम, हजार, अव्वल, निमे, सबब, शाबास, गप, खबर्दार, फौज, बारगीर, शिलेदार, लष्कर, स्वार, गोलंदाज, जिरेटोप, तोफ, समशेर, तंबू, शामियाना, लगाम, मेख, खंदक, बुरुज, किल्ला, इमारत, पगडी, मखमल, चादर, रजई, खुर्ची, मेज, पलंग, तबक, समई, पानदान, अगरबत्ती, खसखस, खिसमिस, पिस्ता, बदाम, अफू, खरबूज, ढोल, दिलरुबा, नगारा, नौबत, नोकरी, गजल, दीवानखाना , गुलाब , बारदान, गलीचा, बाजार, जुलुम, अक्कल, हुशारी, मस्ती, डावपेच, जबरी, मेवा, मिठाई, कागद, दरवाजा असे एक ना अनेक रोजच्या वापरातील आपले मराठी शब्द हे मुळचे फारसी आहेत.



भारत आणि फारस हे गेल्या तीन-चार हजार वर्षांपासूनचे अतुट नातं आहे. आज जगाच्या पाठीवर अवघे लाखभर पारशी शिल्लक आहेत आणि त्यापैकी भारतात ६०,०००... गेल्या चौदाशे वर्षात हे पारसी दुधातील साखरेप्रमाणे गोडव्याने भारतात नांदले. पराकोटीची आर्थीक ताकद असुनही कधीही धर्मप्रसार किंवा धार्मिक तंटे न करत भारताच्या उत्कर्षाला हातभार लावत राहीले..

सर्व फारसी आणि भारतीय बांधवांना पतेती नवरोजच्या हार्दिक शुभेच्छा..
#रणमस्तबहाद्दर

                        ‌                 ✍🏻 स्वप्नील महेंद्र जाधवराव.

              

Comments

Popular posts from this blog

हैबतबाबा पवार आरफळकर

शेखमिरा संस्थान

गावकुसावरील देवता