फक्त गादी उबवणारे सातारकर छत्रपती..

फक्त गादी उबवणारे सातारकर छत्रपती.. 



राजवाड्यासमोरील गोल बागेत असणारी ही सदरची मुर्ती मला आधी छत्रपती थोरल्या शाहूंची वाटायची.. 

साताऱ्यात निवांत गादीवर बसून आयुष्य काढलेल्या व्यक्तीचा मृत्यूपश्चातही गादीवर निवांत बसलेलाच पुतळा बांधला हे बघून मित्रांमध्ये कुश्चीत हसायचो मी.. 

सातारा नुसती नावाला राजधानी छत्रपतींच्याने साध्या एका शहराचा विकास सुद्धा साधता आला नाही..

छत्रपती संभाजी हेच शेवटचे कर्तबगार छत्रपती त्यांच्यानंतरचे बाकीचे फक्त नामधारी..

इतर संस्थानिक बघा आणि आमचा सातारा बघा, आदबो-तहजीब तर सोडाच साध्या ऐतिहासिक वास्तू सुद्धा यांच्याच्याने राखता आल्या नाहीत.. 

हळूहळू शाहू छत्रपतींचे कार्य समजले. पण बाकी वंशजांचं काय..‌? ते नावापुरतेच ना ? छत्रपतींची गादी का कुणालाच कर्तबगारीने चालवता आली नाही ?

राजवाढ्यापुढे फक्त नावातच प्रताप असणाऱ्या या प्रतापसिंहांचा हा पुतळा का उभारला असेल ? 


अशा भावना अगदी काही महिन्यांपूर्वी पर्यंत मनात होत्या आणि मला विश्वास आहे की ९५% महाराष्ट्र आणि ९९% सातारकरांच्या याच भावना आहेत. पण सातारा गादीच्या स्थापने पुर्वीपासून आजपर्यंत माझ्या कुटुंबाचे सातारा छत्रपती घराण्याशी जवळचे संबंध आहेत, आज देखील इथल्या प्रत्येक छत्रपतीची पायधूळ वेळोवेळी माझ्या घराच्या उंबऱ्याला लागत असते, आमच्या प्रत्येक सुखदुःखाचे ते सह'भागी असतात आणि तरीही माझी ही भावना का असावी ?

मुळात यात दोष कुणाचाच नाही. इतिहास जसा व जितका सांगितला जातो तितकाच आपण खरा मानतो आणि याला खुद्द छत्रपतींचे वंशज देखील अपवाद नाहीत. 

एका इंग्रज अधिकाऱ्याला दिलेल्या जबाबात छत्रपती प्रतापसिंह म्हणतात "श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य मिळवले ते त्यांचे चिरंजीव छत्रपती संभाजीराजेंनी घालवले. ते आमचे आजोबांचे वडील छत्रपती शाहूंनी परत मिळवले."

पुढे प्रतापसिंहांच्या क्रांतीचा इतिहास माहिती नसणारे कोल्हापूरचे राजर्षी शाहू महाराज 'प्रतापसिंहांच्या चुकीमुळे सातारा राज्य खालसा झाले' असे मत व्यक्त करतात. 


त्यामुळे एकंदरीतच 'खरा इतिहास' उजेडात येणे ही वेळोवेळी काळाची गरज असते. नाहीतर 'मुघल खरे राष्ट्रनिर्माते' आणि 'थोरले बाजीराव एकटे साम्राज्य विस्तारक' वाटू लागतात.


सातारचे दुर्दैव इतकेच की इथल्या छत्रपती घराण्याला त्या योग्यतेचे इतिहासकार लाभले नाहीत आणि इतिहास लिहून घेण्याइतके स्थैर्य देखील... इथल्या प्रत्येक छत्रपतीला 'संघर्ष' हा पिढीजात रुपाने वारस्यात मिळाला आणि तो अगदी त्याला शेवटापर्यंत पुरला.. 

अभिमान इतकाच वाटतो की "श्रीमंत सातारकर छत्रपती" कधी कुणापुढे झुकले नाहीत.. अगदी 'देशोधडीला' लागले पण हार मानली नाही.. 


सातारा छत्रपतींच्या बलिदान आणि कर्तृत्वाचा अंदाज घ्यायचा असेल तर जे चरित्र ऐकून राजर्षी शाहूंचे देखील डोळे पाणावले होते त्या 'छत्रपती प्रतापसिंह' यांच्या चरित्रावरुन नजर फिरवली तरी पुष्कळ.. 

आजवरच्या संपूर्ण छत्रपती घराण्यात प्रतापसिंहाइतका दृष्टा आणि सत्यशील छत्रपती झाला नसावा.. याच छत्रपती प्रतापसिंहाबद्दल आणि सातारा घराण्यातील महत्त्वपूर्ण घटनांबद्दल काही लेख प्रसिद्ध करत आहे. या माध्यमातून जशी माझ्या मनातील 'गादी उबवणारे' ही छत्रपतींची प्रतिमा स्वच्छ झाली तशी तुमच्याही मनातील होईल हीच अपेक्षा.. 

#रणमस्तबहाद्दर 

#श्रीमंतसाताराछत्रपती


                                     ✍🏻 स्वप्नील महेंद्र जाधवराव.

Comments

Popular posts from this blog

हैबतबाबा पवार आरफळकर

शेखमिरा संस्थान

गावकुसावरील देवता