आचार्यश्रेष्ठ श्री भृगुऋषी महाराज

आचार्यश्रेष्ठ श्री भृगुऋषी महाराज

मी भुईंज मध्ये जन्मलो, या गावाला नावच मुळात ज्या व्यक्तीमुळे पडले ते आचार्यश्रेष्ठ श्री भृगुऋषी महाराज यांच्याबद्दल कायमच मनात एक उत्सुकता असते. याच उत्सुकतेतून शोध घेताना अनेक नवनवीन गोष्टी माझ्या समोर येत त्याच आज वाचकांसमोर मांडत आहे.

भुईंज येथील आचार्य भृगुऋषींची समाधी


भृगुऋषींचे मुळ स्थान फारस (इराण) समजले जाते. हिंदू मान्यतेनुसार साधारणतः इ.स. पूर्व साडेचार हजार ते सात हजार वर्षांपूर्वी भृगूंचा जन्म झाला असावा. सृष्टीच्या निर्मितीसाठी ब्रम्हदेवाने निर्माण केलेल्या सप्तर्षींपैकी आद्य ऋषी म्हणजे "ऋषीश्रेष्ठ भृगूऋषी महाराज." ब्रम्हाचे मानस पुत्र (Mind born son) आणि प्रजापती (सर्व जीवजंतूंचा ईश्र्वर / सृष्टीच्या‌ निर्मितीसाठी मदत करणारा) असे त्यांचे उल्लेखही अनेक ठिकाणी आढळतात. मान्यतेनुसार सृष्टीची भौगोलिक रचना भृगू महाराजांनी केली. खगोलशास्त्रावरील त्यांचा "भृगू संहिता" हा ग्रंथ जगप्रसिद्ध आहे. तसेच त्यांना भारतीय फलज्योतिष शास्त्राचे जनक मानले जाते. महर्षी मनुच्या मनुस्मृती नुसार भृगू पृथ्वीच्या निर्मितीपासून अस्तित्वात आहेत.

भृगुंनी भृगु संहितेची रचना केली. त्याच काळात त्यांचे बंधू स्वायंभुव मनु याने 'मनु स्मृति' ची रचना केली. ऋग्वेदात भृगुवंशी ऋषींद्वारा रचित अनेक मंत्रांचे वर्णन मिळते. ज्यामध्ये वेन, सोमाहुति, स्यूमरश्मि, भार्गव, आर्वि इत्यादी भार्गवांची नावे मिळतात. 'भृगु स्मृति', 'भृगु संहिता' (ज्योतिषशास्त्र), 'भृगु संहिता' (शिल्पशास्त्र), 'भृगु सूत्र', 'भृगु उपनिषद', 'भृगु गीता' आदि ग्रंथांची रचना भृगुऋषींनी केली. यातील 'भृगु संहिता' आज सुद्धा उपलब्ध आहे, ज्याची मुळ प्रत नेपाळच्या पुस्तकालयात ताम्रपत्रावर सुरक्षित आहे. या विशालकाय ग्रंथाला अनेको बैलगाड्यांवर लादून नेण्यात आले होते. भारतवर्षात सुद्धा अनेक हस्तलिखित प्रती पंडितांजवळ उपलब्ध आहेत परंतु त्या अपूर्ण आहेत. भृगुऋषींनी सर्वप्रथम संजीवन विद्या आणि संजीवनी बुटीचा शोध लावला असे देखील मानले जाते. अथर्ववेद तसेच आयुर्वेदासंबंधी अनेक प्राचिन ग्रंथांत ठिकठिकाणी भृगुऋषींचा 'प्रमुख आचार्य' असा उल्लेख सापडतो. त्यांनी सुर्यकिरणांद्वारे रोगांचे उपशमन करण्यावर चर्चा केली आहे. पावसाचे पाणी सुर्यकिरणांपासून प्रेरित होऊन येते (बाष्पीभवन/evaporation) आणि ते शल्य (operation) सारखी पिडा देणाऱ्या रोगांवर उपायकारक असते असे भृगुंनी सांगितले आहे.

 भृगुऋषींच्या अस्तित्वाचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा पुरावा मिळतो तो मोहनजोदड़ो येथे झालेल्या उत्खननात.. हडप्पा-मोहनजोदड़ो संस्कृतीशी समकालीन असणाऱ्या सुमेर संस्कृतीतील शिक्क्यांचा तौलनिक अभ्यास करणारे 'Laurence A. Waddell' 1925 साली प्रकाशित झालेल्या आपल्या 'indo Sumerian seals deciphered' या पुस्तकात दोन्ही संस्कृतींमधील समान वाचन असणाऱ्या शिक्क्यांचे वर्णन देतात. त्यातील एका शिक्क्यावर 'एदिनचा पुरोहित भृगु ऋषी' असे लिखाण आढळते. एदिन (Edin) हा प्रदेश सिंधू नदीच्या खोऱ्यात अस्तित्वात होता. तसेच यातील दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इथे पुरोहित या शब्दाचा अर्थ ब्राम्हण नसून 'अग्नीशी संबंधित कार्य करणारा' असा असावा, कारण दुसऱ्या एका शिक्क्यावर एदिन येथील कण्व नावाच्या 'मंत्रपुरोहिताचा' ब्राम्हण असा स्पष्ट उल्लेख आहे‌. भारतीय संस्कृतीशी या सुमेरियन संस्कृतीचा फार घनिष्ठ संबंध आहे, हे दाजी नागेश आपटे यांच्या 'हिंदी-सुमेरी संस्कृति' या पुस्तकातून स्पष्ट होते. अनेक वैदिक दैवतांची सुमेरियन दैवतांशी असलेली समानता विलक्षण आहे.

मोहनजोदड़ो येथे उत्खननात सापडलेला शिक्का


              भृगु हेच अग्नीचे जनक आहेत. त्यांनीच अग्नी कसा उत्पन्न करावा आणि त्याचा वापर कसा करावा हे सांगितले अशी मान्यता आहे. भृगु अग्नीतून उत्पन्न झाले असे मानले जात असले तरी भृगूंनीच पृथ्वीवर पहिल्यांदा अग्नी प्रदीप्त केला अशा आशयाचे वर्णन ऋग्वेदात मिळते. ऋग्वेदानुसार भृगुऋषींनी 'मातरिश्वन्' कडून अग्नी प्राप्त करुन पृथ्वीवर आणला. कदाचित यामुळेच भृगुवंशियांनी सर्वप्रथम व फार मोठ्या प्रमाणावर अग्नीपुजा सुरु केली. भृगुंचे मुलस्थान असलेल्या फारसमध्ये याच अग्नीपुजेतून पारशी (जोरोस्ट्रीएन) धर्माचा उदय झाला. आजही पारसी लोक भृगुऋषींची 'अथवन्' या नावाने पुजा करतात. भारतीय संस्कृतीत देखील सर्व महत्त्वाच्या यज्ञ प्रसंगी भृगुऋषी (भार्गववंशी) पौराहित्य करत असल्याच्या नोंदी आहेत. दक्ष प्रजापतीने केलेल्या यज्ञापासून ते महाभारतातील प्रसिद्ध द्यूतसभेपर्यंत अनेक मुख्य यज्ञ आणि सभा प्रसंगी भृगू हजर होते असे उल्लेख शिव पुराण, वायू पुराण, महाभारत आणि स्कंद पुराणात सापडतात.
#रणमस्तबहाद्दर

सध्या इतकेच.. 


भृगुऋषींसंबंधी इतर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.. 👇🏻

https://swapnsutra.blogspot.com/2019/08/blog-post_3.html

https://swapnsutra.blogspot.com/2021/05/blog-post.html

                                ✍🏻 स्वप्नील महेंद्र जाधवराव.




Comments

Post a Comment

Popular posts from this blog

हैबतबाबा पवार आरफळकर

छत्रपती गादी

धावजी पाटील, सुरुर