पेशव्याच्या कैदेतील सातारकर छत्रपती..
कुंपणच जेव्हा शेत खातं..
पेशव्याच्या कैदेतील सातारकर छत्रपती..
श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्य मंदिरावर छत्रपती थोरल्या शाहू महाराजांनी कळस चढवला. 'अहद् तंजावर तहद् पेशावर अवघा मुलुख आपला' म्हणत शाहू महाराजांनी आलम हिंदुस्थान आपल्या छत्राखाली घेतला.. शाहू छत्रपती निपुत्रिक असल्याने आयुष्याच्या शेवटच्या काळात कोल्हापूरचे पदच्युत छत्रपती शिवाजी यांचे चिरंजीव व छत्रपती ताराबाईंचे नातू 'रामराजा' यांना दत्तक घेऊन गादीचे वारसदार बनवले.
छत्रपती रामराजा यांचेसोबत पंतप्रधान बाळाजी बाजीराव भट उर्फ नानासाहेब याने 'सांगोला करार' केला. यान्वये छत्रपतींची सर्व सत्ता पुणेकरांच्या ताब्यात जाऊन छत्रपती नामधारी बनले. त्यांच्या उदरनिर्वाहासाठी 'पगार' ठरवून देण्यात आला. याहूनही पुढे जाऊन शाहू छत्रपतींच्या काळात सातारा नगरीचे रहिवासी झालेले छत्रपती अजिंक्यतारा किल्ल्यावर 'नजरकैदेत' ठेवण्यात आले. छत्रपती रामराजांना वेडे ठरवून तर पुढे त्यांचे दत्तक पुत्र छत्रपती दुसरे शाहू हे दोघेही याच कैदेत ठार झाले.
![]() |
| किल्ले अजिंक्यतारा |
दुसरा बाजीराव प्रधान अर्थात रावबाजी याने तर छत्रपती द्वेषाची सीमा गाठली. छत्रपती दुसऱ्या शाहूंच्या तेराव्या दिवशी ऐन दुखवट्यातच प्रतापसिंह महाराजांना साताऱ्यात अभिषिक्त करुन छत्रपती घोषीत केले. 'तुम्ही थोरले शाहू आणि मी थोरला बाजीराव' अशा बढाया मारत छत्रपती परिवार आणि आप्तेष्टांची मने जिंकण्याचा प्रयत्न केला आणि दुसऱ्याच दिवशी पुन्हा अजिंक्यताऱ्यावरील नजरकैदेत राजकुटुंबाची रवानगी केली. या कैदखाण्यावर जेलर म्हणून त्र्यंबकजी डेंगळे नेमला होता. त्याच्या परवानगी शिवाय छत्रपती परिवारास कोणाला भेटण्याची देखील परवानगी नव्हती.
छत्रपती प्रतापसिंह महाराजांच्या शिक्षणावर रावबाजीने बंदी घातली होती. पण छत्रपती प्रतापसिंहांच्या मातोश्री आनंदीबाई उर्फ माईसाहेब या अतिशय करारी आणि कर्तबगार राजमाता होत्या. त्यांनी अत्यंत शिताफीने आणि गुप्तपणे छत्रपतींच्या शीलवर्धनाचे आणि शिक्षणाचे कार्य पार पाडले. सर्वत्र पेशव्याचे आणि डेंगळ्याचे गुप्तहेर कडक पहाऱ्यावर होते. तरी आपला पुत्र निरक्षर राहू नये म्हणून माईसाहेब आपल्या लेकरास पहाटे दोन अडीच वाजता उठवून शिकवायच्या आणि चार साडेचार वाजता पुन्हा निजवायच्या, त्यामुळे इतर कोणाच्या ते लक्षात येत नसे.
पुढे एकदा "नव्या राजवाड्यातील माजघरात ढेकूण झाले आहेत त्यामुळे वरच्या दिवाणखान्यातील तख्त आणि जमादारखाना खाली आणून दिवाणखाना वापरायला द्या" असे माईसाहेबांनी बंदरे कारभाऱ्याला सांगितल्यावर "पुण्याला सदाशिव माणकेश्वर (पेशव्याचे कारभारी) यांना विचारतो" असे उत्तर मिळाले.
दरवर्षी छत्रपती प्रतापसिंहांचे वडील शाहू यांच्या वैशाख शु.९ च्या श्राद्धाला अकरा मराठे पितर आणि मराठा सवाष्णी जेवायला लागायच्या. त्यांचीही कसून तपासणी घ्या असा डेंगळेचा हुकूम! यावरुन माईसाहेबांचा नेहमीच वादंग उडायचा. झाडा (तपास) घ्यायचा का नाही याचेही हुकूम डेंगळे पुण्यावरुन मागविणार आणि ते ही ऐन श्राद्धाचा दिवस उगवल्यावर !
प्रतापसिंह महाराजांची आजी (शाहूंची आई) शहरातील वाड्यात एकाकी आजारी पडल्या, "पायास गुडग्याखाली कला बहुत लागल्या आहेत, सिरागत वायूची भावना, वैद्य बोलतात ज्वरहि आहे, काहिली बहुत." अशी बातमी किल्ल्यात माईसाहेबांना कळताच त्यांनी खाली दासी पाठवली. "माईला म्हणावे, मला येऊन भेटून जा." असा तिकडून निरोप आला. त्यावर डेंगळे माईसाहेबांस म्हणाला "सारे खरे, पण पुण्याचा हुकूम आल्याशिवाय मी काय करु शकणार ? जाऊ देता येणार नाही."
छत्रपती घराण्यावर होणाऱ्या अत्याचार आणि अपमानाची ही अगदी थोडकी उदाहरणे आहेत. इतक्या साध्या सुध्या गोष्टींसाठी सुद्धा छत्रपती पुण्याच्या 'हुकुमाचे मोहताज' होते. हे सर्व एखाद्या राजघराण्यासाठी किती क्लेषदायक असेल याची कल्पनाच करता येत नाही. पुढे कळत्या वयात छत्रपती प्रतापसिंह आपल्या सुटकेसाठी धडपड करत आहेत हे लक्षात आल्यावर एखाद्या कैद्याप्रमाणे रावबाजीने संपुर्ण छत्रपती कुटुंबीय दुर्गम अशा वासोटा किल्ल्यावर कैदेत टाकले. पुढे एल्फिन्स्टनने बाजीरावाविरुद्ध युद्ध पुकारताच त्याने आपल्या सैन्यासोबत छत्रपतींची गावोगाव फरफट सुरू केली.
छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मंत्रीमंडळात बनवलेले मुख्य प्रधान हे अष्टप्रधान मंडळातील फक्त एक कारभारी पद. पण याच प्रधानांनी सातारा छत्रपतींच्या नरड्याला फास आवळने म्हणजे दैवाचा दुर्विलासच.. आणि या कचाट्यात देखील साताऱ्याला प्रतापसिंहासारखा छत्रपती लाभणे म्हणजे त्याच दैवाचा मुक्तहस्त आशिर्वाद..!
#रणमस्तबहाद्दर
#श्रीमंतसाताराछत्रपती
✍🏻 स्वप्नील महेंद्र जाधवराव.
संदर्भ : मराठ्यांच्या इतिहासाची साधने
: छत्रपती प्रतापसिंह आणि रंगो बापूजी

Comments
Post a Comment