रामदासी आणि सातारचे छत्रपती

 रामदासी आणि सातारचे छत्रपती

समर्थ रामदास स्वामी हे शिवरायांचे गुरु होते की नव्हते या वादात आपल्याला पडायचे नाही. कोणताही इतिहासकार समर्थांच्या गुरु असण्याला दुजोरा देत नाही. तथापि रामदासी संप्रदाय हा आजचा आपला विषय आहे. साधारणतः छत्रपती थोरल्या शाहू छत्रपतींच्या काळात रामदासी संप्रदायाचे प्रस्थ बरेच वाढले होते. राजवाड्यासह साधारणतः साताऱ्यातील प्रत्येक सरदाराच्या वाड्यातील देवघरात 'श्रीराम' रामदास स्वामी आणि कल्यान स्वामींच्या मार्फत विराजमान झाले. चाफळ हे या संप्रदायाचे प्रमुख स्थान. इथून समर्थांची गादी गुरुशिष्य परंपरेने चालत असे. आजच्या घडीला सातारकर छत्रपतींसाठी श्रीराम आणि समर्थ रामदास हे वंदनीय आहेत हे वेगळे सांगण्याची गरज नाही. सध्याच्या त्यांच्या अनेक पत्र व पत्रिकांची सुरुवात 'श्री सद्गुरु समर्थ प्रसन्न' या घोषवाक्याने होत असते. (पुढे देणार असलेली घटनाच छत्रपतींच्या या रामदासी प्रेमाचे कारण असावे असा अंदाज बांधता येतो.) 

फोटो : छत्रपती महाराज शिवेंद्रसिंहराजे उर्फ बाबाराजे यांच्या लग्नपत्रिकेचा मायना, ज्यात श्री सद्गुरू समर्थ प्रसन्न असा उल्लेख आहे.


             दुसऱ्या बाजीरावाच्या कैदेचा फास दिवसेंदिवस प्रतापसिंह छत्रपतींभोवती आवळतच होता. राज्याभिषेकानंतरही तब्बल सहा वर्षे सुरु असलेली छत्रपतींची अवहेलना छत्रपतीनिष्ठ लोकांना सहावत नव्हती. शेवटी गोऱ्या साहेबाशी संधान साधण्याचा निर्णय ठरला. इ.स.१८१४ साली बोरगाव येथे चिटणीसांच्या वाड्यात चाफळचे स्वामी (रामदासांचे दण्डधारी), विठ्ठलपंत, दाजिबा उपाध्ये, रंगोपंतदादा, सेटिबा देवपुजे आणि रंगो बापूजी यांच्या बैठकीत पुण्यात एलफिन्स्टनला भेटून छत्रपतींचे हालहवाल सांगायचे आणि त्यांची सुटका होऊन दौलत छत्रपतींच्या हाती येईल असा काही पर्याय शोधायचे ठरले. एलफिन्स्टन त्यावेळी १८०२ च्या वस‌ईच्या तहाने जवळपास इंग्रजांचा मांडलिक झालेल्या रावबाजी पेशव्यावर नजर रोखून पुण्याच्या गारपीरावरच ठाण मांडून बसला होता. 


                  रंगो बापूजी गुप्ते आणि बळवंतराव मल्हार चिटणीस या दोघांनी संधी पाहून एलफिन्स्टन साहेबास प्रतापसिंह महाराजांच्या कोंडमाऱ्याविषयी सविस्तर वृत्तांत सांगितला. त्यावर "तुम्हाला महाराजांचा पाठींबा आहे का ? कसेही करुन छत्रपतींची या राजकारणाबाबत आम्हाला चिठ्ठी घेऊन या मग विचार ठरवता येईल" असा जवाब एलफिन्स्टनने दिला. जैतापूरला (ता.कोरेगाव) माघारी आल्यावर चिटणीसांनी चाफळच्या स्वामींना बोलावून घेत पुन्हा एक मसलतीची बैठक बसवली. लवकरच ही मंडळी सातारला येऊन दररोज गडावर जाणाऱ्यांपैकी नरसू काकडे आणि नारोळकर वैद्याला भेटली. 'इंग्रजांकडे राजकारण सुरु केले आहे' असा गुप्त संदेश नारोळकराकरवी महाराजांकडे पाठवला. 'मसलत करणाऱ्यांपैकी कोणीतरी किल्ल्यावर आला पाहिजे' असे उत्तर महाराजांनी पाठवले. अलगद ही जबाबदारी रंगो बापूजीवर येऊन पडली. 


                  चाफळकर स्वामींनी आपली कफनी, झोळी, माळा उतरवून रंगोबा गोसाव्याच्या हाती दिल्या सोबतच महाराजांची खात्री पटावी म्हणून स्वदस्तुरची एक चिठ्ठी दिली. जय जय रघुवीर समर्थ चा घोष करत हा गोसावी अजिंक्यताऱ्याची गडदेवता मंगळाईच्या दर्शनाला निघाल्याचे सोंग करुन गडावर गेला. तात्या नारोळकराला स्वामीच्या खुनेची चिठ्ठी दिली, त्याने ती महाराजांना दाखवली व महाराजांनी खात्री करुन तात्याच्या हस्ते त्यांची चिठ्ठी रंगोबाच्या झोळीत टाकली. आता खरी कसरत सुरु झाली होती. चिठ्ठीसह किल्ल्यातून बाहेर पडणे महाकठीण..! त्यात ही चिठ्ठी सापडली म्हणजे कटबाज तर थेट फासावरच पण बिचाऱ्या प्रतापसिंहांची देखील धडगत राहणार नाही.  


              रंगोबाने एक शक्कल लढवली. एका बाजूला जाऊन आपल्या पायाची पोटरी चिरली. त्यात छत्रपतींची चिठ्ठी लपवून वर चुना आणि झाडपाल्याचा चेचलेला पेंड बांधून कुत्रा चावल्याचे नाटक करत लंगडत लंगडत महाद्वाराजवळ आला. पण दुर्दैव म्हणजे नुकताच खालच्या शहरातून वर आलेला किल्लेदार काशीपंत बंदरे दरवाजावरच उभा ! हा रामदासी गोसावी बघताच काशीपंत भयंकर संतापला.चौकशीच्या डरकाळी सोबत शिव्यांची सरबत्ती झडू लागली. फितूरीच्या संशयावरून चिंचेच्या फोकाने गोसाव्याला सडकून काढले. "मी गरीब रामदासी गोसावी, देवी मंगळाईच्या दर्शनाला आलो होतो" यापलीकडे तो काहीच बोलेना हे बघून काशीपंताने त्याला कचेरीत नेऊन कारकुनाला कसून झाडा घेण्याचे आदेश दिले. तरीही काही सापडेना म्हटल्यावर त्या रामदासीला दोन दिवस अन्नपाण्याशिवाय चौकीवर अटकेत ठेवण्याचा हुकूम दिला.
(एखादा व्यक्ती छत्रपतींना भेटल्याच्या संशयावरून इतकी शिक्षा, मग विचार करा छत्रपतींची नजरकैद कशा पद्धतीची असेल..)
              किल्यावर काशीपंताने गोसावी पकडला ही बातमी पसरताच इकडे जैतापूरला सगळे कपाळाला हात लावून बसले. स्वामीनी तर देव पाण्यात ठेऊन समर्थांना साकडे घातले. दोन दिवस अन्नपाण्यावाचून तडफडत ठेऊनही हा गोसवडा काही कबूल‌ करत नाही म्हणून काशीपंताने अखेर त्याला हाकलून लावला. पायाची जखम आणि त्यातून वाहतं रक्त घेत रंगोबा त्याच पाऊली उपाशी तापाशी माहुलीहून जरंड्याच्या डोंगराकडून जैतापूरला गेला. चिटणीसाच्या अंगणात उभा राहून मोठ्याने "जय जय रघुवीर समर्थ" असा जयघोष केला. स्वामींनी बाहेर येऊन रंगोबाला मिठीच मारली, 'रंगोबा क्षेम आहे ना ?' या प्रश्नावर रंगोबाने होकारार्थी हलवलेली मान पाहून स्वामी मोठ्याने गरजले.. 


             "समर्थाचिया सेवका वक्र पाहे
            असा सर्व भूमंडळी कोण आहे
            जयाची लिला वर्णिती लोक तिनी
            नुपेक्षी कदा राम दासाभिमानी..!
"


पुढे एका पत्रात ही सर्व हकीकत देताना रंगोबा लिहितो -- "स्वामिनी मला पोटासी धरुन नेत्रातून पाणी अंगावर टाकीले. फार श्रमी सर्वत्र जाहले. आणि बोलिले की आज कासीपंतांनी चिंचेच्या फोका व बेडी वैगरे जरब देणे ती दिल्ही. परंतु तू कोणाचे नाव न घेता सर्वांचा बचाव केलास व महाराजाची हातची चिठी पायाचे मनगटात बांधून आणली, ही गोष्ट श्रीनी मोठी केली. बरे, महाराजाचे पायास तू मळ लाविला नाहीस. मोठे संकटातून पार पाडिलेस. नाहीपेक्षा प्राण चिटणीसानी व आम्ही व ज्याची नावे कळती त्याणी देणे आला होता. विठ्ठलपंतबाबा इत्यादी तू आज वाचविलेस. ये वेळेस बक्षिस तुला काय द्यावे बोलिले." पंतसचीवाने गिळलेले माझे वतन परत मिळावे असे म्हणताच "श्रीस्वामीनी श्रीरामाची पुजा करतेवेळी शफत वाहून तुळशी देवावरील दिल्या आणि सांगितले की हे वचन आज माहाराजानीच दिल्हे असे समज." 


              आपल्या सर्वस्वाचा नाश करुन पराकोटीची छत्रपतीनिष्ठा दाखवणारे रंगो बापूजी आणि चिटणीस आपल्याला पुढे पदोपदी भेटणारच आहेत, परंतू पेशव्यांच्या कैदेतील छत्रपतींना सोडवण्यासाठी चाफळच्या स्वामींनी जिवावर उदार होऊन घेतलेला पुढाकार देखील विसरुन चालणार नाही.‌ या एका घटनेचा परिपाक पुढे एलफिन्स्टनने 'मी छत्रपतींना पेशव्याच्या कैदेतून मुक्त करण्यासाठी लढतोय' असे म्हणत बाजीरावाचे उच्चाटण करुन, छत्रपती स्वतंत्र होण्यात झाला..
#रणमस्तबहाद्दर          
#श्रीमंतसातारकरछत्रपती    
                                        - स्वप्नील महेंद्र जाधवराव.







Comments

Popular posts from this blog

हैबतबाबा पवार आरफळकर

शेखमिरा संस्थान

गावकुसावरील देवता