श्री चंद्रेश्वर महादेव, भुईंज

 श्री चंद्रेश्वर महादेव, भुईंज

आज गंगा दशहरा निमित्त भृगुभुमीतील श्रीविष्णुरुपिणी कृष्णामाईच्या काठावरील विस्मृतीत गेलेल्या चंद्रेश्वर महादेवाची ओळख करून घेऊ.. 

सिद्धेश्वर-चंद्रेश्वर महादेव, भुईंज

आपल्या सर्वांना एक गणेशकथा माहिती आहेच, स्कंदपुराणात पंधराव्या अध्यायात ही कथा देवर्षी नारदमुनी ऋषीगणांना सांगतात. ज्यात आपल्या पिटुकल्या मुषक वाहनावरुन कैलासी जात असता महाकाय बाल गणेशाचा तोल जाऊन तो ढासळतो. त्याला पाहून आकाशातील चंद्र हसतो आणि गणपतीला राग येतो. आपल्या स्वरुपाचा गर्व असलेला चंद्रमा गणपतीच्या बेढब शरीरावरुन त्याला चिडवतो अशी काही ठिकाणी माहिती मिळते. चिडलेला गणपती "येत्या भाद्रपद शुद्ध चतुर्थीला तू या जगातून अदृश्य होशील, निष्प्रभ होशील. शुद्ध चतुर्थीला (विनायकी चतुर्थी) जो कुणी तुला पाहिल त्याच्यावर चोरीचा आळ येईल" असा श्राप देतो. 

                चंद्र शापित झाला हे पाहून ब्रह्मदेव तिथे येतात आणि कैलासावर जाऊन गजाननाची मनधरणी करण्याचा प्रयत्न करतात. 

आदिमूर्ति गजानना ॥ ब्रह्मा विष्णु शिवकारणा ॥

 मंगलधामा सनातना ॥ शरण चरणा पातलो ॥

असे म्हणत चतुरानन गणपतीची स्तुती करु लागतात..


ब्रह्मोवाच :-

यं ब्रह्मवेदान्तविदो वदन्ति

परं प्रधानं पुरूषं तथाऽन्ये।

विश्वोद्गतेः कारणमीश्वरं वा

तस्मै नमो विघ्नविनाशनाय ॥


नमो नमः कारणकारणाय

नमो नमो मङ्गलमङ्गलात्मने।

नमो नमो ब्रह्मविदां मनीषिणा

मुपासनीयाय नमो नमस्ते ॥


- ज्याला वेदान्त ब्रह्म म्हणतात, ज्याला सांख्य प्रधान पुरूष म्हणतात, विश्वाचे उद्गम असणाऱ्या या कारण परमेश्वर विघ्ननाशन गणरायाला नमस्कार असो.

- जो कारणांचाही कारण आहे, जो मंगलांचाही मंगल आहे, ब्रह्मवेत्ते मनीषिन् जनांचे उपास्य गणराज यांना वारंवार नमस्कार असो.


उपासनेने प्रसन्न झालेला मंगलमूर्ती 'माझी उक्ती कल्पांतीही वाया जाणार नाही' असे म्हटल्यावर परमपिता ब्रह्म पुन्हा गणपतीला विनवणी करतो. 

 "तू अससी दयानिधी ॥ मुक्त करी गा कल्पनिधी ॥ देवाधिदेवा गणेशा ॥"

शेवटी करुणाकर गणाधीश लंबोदर - "भाद्रपद शुद्ध चतुर्थीला जो कोणी माझे भक्तीभावाने पुजन करेल आणि चंद्राकडे पाहणार नाही त्याला हा शाप बाधणार नाही." असे म्हणत "हे कलानिधी चंद्रा, कृष्णामाईच्या उत्तर तीरावर जाऊन तपश्चर्या कर. तू शाप मुक्त होशील." असा उ:शाप देतो. 


            विनायकाची ही आज्ञा ऐकून तो शशी शशीधर महादेवास प्रसन्न करण्यासाठी ब्रह्मदेव आणि गणरायाला वंदन करुन सह्यगिरीच्या दिशेने निघाला. चंद्रीका नदी जिथे कृष्णामाईला मिळते त्या पवित्र संगमावर भुईंज ग्रामी सिद्धेश्वर महादेवाजवळ बसून चंद्राने "ॐ नमः शिवाय |" या पंचाक्षरी मंत्राचा सोळा वर्षे जप केला. आशुतोष श्री सिद्धेश्वराने प्रसन्न होऊन आपला पद्महस्त चंद्राच्या माथ्यावर ठेवताच तो शापमुक्त झाला आणि श्री सिद्धेशास "श्री चंद्रेश्वर महादेव" असे नामाधिमान प्राप्त झाले.


ही झाली पौराणिक कथा, सद्यस्थितीला हे स्थान कुठे आणि कसे आहे ते आपण पाहू.. 


           भुईंज मध्ये फुलेनगरकडे जाताना आचार्यश्रेष्ठ भृगुऋषी मठाच्या शेजारुन एक ओढा वाहतो, जो तिथेच जवळ कृष्णामाईला मिळतो. हा ओढा चवनेश्वाराच्या डोंगरात उगम पावल्याने याला 'चवनोबाचा ओढा' असे सध्या म्हटले जाते. तीच ही पौराणिक चंद्रिका नदी. आणि जिथे ही चंद्रिका कृष्णामाईत एकरुप होते ते 'चंद्रिका तिर्थ'. जवळच उत्तराभिमुख सामाधिस्थ असलेल्या भृगुऋषींचे मुख देखील याच चंद्रिका आणि चंद्रेश्वराकडे आहे.  


            शेजारीच असलेली शिवचरणरत लिंगायतांची दफनभूमी महादेवाचे 'स्मशानभैरी' रुप देखील सार्थक करते. भृगुमठाच्या उत्तरेला घुमुटाकृती शिखराचे गर्भगृह असलेले छोटेखानी मंदिर आहे. मंदिरावरील शिखर उत्फुल कमळातील उपडा घडा त्यावरील आणखी एक उत्फुल कमळातील दुसरा छोटा घडा आणि त्यावर उपडे कमळ आणि त्याच्या देठातून वरती आलेला कळस अशा आकाराचे आहे. याच्याच आणखी चार छोट्या प्रतिकृती याच्या चारी दिशांना आहेत. कळसावरील हा मुस्लिम स्थापत्याचा प्रभाव याची बांधणी शिवकालीन किंवा मराठेशाहीतील असल्याचे दर्शवितो‌. द्वारपट्टी गणपती आणि किर्तीमुखाने सुशोभित आहे. मंदिरासमोर तीन नंदी असून मधल्या मेखला, घुंगुरमाळा इत्यादींनी सजलेल्या नंदीच्या पायात छोटे शिवलिंग पहायला मिळते. मंदिरातील देखणे शिवलिंग त्याच्या प्राचिनत्वाची साक्ष द्यायला पुरेसे आहे. मंदिरातील देवडीत असलेल्या छोट्या जिर्ण मुर्ती पार्वती आणि गणेशाची खूण दाखवतात. 

चंद्रिका तीर्थ
         याच झाडीमध्ये कृष्णा-चंद्रिका संगम झालेला आहे.         

या चंद्रिका तिर्थावर श्रावण सोमवारी जो सक्तुपिंड श्राद्ध करतो त्याच्या सात कुळांचा उद्धार होतो, असे स्कंदपुराण सांगते. तर याच चंद्रेश्वराजवळ दैत्यगुरु शुक्राचार्यांनी देखील तपश्चर्या केल्याचे उल्लेख मार्कंडेय पुराणात आहेत अशी माहिती मिळते. 

#रणमस्तबहाद्दर

#अपरिचीत_भुईंज #IncredibleBhuinj

#चंद्रेश्वर_महादेव #सिद्धेश्वर_महादेव

#चंद्रिका_तीर्थ #कृष्णामाई

          

                                     ✍🏻 स्वप्नील महेंद्र जाधवराव.

Comments

  1. ॐ चंद्रकेश्वरा य नमः हे झाले काखेत कोळसा गावा ला वळ
    सा

    ReplyDelete
  2. हे मंदिर माझ्या पंजोबानी बाधले आहे.
    सा. कृष्णाबाई भ्र. विष्णू चव्हाण
    भुईंज
    सन ०१/१०/१९२३

    ReplyDelete
  3. अप्रतिम स्वप्नील दादा

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

हैबतबाबा पवार आरफळकर

शेखमिरा संस्थान

गावकुसावरील देवता