महाशैव पाशुपत भृगुऋषी

 महाशैव पाशुपत भृगुऋषी 


दक्ष यज्ञात सतीने अग्नीसमर्पण केले ही कथा आपण जाणतोच.. पण याच कथेतून भृगुऋषींचाही शिव उपासक होण्याचा मार्ग सुरु होतो‌. श्री मुद्गल पुराणातील दुसऱ्या खंडात ४८ व्या "भृगुचरितम्" नामक अध्यायात यासंबंधीची जी कथा येते ती पुढीलप्रमाणे..


भृगुऋषींचे पिताश्री ब्रह्मदेव हे या सृष्टीचे निर्माते म्हणून सावित्री (गौतमी) नदीकाठी झालेल्या ऋषीसभेत भृगुऋषींनी चराचराला जन्म देणाऱ्या जगत् पिता ब्रह्माला सर्वश्रेष्ठ ईश्वर मानले होते. पण पुढे त्रिदेवांची परीक्षा घेऊन त्यांनीच गुणातीत नारायण हा सर्वश्रेष्ठ आहे असा निकाल दिला होता. विष्णुंची महत्ता लक्षात आल्याने भृगुंनी वैष्णव मार्ग स्विकारुन भुईंज क्षेत्री पापक्षालन तप केले. इथे विष्णू त्यांना प्रसन्न झाल्यानंतर त्यांनी वैष्णवमार्गी जिवन व्यतीत करण्यास सुरुवात केली. 

              प्रजापती दक्ष यांची एक कन्या ख्याती ही प्रजापती भृगुऋषींची पत्नी होती तर दुसरी कन्या सती ही महादेवांची पत्नी होती. भृगुऋषी आणि महादेव हे नात्याने साडूबंधू होते. दक्ष प्रजापतीने एका महायज्ञाचे आयोजन करुन विष्णूस त्याचे प्रमुखपद देण्याचे ठरवले. भृगु हे अग्नीचे आद्य उपासक असल्याने यज्ञ प्रवर्तक म्हणून त्यांना विनंती करण्यात आली. दक्षाने शंकराला या यज्ञापासून मुद्दामहून दूर ठेवले होते. सतीला आपल्या पतीच्या अपमानाने राग अनावर झाला व ती यज्ञस्थळी पोहचली. तिथे दक्ष आणि सतीमध्ये वादविवाद होऊन शेवटी तीने यज्ञात (योगाग्नीत) आत्माहुती दिली. 

               वरील सर्व प्रकाराने महादेव अत्यंतिक क्रोधित झाले. त्यांनी क्रोधात वीरभद्राला उत्पन्न करुन त्याला गणांसह जाऊन दक्ष यज्ञ बेचिराख करण्याची आज्ञा केली. दक्ष आणि वीरभद्राच्या सैन्यामध्ये घनघोर युद्ध सुरु झाले. यात श्रीहरी विष्णू दक्षाच्या बाजूने लढत होते.  यानंतर महादेवही या युद्धात उतरले. यावेळी आपल्या योगबलाने भृगुऋषींनी यज्ञातून सैन्य निर्माण करुन दक्षाला मदत करण्याचा प्रयत्न केला. पण या युद्धात विष्णूला पराभूत करुन शंकराने दक्षाचा शिरच्छेद केला. त्याचे मुंडके यज्ञात टाकून यज्ञही भ्रष्ट केला. 


              पुढे दक्षाची पत्नी, मुली आणि इतर देवगणांनी विनंती केल्यावर महादेवांनी दक्षाला अज (बोकडाचे) मुख बसवून जिवंत केले. दक्षाला मदत केल्याने क्रोधित होऊन नंदीने भृगुऋषींना श्राप दिला त्याने ते वारुणि (मद्यपी) झाले. (या वारुणि उपाधी बद्दल इतरही एक खुलासा ऐतरेय ब्राह्मण ग्रंथात आहे.) तेव्हा त्यांना जिवनदानानंतर दक्षाने केलेल्या स्तुतीवर खुश होऊन महादेवांनी सांगितलेल्या पाशुपत मार्गाची आठवण झाली. शैव उपासनेचा हा पहिला आणि सर्वात प्राचीन मार्ग आहे. हे जग काळाच्या आधीन आहे. काळ (मृत्यू) हे जीवनाचे अंतिम सत्य असून  काळाच्या पुढे जाणे कुणालाही शक्य नाही आणि शिव हा साक्षात काळस्वरुप आहे त्यामुळे त्याहून श्रेष्ठ या जगात कोणीही नाही अशी धारणा करुन भृगुऋषी शिवचरणी रत झाले. त्यांनी उर्ध्वपुंड्र सोडून त्रिपुंड धारण केले. सर्वांगावर भस्म लिंपून पाशुपत साधनेस सुरुवात केली. 

हडप्पा येथील उत्खननात सापडलेली पशुपती मुद्रा

             अभ्यासकांच्या मते शिवाला आद्य आणि सर्वोच्च शक्ती समजणाऱ्या शैव उपासनेत 'पाशुपत' हा सर्वात पहिला मार्ग समजला जातो. 'सर्व प्राणिमात्रांचा ईश्वर' म्हणून 'पशुपती' या रुपात शिवाची आराधना केली जाते. शिव स्वतः या मार्गाचा आद्य प्रवर्तक समजला जातो. पार्वती, कार्तिकेय, नंदीकेश्वर (नंदी), दक्ष आणि भृगुऋषी हे या मार्गाच्या सुरुवातीच्या उपासकांपैकी आहेत. यानंतर लकुलीश नावाचा आणखी एक शैव संप्रदाय उदयास आला. शिवाच्या लिंग रुपात उपासनेला अनन्यसाधारण महत्त्व पाशुपत संप्रदायानेच दिले. दिवसातून तीन वेळा अंगावर राख चोळून ॐ या एकाक्षरी मंत्रजपासह ध्यान लावण्याचा मार्ग यात सांगितला आहे. (भृगुऋषींनी शिव साधनेचा हाच मार्ग अवलंबला होता.) महाराष्ट्र आणि गुजरात मध्ये या पाशुपत मार्गाचे फार मोठ्या प्रमाणावर चलन असल्याचे पहायला मिळते. हे दोन्ही भाग भृगुंची कर्मभूमी होते‌. याच पाशुपत मधून पुढे अतीशय उग्र असे कापालिक व कालमुख तर मध्यम असा शैव सिद्धांत हे संप्रदाय उत्पन्न झाले. 

#रणमस्तबहाद्दर                 

संदर्भ: श्री मुद्गलपुराण, श्री स्कंदपुराण 

                 


टिप : भुईंजमध्ये समाधिस्थ उत्तराभिमुख भृगुऋषींच्या अगदी समोरच काही अंतरावर सिद्धेश्वर-चंद्रेश्वर महादेव मंदिर आहे. चंद्राच्या तपश्चर्येने याला चंद्रेश्वर नाव पडले असले तरी आधी त्यास सिद्धेश्वर हे नाव असल्याचे वर्णन स्कंदपुराणात आहे. इथे दैत्यगुरु शुक्राचार्यांनी चंद्रेश्वराची तपश्चर्या केल्याची माहिती मिळते. पण याबद्दल ठोस पुरावे मिळाल्यास महादेवास सिद्धेश्वर हे नाव भृगुऋषींच्या साधनेने प्राप्त झाले असे नक्की होऊ शकेल. 

                                    ✍🏻 स्वप्नील महेंद्र जाधवराव.

Comments

  1. खूप छान अद्भुत माहिती मिळाली धन्यवाद आपले सर्व लेख वाचनीय असतात

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

हैबतबाबा पवार आरफळकर

शेखमिरा संस्थान

गावकुसावरील देवता