आदिगाणपत्य प्रभु श्री भृगुऋषी महाराज

 आदिगाणपत्य प्रभु श्री भृगुऋषी महाराज 


आणि कृष्णा-वेण्णा-कोयनादी पंचगंगा उत्पत्ती.. 


गणपती हे निराकार परब्रह्माचे साकार स्वरुप असून याच ॐकार गणपतीपासून ब्रह्मा विष्णू महेश हे त्रिदेव आणि संपूर्ण चराचर सृष्टी उत्पन्न झाली अशी धारणा असणाऱ्या व श्री महागणपतीची उपासना करणाऱ्या उपासकांना ‘गाणपत्य’ म्हणून ओळखले जाते. हिंदू धर्मातील पाच प्रमुख संप्रदायांपैकी गाणपत्य हा एक आहे. याच गाणपत्य संप्रदायांचा आद्य ग्रंथ समजला जाणाऱ्या ‘श्री गणेश महापुराणाची’ रचना आचार्यश्रेष्ठ भृगुऋषी महाराजांनी केली.  हे गणेश महापुराण सर्वप्रथम ब्रह्मदेवाला स्फुरले त्यांनी ते वेदव्यासांना सांगितले. व्यासांनी त्याचा उपदेश भृगुऋषींना केला आणि पुर्वजन्मव्याधिने ग्रस्त सौराष्ट्राचा राजा सोमकांताला उपदेश करताना महर्षी भृगू यांच्या संवादातून श्री गणेश महापुराणाची रचना झाली. 

आचार्य श्रेष्ठ भृगुऋषी महाराज 

                गणेश पुराणाच्या सुरुवातीच्या आध्यायांमध्ये जी कथा येते ती याप्रमाणे - सौराष्ट्रातील देवनगरचा राजा सोमकांत पुर्वजन्म कर्माने व्याधीत होऊन शेवटी वानप्रस्थास निघून गेला. अरण्यात फिरताना त्याला बाल च्यवन दृष्टीस पडला. हा च्यवन बाळ सोमकांताला आपले पिता महर्षी भृगुऋषींकडे घेऊन आला. तिथे त्याच्या व्याधीचे हरण करताना भृगुमहाराजांनी आपल्या आश्रमात सोमकांताला गणेश पुराण सांगायला सुरुवात केली. “कल्पारंभी उत्पन्न झालेल्या त्रिदेवांना आपल्या स्वकर्तव्याचा कसलाही गंध नव्हता, ते तिघेही सर्वत्र भटकत होते. तेव्हा अचानक त्यांना सहस्त्रसुर्यतेज महागणपतीने दर्शन दिले व त्यांच्या कर्तव्याची वाटणी करुन दिली. सृष्टी रचनेचे काम ब्रह्मदेवावर सोपवले असता, 'मी यापासून पुर्णतः अनभिज्ञ आहे' असे म्हणत ब्रह्म गणपतीच्या चरणी लागला. आपल्या श्वासाबरोबर ब्रह्मास आत घेऊन त्या महोदराने त्यास आपल्या उदरातील त्रिवेद आणि असंख्य ब्रह्मांडे दाखवली व आपल्या उच्छवासासह बाहेर सोडले. 

                 बाहेर येताच ब्रह्मास वेदादीचे ज्ञान झाले. पण त्या ज्ञानाने अभिमानी झाल्याने सृष्टी निर्मितीत चतुर्मुखास बाधा येऊ लागली तेव्हा पुन्हा तो गणपतीस शरण गेला. आणि सृष्टी रचण्यास समर्थ झाला. पुढे विष्णूरुपी व्यासांनी वेदांचे चार भाग बनवून अनेक पुराणे रचली तेव्हा त्यांनाही आपल्या विद्वत्तेचा गर्व झाला. गर्वाचे खंडण करण्यात अत्यानंद मानणारा तो स्वानंदपुरनिवासी गणपती असल्याने व्यासांचीही मती भ्रष्ट होऊन विद्या लोप पावू लागली. तेव्हा परम् पिता ब्रह्माकडे जाऊन याची विचारणा करता ब्रह्मदेवाने त्यांना गणेश पुराण सांगून गाणपत्य उपासना दिली.” 

                पण अग्नीपुजक भृगुंचा ब्रह्मपुजक ते महावैष्णव ते पाशुपत शैव ते आदिगाणपत्य होण्याचा प्रवास गाणपत्यांचा दुसरा महत्वपूर्ण ग्रंथ असलेल्या ‘मुद्गल पुराणातील’ “भृगुचरितम्” या अध्यायात येतो. आपल्या योगसामर्थ्याने इंद्रासही स्तंभीत करणाऱ्या आपल्या महर्षी च्यवण या पुत्रास उपदेश करताना भृगुऋषी त्यांस आपले चरित्र सांगतात. त्यायोगे भस्म लिंपून पाशुपत मार्गाचे अवलंब करत असताना एके दिवशी ब्रह्मदेवांनी सर्व देवता व ऋषीमुनींना घेऊन शैवस्थानी महाबलक्षेत्र अर्थात महाबळेश्वर येथे (काहींच्या मते ही कथा पुष्कर क्षेत्री घडलेली आहे) एका यज्ञाचे आयोजन केले होते. पहाटेच गडबडीत सुरु केलेल्या या यज्ञात ब्रह्मदेवांनी गणपतीचे स्तवन केले नाही तसेच आपली जेष्ठपत्नी सावित्रीस सोडून गायत्रीस धर्मपत्नी मानून तिच्यासोबत यज्ञ सुरु केला. यामुळे क्रोधित झालेल्या सावित्रीने सर्व देवगण जलरुप होतील असा श्राप दिला. त्यामुळे विष्णू कृष्णामाईच्या रुपाने, शिव वेण्णेच्या रुपाने तर ब्रह्म कोयनेच्या रुपाने जलमय झाले. सावित्री आणि गायत्री या दोघीही जलरुप झाल्या. (पंचगंगा व कृष्णामाई उत्पत्ती संबंधीची स्कंदपुराणात येणारी कथा पुर्णतः वेगळी आहे. कृष्णामाईच्या लेखात ती स्वतंत्रपणे देण्याचा प्रयत्न करेन) (यात विशेष लक्षात घेण्याची बाब म्हणजे ब्रह्मविष्णूमहेशरुपी कृष्ण-कोयना-वेण्णा पुर्वेकडे वाहत पश्चिम महाराष्ट्रात येतात तर चिडलेली सावित्री एकटीच पश्चिमेकडे कोकणात उडी घेते व गायत्री आजही गुप्त पद्धतीने वाहते.) 

                पुढे भृगु सांगतात - महादेवासहीत सर्व जलमय देवतांनी आपल्या मुळ स्वरुप प्राप्तीसाठी श्री गणपतीची आराधना सुरू केली आणि गणपतीने त्यांना पुन्हा देवभाव अर्पण केला तेव्हा मला विघ्नविनाश गणनायक हा सर्वसत्ताधारी स्वतंत्र निरंकुश आहे याची जाणीव झाली. त्यानंतर त्याने पुन्हा देवांचे रक्षण केले तेव्हा सर्वव्यापक आहे असे‌ मानून मी त्याची भक्ती करु लागलो. नंतर एकदा भाग्याने व्यास मला भेटले असता सर्व वेद पुराणांतील मला शांती देईल असे ज्ञान आपण सांगा अशी विनंती करता त्यांनी मला गणेश पुराण सांगून ब्रह्मदेवांनी सांगितलेले "गणपती हा साक्षात ॐकार स्वरुप असून सर्व मंत्राचे बीज असलेला प्रणव मंत्र त्याचीच महती गातो" हे ज्ञान मला दिले. मग योगमार्गाने मद वैगरे सोडून मी गणेशाची उपासना करु लागलो आणि शांती प्राप्त केली. मित्थ्या अभिमानापासून दूर झाल्यानेच मी सर्वज्ञ ठरलो. म्हणून पुत्रा तू देखील मद सोडून गणपती चरणी रत हो. अभिमान/अहंकार/मद यांसह केलेला कोणताही तप व पुजा फळास जात नाही. 

भृगुमठातील श्री गणपती बाप्पा 

                आशातऱ्हेने ऋषीश्रेष्ठ भृगुंनी परब्रह्म गणपतीची महती ओळखून गाणपत्य मार्गाचा स्वीकार केला. स्वतः मनस्वरुप होऊन स्वतःतील दोषांशी लढायला लावून शांतियोग मार्गाने अखेर स्वानंद प्राप्ती घडवणारा हा गणपती भृगुंना साक्षात परब्रम्ह वाटला असावा. आजही समाधी मठातील भृगुऋषींच्या मुर्तीच्या भाळावरील गाणपत्य गंध त्यांच्या निरंतर गणेशभक्तीची खुण दाखवतो. भृगुऋषींच्या समाधी मठात त्यांच्या उजव्या हाताला पुर्वाभिमुख गणपतीची खडी स्थितप्रज्ञ मुर्ती स्थापित आहे. 


निराकार रुपाने संपुर्ण सृष्टीमध्ये अधिवास करणारा असा स्वानंद विलासी, ब्रह्मदेवाला स्वप्नील दृष्टांतानंद देणारा, प्रलयंकारी स्थीर असणाऱ्या वटवृक्षाच्या पानावर निजक्रिडा करणारा बाळ गणपती तुम्हा आम्हा सर्वांना आनंद देवो..😍🙏    

#रणमस्तबहाद्दर            

                            ✍🏻 स्वप्नील महेंद्र जाधवराव.


Comments

Popular posts from this blog

हैबतबाबा पवार आरफळकर

शेखमिरा संस्थान

गावकुसावरील देवता