भृगुऋषींची आरती

भृगुऋषींची आरती‌


श्री क्षेत्र भुईंज त्रिभुवनी पावन |

समाधिस्थ भृगूऋषी तिथे संजिवन ||

चंद्रिका-कृष्णा संगमी इंदू वळण |

तेथे त्वा केलेसी अजरामर स्थान ||१|| जय देव जय देव,


जय ऋषी महर्षी भृगुऋषी राजा |

आरती ओवाळू सायुज्य द्विजा || धृ.||

जय देव जय देव 


कल्पारंभी जेव्हा ब्रह्म गडबडला |

सप्तर्षी प्रजापती भार्गव निर्मिला ||

मंदाकिनी स्थापूनी निश्चिंत केला |

लत्थाघाते विष्णू चरणी लागला ||२|| जय देव जय देव, 


वेद स्मृती शास्त्र पुराणे रचली |

अवनीवरती आद्य अग्नी चेतविली ||

दर्शनमात्रे नवग्रह पिडा हरली |

नारायण आण्णांनी समाधी उद्धरली ||३|| जय देव जय देव,


गाणपत्य शैवा वैष्णव आधारा |

देव मानव राक्षस चराचर उद्धारा ||

महालक्ष्मी तिष्ठली पाठी निर्धारा |

भक्तगण स्वप्नील मुक्तीपथी तारा ||४|| जय देव जय देव,


अर्थ 


तिन्ही लोकात पवित्र समजले जाणारे भुईंज नावाचे एक तिर्थक्षेत्र आहे. तिथे आचार्यश्रेष्ठ भृगुऋषी संजीवन समाधी घेऊन आजही नित्यनेमाने तप करत आहेत. (स्कंदपुराण)

चंद्रिका आणि कृष्णेच्या संगमी संपूर्ण विष्णू रुप असलेली कृष्णा नदी परम् पवित्र असे चंद्राकार वळण घेते‌. तेच स्थान तुम्ही (भृगुऋषी) आपली तपोभूमी म्हणून अजरामर केले. 


अशा महान ऋषी, महर्षी, (इराण आणि भृगुकच्छचे राज्य उपभोगणारे) महाराज, सायुज्यतेस प्राप्त झालेल्या भृगुऋषी देवा मी तुमची आरती ओवाळतोय.. ||धृ.||


कल्पाच्या आरंभी सृष्टी निर्माण करताना जेव्हा ब्रह्मदेव पुढे काही सुचेनासे झाले तेव्हा त्यांनी सप्तर्षींपैकी एक असलेल्या प्रजापती भृगुऋषींची निर्मिती केली. तेव्हा ग्रहमंडलांची स्थापना करुन तुम्ही ब्रह्मास निश्चिंत केले. 

त्रिदेवांच्या परिक्षेवेळी लाथेच एक प्रहार करताच आपली योग्यता जाणून श्रीहरी विष्णू तुमच्या चरणी लागले. (भागवत महापुराण, स्कंदपुराण)


वेदांमधील अनेक ऋचा तसेच भृगु स्मृति, भृगु संहिता (ज्योतिषशास्त्र), भृगु संहिता (शिल्पशास्त्र), भृगु सूत्र, भृगु उपनिषद, भृगु गीता अशा विविध ग्रंथांची तुम्ही रचना केली. स्वर्गातील मातरिश्वन् कडून अग्नी प्राप्त करून पृथ्वीवर सर्वात पहिला अग्नी तुम्हीच चेतवला. (ऋग्वेद) 

भुईंज मधील पापविनाशी भृगुतिर्थात स्नान करून तुमचे दर्शन घेतल्याने नवग्रह पिडा दूर होते. (स्कंदपुराण)

तुमची महती जाणून प.पू.नारायण आण्णांनी तुमच्या समाधीचा जीर्णोद्धार केला. 


तुम्ही मारलेली लाथ आजही विष्णू छातीवर मिरवतो. त्याचे सत्व जाणूनच तुम्ही वैष्णवभक्तीचा मार्ग दिलात (भागवत महापुराण). पुढे शिव भक्तीची सुरुवात करणाऱ्या तुम्ही जगाला पाशुपत शैव मार्गाची शिकवण दिली (मुद्गल पुराण). गणेशभक्तीत लीन होऊन, आमच्यासारख्या अजान गणपती भक्तांसाठी आद्य गाणपत्य ग्रंथ असलेले गणेश पुराण रचले (गणेश पुराण, मुद्गल पुराण).

सर्वश्रेष्ठ ऋषी म्हणून तुम्ही देव, मानव आणि दैत्य या प्रत्येकांसाठी पुजनीय आहात. वेळोवेळी आपण देव, मानव आणि दैत्यांचेही रक्षण आणि उद्धार केलेला आहे. 

आपल्याच आज्ञेने आपली कन्या सर्वस्याद्या आदिमाया महालक्ष्मी निर्धाराने भुईंज ग्रामी आपल्या पाठीशी उभी आहे. (किंबहुना आपणच तिच्याकडे पाठ करुन बसलेला आहात.) 

आतापर्यंत तुम्ही ज्या त्या भक्ताला त्याचा इष्टमार्ग दाखवत आलात तसेच इथूनही पुढे आम्हा भक्तगणांना आमच्या स्वप्नील (स्वप्नवत/मनात असलेल्या) मुक्तीच्या मार्गाने तारा हीच आपल्या चरणी प्रार्थना.. 


Comments

  1. 👌👌👌🙏🙏🙏

    ReplyDelete
  2. 👍वयाने लहान आहेस पण विचारांनी थोर आहेस गावासाठी अभिमान आहेस 👌👍

    ReplyDelete
  3. खूपच सुंदर आणि अर्थ पूर्ण

    ReplyDelete
  4. अप्रतिम 👌👌

    ReplyDelete
  5. खूप सुंदर काव्य रचना

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

हैबतबाबा पवार आरफळकर

शेखमिरा संस्थान

गावकुसावरील देवता