च्या
चा
दिवसाची तजेलदार सुरवात किंवा गप्पांची मैफिल ज्या गोष्टीशिवाय होत नाही त्यो म्हंजे चा..!
आपल्याला सांगून पटायचं न्हाय, पण आपल्या रोजच्या जीवनाचा भाग झाल्याला चा दिड-दोनशे वर्षांमागं आपल्याला माहिती सुदा नव्हता. आवो एवढंच काय तर जगाला सुदा चारशे वर्षांमागं चा ची वळख नव्हती. ते चीन तेवढा मात्र दाबून चा प्यायचा..
असं म्हणत्यात की इ.स. पुर्व २७३७ मधी चीनचा राजा शैन नुंग येकदा गरम पाणी पेत होता तेवढ्यात कुठणं तरी उडून एक चहाच सुकलेलं पान त्याच्या गल्लासात पडलं. त्यामुळं त्या पाण्याला आल्याला वास, रंग आणि चव राजाला यवढी आवाडली, की गडी रोज तसाच पाणी पिऊ लागला आणि आशी झाली चहाची सुरुवात.. पण या बाटग्या मिचकुल्या डोळ्याच्यांनी, जगापास्न लय लपवून ठेवला चा...
इ.स. १६१० मधी डचांनी चा युरोपात नेला आणि मग त्यो येवढा प्रसिद्ध झाला की, आजघडीला पाण्याखालोखाल पेलं जाणारं दुसरं पेय म्हणजी चहा..
चीनमधी याला 'छा' म्हणायची त्यामुळ जगात बऱ्याच ठिकाणी चा, चहा, छा, चाय अशाच नावांनी वळखत्यात
भारतात चा आला इंग्रजांमुळं! पुन्हा चिन्यांनी चा च्या व्यापाराव नियम लावल्यावर इंग्रजी प्रवाश्यांनी आसामात चा शोधून काढला आन् १८३५ पास्न लॉर्ड बॅंटिकनं भारतात चा ची शेती सुरु केली. आज भारत चा पिकवण्यात आणि पेण्याज जगात पहिल्या नंबराव हाय.
चा कधीका आपल्यात येयना पण आज त्यो पार आपल्या रंगात रंगलाय.. त्याचं लै परकार ऐकून हाय खरं, पण आपला रोजचा कडक वाफाळलेला, टिचून आलं घातलेला कप भरुन चा घेतल्याशिवाय दिवसाची सुरवातच होत न्हाय.
परतेकाच्या हातचा चा येगळा येगळा असतो ह्यो अनुभव सगळ्यांलाच आला असल पण नावाजलेला शेफ रनवीर ब्रार एका जाहीर कार्यक्रमात म्हणलेला की, तुम्ही किती पण मोजून मापून घ्या, किती पण परिमाणं ठरवा पण चहा कधीच एकसारखा होणार न्हाई.. चा करणाऱ्याच्या मूडवर च्याची चव अवलंबून असतीय..
च्या करण्याबरच च्या पेणं आन् च्या देणं या दोन्ही कला हायेत. मला सोत्ताला आवाज करुन चा पेणाऱ्यांचा लय मजी लय राग येतो आणि तितकाच राग येतो मॉर्डन नावाखाली कपात आर्धाच चा देणाऱ्यांचा..
आरं द्याचाच नसल चा तर द्यू नगा ना.. उगा घोटभर चा द्यून तॉंड का उष्टवायचं.. 🥴
चा वर आमच्याकडं एक रांगडी म्हण हाय ती म्हंजी "मर्दानं चा च्या घोटाला आणि बाईच्या व्हटाला कधी नाय म्हणू नाय.." दोन्हीचा आनंद मनमुराद घ्यावा.. चा कसा अगदी काठोकाठ कप भरुन द्यावा मजी दोन बश्या पेल्यावर पेल्यासारख वाटतंय! आता ह्यो काठोकाठ भरलेला कप बशीत न सांडता भायेर आणून आलेल्या पाव्हण्यांकडं देणं म्हंजे खरी कसरत.
(चहा च्या भरलेल्या कपाबद्दल मी एवढा कर्मठ हाय की जिथं वरचेवर मी चहा पेतो त्या घरातल्या बाया न सांगता गप गच कप भरुन घ्यून येत्यात. 😜)
चा पेताना त्यो निवांत बशीत वतूनच प्यायचा, त्याला अजिबात लाजायच नाय ! या बदल स्वामी विवेकानंदांची एक कथा ऐकली होती, शिकागोच्या परिषदेत बशीतून चा पिण्यावरनं सगळी लोकं विवेकानंदांवर हसली तेव्हा ते अभिमानानं म्हणले की, "आत्ता जर इथं एखादा जादा व्यक्ती आला तर तुमच्यापैकी कुणी त्याला आपला उष्टा चा दिवू शकत न्हाय पण मी माझ्या कपातला उष्टा न केलेला चा त्याला दिवू शकतो, ही आमच्या भारताची घासातला घास देणारी महान संस्कृती हाय."
चा प्यायला येळंचं बंधन कधीच नसतय. दुपारी एखाद्या कामानं आलेला कटाळा घालवायला तर कधीतरी फक्कड रंगलीली गप्पांची मैफिल आर्ध्यारात्री संपवायला चा पायजेच.. आमच्यात चहाची सवय आमच्या ताई(आजी)कडून आमच्याकडं आली. ताय बेक्कार आवडीन चा प्यायची, कधीतरी हुक्की आल्यावर तर दुपारीच चुलीव चा कढायचा, वाड्यातल्या जुन्या खुलीत आमाला डिशीतनी तर सोत्ताला डायरेक पितळीतच चा गाळून ताय पेत बसायची. त्या चा ची चव बी लय निराळी असायची.
चा चं दुसरं एक चित्र डोळ्यावर कोरलय ते म्हंजे, शिरोळातली रम्य सकाळ, रेडीओवर लागलेली सुहानी गाणी, खिडकीतून येणारं कवळं तांबूस उन आणि त्याखालच्या गॅसवर उकळलेल्या चहातून वर निघून उन्हात एकरुप होणारी वाफ..
पुण्याच्या नावं ठेवणाऱ्या वाक्चतुरांनी या बेक्कार भारी गोष्टीला 'अमृततुल्य' असं साजेस नाव दिलंय..
शेकडो आठवणी जन्माला घालणारा ह्यो चा खरोखर अमृत हाय..
जागतिक चा दिनाच्या च्या पेत पेत तजेलदार आणि गोड शुबेच्चा ❤️
#रणमस्तबहाद्दर
#कंदीपेढा
#चहा #tealovers
✍🏻 स्वप्नील महेंद्र जाधवराव.

Comments
Post a Comment