लागली समाधी ज्ञानेशाची..

 आळंदीत आज भलतीच गजबज उडाली होती. गेले काही दिवस नामदेव, गोरोबाकाका, सावतामाळी, चांगदेव, वटेश्वर, विसोबा खेचर अशा संतसमुदायासह स्वयं विठ्ठल परमात्मा अलंकापुरीत उपस्थित होते. वैष्णवजनांची दाटी झाली होती, कार्तिकीची वद्य एकादशी पंढरी सोडून आळंदीत सजली होती. कशासाठी ? कुणासाठी ?


ज्ञाना! 

वीस बावीस वर्षांचं कोवळं पोरगं समाधी घेणार.. 


फार लहान होती ओ लेकरं.. जेव्हा कळलं की आईबाप आपल्यासाठी, आपल्याला सोडून गेलेत. खरंतर हे कळण्याइतकही वय नव्हतं त्यांचं. 

सकाळच्या प्रहरी दोघेही कुठे दिसेनात म्हणून ज्ञाना, सोपान आणि इवलुशी मुक्ता सबंध आळंदी पालथी घालत होती. इथे खोपटीत एकटा निवृत्ती उर भरून बसला होता पण हुंदका काही बाहेर येत नव्हता.. 

शेवटी कळलं आईबाबा गेले.. देहांत प्रायश्चित घेतलं..!

तिघही पळत येऊन निवृत्तीच्या पोटास बिलगली. किती किती रडली असतील ती एवढीशी पिल्लं.. 

पण तरीही नियतीप्रमाणे निवृत्तीही अगदी स्तब्ध होता. ज्ञानाने ओळखले.. दोन्ही लेकरं उराशी धरली आणि तिथे पहिल्यांदा ज्ञानेश्वर 'माऊली' झाला.


गहिनीनाथांकडून नाथपंथी दिक्षा स्वीकारलेल्या निवृत्तीची ब्रह्मानंदी टाळी लागलेली होती आणि त्यायोगे सर्व जबाबदारी ज्ञानावर पडली हे आता सिद्ध झाले. दारोदार भिक्षा मागून, जनाची अवहेलना सहन करुन ज्ञाना सर्वांची पोटे भरत होता. पण या अज्ञानी समाजास ज्ञानाचा हा खटाटोप सहन होत नव्हता. एका अभंगात एकनाथ महाराज म्हणतात, 

"आणिक एक चमत्कार । जेव्हा उद्वस अलंकापूर । तेव्हां रंकांसी आदर । ज्ञानेश्वरें केला ॥१॥

वाणी होउनी आपण । प्रत्यक्ष मांडिलें दुकान । अन्न उदक तृप्त जाण । सर्वही केलें ॥२॥" 

ब्रह्मवृंदांच्या वृथा अभिमानात उध्वस्त झालेल्या या अलंकापुरीत ज्ञानेश्वरांनी वाणी होऊन ज्ञानाचे दुकान मांडले व जसे ज्यास समजेल तसे तृप्त केले. अशा ज्ञानेश्वरच्या झोळीत जेव्हा हे करंटे शेणामातीचे गोळे टाकतात तेव्हा तो अवस्थांपलिकडे गेलेला योगेश्वर देखील दुःखी होतो आणि रडत रडतच स्वतःला झोपडीत कोंडून घेतो. 

तेव्हा तिथे ती लहानगी मुक्ता आपल्या ज्ञानदादाला साद घालते.. "ज्ञानादादा.. ताटी उघडा ज्ञानादा ज्ञानादादा.. अहो तुम्ही योगी ना.. तुम्हीच जर असं वागलात तर सर्वसामान्यांनी काय करावं.. राग दुःख सोडा ज्ञानादादा.. ताटी उघडा.." 

 

ती धाकटुशी बहिण आपल्या थोरल्या भावाची मनधरणी करते, 

योगी पावन मनाचा | साहे अपराध जनाचा ||

विश्व रागे झाले वन्ही | संती सुखी व्हावे पाणी ||

शब्दशास्त्रे झाले क्लेश | संती मानावा उपदेश ||

विश्वपट ब्रह्मदोरा | ताटी उघडा ज्ञानेश्वरा ||

"अरे ज्ञानादादा तू योगी आहेस ना ? अरे आम्हा सामान्य जनांचे अपराध तुम्ही योग्यांनीच तर उदरात घ्यायचे ना रे.. भले हे सारे विश्व रागाने अग्नी झाले तरी तुम्ही संतांनी आनंदाने पाणी व्हायचे असते. शब्द आणि शास्त्रांनी कितीही क्लेश झाला तरी तुम्ही संतांनी प्रत्येक शब्द स्वीकारुन आम्हां अज्ञानांना उपदेश करावा. या विश्वाच्या (कापडी) पटाचा तू मूळ असा ब्रह्मदोरा आहेस.. हट्ट करु नको ज्ञानादादा ताटी उघड.." 


असेच एकमेकांना समजावत, गोंजारत, पोटाशी धरत ही लेकरं मोठी होत होती. अशातच ज्ञानराजास आपले उद्दिष्ट लक्षात आले होते. कर्मकांड, भेदाभेद आणि अज्ञानात गुरफटलेल्या या समाजास 'सर्वांभूती परमेश्वर' दाखवणाऱ्या माणूस धर्माची अर्थात भागवत धर्माची ओळख करुन देणे आणि त्यासाठी श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितलेले भगवद्गीता रुपी ज्ञान सर्वांच्या मराठा बोलीत समजून सांगणे हे ध्येय समोर ठेवून अवघ्या सोळा वर्षांच्या ज्ञानोबाने भावार्थदीपिकेचे निरुपण सुरु केले. 

पुढच्या चार-सहा वर्षांत अनेको लोकांना या मानवतावादी धर्माचे धडे दिले आणि आपली तीर्थयात्रा संपवून आज ज्ञानेश्वर समाधीस्त व्हायला निघाला होता. 


सिद्धेश्वराचा ढवळा नंदी बाजूला करुन त्याखालील विवरात समाधीची जागा निश्चित झाली होती. वैष्णवांचा मेळा सिद्धेश्वराचे देऊळ वेढून बसला होता. समाधीच्या जागेवर शुभ्र धुतवस्त्र अंथरुन त्यावर बेल, तुळस, दुर्वा, दर्भ आणि विविध पुष्पांचा सडा टाकला होता. ज्ञानदेवाची शेवटची एक नजर पहायला, ज्याला कधी लाथा घातल्या त्याच्या पायी आपले डोके ठेवायला आज लोकांची झुंबड उडाली होती. देव आणि संतांसह सोपानकाका व मुक्ताईही खिन्न झाल्या होत्या, पण माऊलींच्या चेहरा मात्र साक्षात सहस्त्ररश्मी प्रभाकराचा उदय झाल्याप्रमाने तेजस्वी भासत होता. अशातच उठून तो ज्ञानराज दोन्ही हात जोडून परं दास्यत्व भावाने आपल्या लाघवी सुरात निवृत्तीनाथांस म्हणाला, 

"पाळिले पोसिले चालविला लळा । बा माझ्या कृपाळा निवृत्तिराजा ॥" 

 

आहाहा! काय तो एकमेकांप्रतीचा आदरभाव.. किती ते प्रेम..

ही एकटी मुलं या निष्ठूर संसारात किती एकजीवाने राहिली याची प्रचिती या एकाच ओळीतून येते. निवृत्तीनाथांचा अधिकार जाणून ज्ञानदेवांनी त्यांचे शिष्यत्व पत्करले होते. वारकरी संप्रदायाची उलटी घडी अगदी सुरुवातीपासूनच पडली होती.‌ 

पहा ना, इथे शिष्य आपल्याहून मोठा व्हावा म्हणून गुरु तहायत झटतो, शिष्य गुरुच्या पुढे बसून गुढार्थ गीतेचे निरुपण करतो आणि गुरुच त्यात तल्लीन होतो, इतकंच काय तर आज साक्षात गुरुच शिष्याला आपल्या आधी समाधी देणार होता.‌. इतर ठिकाणी हे क्वचितच..! पण तरीही ज्ञानेश्वर अभिमानाने स्वतःस 'निवृत्तीचा दास' म्हणवून आपली सीमा लक्षात ठेवतात. 


आपल्या लहानग्या ज्ञानाच्या मुखावरुन मायेने हात फिरवून निवृत्ती शेवटचे आलिंगन देतो. आपल्या धाकट्या भावाचे पुर्णत्व लक्षात घेऊन प्रेमाने म्हणतो,

अरे अरे ज्ञाना झालासी पावन । तुझें तुज ध्यान कळों आले ॥ 

तुझा तूंचि देव तुझा तूंचि भाव । फिटला संदेह अन्यतत्त्वी ॥

पुन्हा पुन्हा ज्ञानास आलिंगन देऊन निवृत्ती कौतुकाने म्हणतो, 

"अमर्यादा कधी केली नाही येणे । शिष्य गुरुपण सिध्दि नेले॥"

दोघा बंधूंचे हे प्रेम बघून आता सर्वांच्याच अश्रुंचा बांध सुटला आणि मग एका हातास निवृत्तीनाथ आणि दुसऱ्या हातास स्वतः पांडुरंग धरुन ज्ञानेश्वरास विवरात घेऊन येतात. तिथे आसनावर पद्मासनात माऊली बसल्यावर समोर ज्ञानेश्वरी ठेवली व निवृत्तीनाथ जड पावलांनी वरती आले. आपल्या हातांनी विवराची शिळा बंद केली आणि इतका वेळ ब्रह्मज्ञानाच्या आच्छादनात झाकलेला करुनासागराचा बांध फुटला.. 

निवृत्तीनाथ अक्षरशः गडागड लोळत धाय मोकलून रडायला लागले. सोपान आणि मुक्ता त्यांना सांभाळण्याचा प्रयत्न करत होते, नामदेव तर थेट देवास म्हणाले की आम्हां सगळ्यांआधी निवृत्तीनाथांना शांत करा. त्यांचे दुःख मोठे आहे.


निवृत्तिदेव म्हणे करितां समाधान। काही केल्या मन राहात नाही ॥१॥ 

बांधल्या तळ्याचा फुटलासे पाट। ओघ बारा वाटा मुरडताती ॥२॥ 

बांधल्या पेंढीचा सुटलासे आळा। तृण रानोमाळा पांगलेसे ॥३॥ हरिणीवीण खोपी पडियेली वोस। दशदिशा पाडस भ्रमताती ॥४॥ 

मायबापें आम्हां त्यागियेले जेव्हां । ऐसे संकट तेव्हां झाले नाही ॥५॥ 

नामा म्हणे देवा पेटला हुताशन । करा समाधान निवृत्तीचे ॥६॥


आज निवृत्तीस खऱ्या अर्थाने पोरकेपणाची जाणीव झाली. आईबाबा गेल्यावरही न फुटलेला बांध आज ज्ञानाचे छत्र हरपल्यावर फुटला... 


आयुष्याची उद्दिष्टपूर्ती झाल्याचे ओळखून ज्ञानेश्वर समाधीस्त झाले‌. आपल्या उण्यापुऱ्या आयुष्यात माणसाला माणूस बनवून ज्ञानेश्वर नावाचे तेज त्या विवरात संजीवन झाले. ज्या समाजाने भेदाभेद भावनेतून पदोपदी आपल्यास फटकारले त्या समाजास 'दुरितांचे तिमीर जावो' अशी व्यापक शिकवण देऊन ज्ञानेश्वर परमात्माशी एकरुप झाले. मुक्तीचा सहजसोपा 'नाम'मार्ग देवून ज्ञानयज्ञाची सांगता झाली...


नामा म्हणे आता लोपला दिनकर । बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ ॥


रणमस्तबहाद्दर

सखा माझा ज्ञानेश्वर


                                          ✍🏻 स्वप्नील महेंद्र जाधवराव.

Comments

Popular posts from this blog

हैबतबाबा पवार आरफळकर

शेखमिरा संस्थान

गावकुसावरील देवता