कृष्णार्जुन
कृष्णार्जुन
प्रेमाच्या विविध संकल्पना आणि व्याख्या जगभरात प्रसिद्ध आहेत. ‘आपल्या स्वत्वाच्या पलिकडे जाऊन आपण ज्याचा विचार किंवा काळजी करतो, आयुष्यातील चांगला आणि वाईट प्रसंग सर्वात आधी ज्याच्याशी बोलावा वाटतो, ज्याच्या आयुष्यात फक्त चांगले व्हावे अशी आपली प्रार्थना असते किंवा त्यासाठी आपण झटत असतो, त्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो’ अशी सहजपणे प्रेमाची व्याख्या मी करु शकतो. आई-आपत्याचे, वडिल-आपत्याचे, भावंडांचे, मैत्रीचे, जोडप्याचे असे प्रेमाचे ठोस काही प्रकार आहेत पण यात सामान्यपणे सर्वोच्च मानले जाते ते एखाद्या जोडप्याचे प्रेम ! याचे कारण की फक्त हेच प्रेम प्रेमाच्या मानसिक अवस्थेपुढे जाऊन शरीरापर्यंत पोहचते. तरीही या प्रेमास धटक देण्याची ताकद ठेवते ते मैत्री प्रेम. रक्त, शरीर अशा कोणत्याही दुव्यापलीकडे फक्त मनाने जोडलेला हा बंध.
जगात मैत्रीची अनेक उत्तमोत्तम उदाहरणे आहेत पण यातील सर्वश्रेष्ठ म्हणावे असे उदाहरण म्हणजे कृष्ण आणि अर्जुन. तसे सर्वसाधारणपणे महाभारतात सर्वोत्तम मैत्रीसाठी कर्णाचे उदाहरण दिले जाते पण मला अर्जुनाची मैत्री सर्वेश्रेष्ठ वाटते. महाभारताच्या लिखाणासाठी वेदव्यासांचे विशेष कौतुक आहे. त्या कथेतील प्रत्येक पात्राला स्वतःची बाजू असते. अगदी आताच्या काळातही ती पात्रे विविध व्यक्तीमत्वांना आपलीशी वाटतात. त्यातही विशेष करुन उपेक्षित समजली जाणारी कर्णादी पात्रे लोकांना जास्तच भुरळ पाडतात पण अशामुळे महाभारताच्या मध्यवर्ती असलेले अर्जुन हे पात्रच उपेक्षित ठरते.अर्जुनाला आपण नेहमीच लकी समजतो कारण त्याच्याकडे श्रीकृष्ण होता पण हे श्रीकृष्णरुपी 'लक' त्याला मिळालं नव्हतं त्यानं ते मिळवलं होतं. ज्याच्यावर सगळेच प्रेम करतात त्यालाच आपल्या प्रेमात पाडणं ही सोपी गोष्ट नाही. संपूर्ण समर्पण नावाची दिव्य आणि प्राणांतिक मौल्यवान आहूती त्यासाठी द्यावी लागते.
अर्जुनाने त्याच्या आयुष्यातील प्रत्येकच नात्यास पुर्णपणे न्याय दिला, पुर्णपणे समर्पित झाला. त्यामुळेच कदाचित पती, पुत्र, शिष्य, भाऊ अशा प्रत्येकच रुपात तो संबंधितांचा सर्वात लाडका होता. पण तो विशेष लाडका होता माधवाचा ज्याच्यासाठी तो देखील पार्थ झाला होता. माधवाप्रती पार्थ इतका समर्पित होता की त्याच्या शब्दाखेरीज इतर कोणतीही गोष्ट त्यास प्रणाम नव्हती. त्यामुळे अनायसेच पार्थचा जीवनरथ मार्गावर आणण्याची संपूर्ण जबाबदारी माधवावर येऊन पडली आणि त्याने देखील ती संपूर्ण आनंदाने स्वीकारली. अर्जुन नात्याने कृष्णाच्या आत्याचा मुलगा, तथापि ते दोघे पहिल्यांदा भेटले ते द्रौपदी स्वयंवरादरम्यान आणि याच प्रसंगापासून जगाला गारुड घालणाऱ्या श्रीकृष्णावर अर्जुनाचे गारुड पसरले.
पार्थाने माधवास आपला सखा मानले असले तरी माधवाचा अधिकार लक्षात घेऊन त्याने आपला संपूर्ण भाव गोविंदाच्या हाती सोपवला. तसा कान्हा जन्मापासूनच सर्वांना भुरळ पाडण्यात माहीर होता. आपले मातापिता, बंधू, गोप गोपिका या सर्वांनाच त्याने वेड लावले होते पण त्याला वेड लावले ते फक्त पार्थानेच.. तो पार्थाच्या प्रेमात इतका बुडाला होता की त्याने आपल्या थोरल्या बंधूंच्या विरोधात जाऊन बहिण सुभद्रेचा अर्जुनाशी पळवून नेऊन विवाह लावला होता. द्रौपदीला आपली बहिण/सखी बनवणं असो की नंतरचे संपूर्ण चरित्र अर्जुनाभोवती फिरणे की कुरुक्षेत्रावर योग्य अयोग्य सगळ्या संकल्पना खळबळून पार्थासाठी योग्य असेल तेच घडविणे ही सगळी पार्थप्रेमात माधवाने केलेली लीला होती. पुढे महाभारत युद्धादरम्यान ब्रह्मासही गुह्य असे ज्ञान श्रीकृष्ण परमात्म्याने भगवत्गीतेच्या रुपात आपल्या लाडक्या पार्थास देऊ केले.
या दोघांच्या प्रेमाबद्दल ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर माऊली फार भरभरुन बोलतात. कधीकधी तर त्याचा हेवा देखील करतात. भगवत्गीतेच्या सुरुवातीलाच 'मी तुझा शिष्य आहे, तुला शरण आलेल्या मला तू उपदेश कर' या शब्दात पार्थाचा माधवाप्रती समर्पणभाव प्रकट होतो तोच विस्तारीत रुपात देताना ज्ञानेश्वरीत "श्रीकृष्णा आमचे इष्टमित्र वैगरे सर्वस्व आपण आहात, आमचे गुरु, बंधू, बाप, इष्टदेवता/कुलदेवता आणि नेहमी संकटसमयी रक्षण करणारे आपणच आहात" या शब्दात येतो. पुढे यांच्या मैत्रीची इर्षा वाटून गुणातीत झालेले माऊलीही म्हणतात की, "अर्जुनावरील प्रीतीकरितां निराकार तो साकार झाला, ह्यावरून मला तर असें वाटतें कीं, ह्या दोघांची स्थिती जरी भिन्न आहे, तरी दोघे एकरूपच आहेत. एरव्ही हा भगवान् योग्यांना आढळत नाही, वेदार्थालाही आकलन होत नाहीं व ज्याचे ठिकाणीं ध्यानाची दृष्टि पोहोचत नाहीं, असा जो अनादि भगवान् तो अर्जुनावर किती कृपावंत झाला आहे. हा त्रैलोक्यरूप वस्त्राच्या संकोचविस्तारांचे अधिष्ठान आणि आकाराच्या पलीकडे निराकार असून हा अर्जुनाला इतक्या प्रेमानें कसा स्वाधीन झाला कळत नाही."
गीतेचे पहिले तीन अध्याय ऐकताच संजय धृतराष्ट्रास म्हणतो "दैवसंपन्न अर्जुनास श्रीकृष्ण अति प्रेमाने म्हणाले - आता अति प्रेमाने कशावरुन म्हणशील तर, जे गुह्य माता देवकी, पिता वसुदेव, बंधू बलराम यांना सांगितले नाही एवढेच काय तर नेहमी सोबत असणाऱ्या लक्ष्मीदेवींना ज्या प्रेमसुखाचा अनुभव लाभला नाही त्याला आज अर्जुन पात्र झाला आहे." याचे कारण भगवंतच आपल्या श्लोकातून सांगताना म्हणतात "भक्तोSसि मे सखा चेति" अर्थात तू माझा भक्त आणि सखा आहेस म्हणून मी हे गुह्य तुला सांगत आहे. याचेच "हैं जीवींचं निज गुज। परी केवीं राखों तुज। जे पढियेसी (जिवलग) तूं मज। म्हणौनियां || तूं प्रेमाचा पुतळा । भक्तीचा जिव्हाळा। मैत्रियेचि चित्कळा । धनुर्धरा ॥ तूं अनुसंगाचा ठावो। आतां तुज काय वंचूं जावों?। जरी संग्रामारूढ आहों। जाहलों आम्ही ।।" इतके रसाळ वर्णन ज्ञानोबा करतात. पुढे अर्जुन योगाबद्दल आणखी सांग म्हणताच कृष्ण आनंदाने सांगू लागतो तेव्हा त्यांच्या संभाषणावर माऊली उत्प्रेक्षा करतात "अगोदरच आईचे चित्त आणि त्यात लाडक्या मुलाचे निमित्त झाले तर त्या स्नेहाचा अद्भुतपणा कोण जाणील! भग्वंताची कृपादृष्टी अमृताच्या मुशीत ओतली किंवा प्रेम पिऊन उन्मत्त झाली म्हणून अर्जुनाच्या मोहात गुंतून तिला बाहेर येता येईना. यांच्या स्नेहाचे वर्णन शब्दात करता येणार नाही, प्रस्तुत तो अर्जुनाविषयी फार मोहीत झाला आहे. "
पार्थ प्रेमात माधव किती वेडा होता म्हणाल तर ज्ञानेश्वरीत सहाव्या अध्यायात ज्ञानवंतांचे लक्षण सांगताना देवाने ते मध्येच सोडले. कारण भगवंतांना वाटले असेल की, जर ज्ञानवंतांचे वर्णन लांबवले, तर हा अर्जुन नुसते वर्णन ऐकूनच ज्ञानवंत होऊन आत्मानंदात बुडून जाईल. तो अर्जुन उरणार नाही. जी ब्रह्मविद्या द्वैताचा नाश करते, ती जर स्पष्ट केली, तर आपला प्रियकर असा जो अर्जुन त्याची प्रीती नाहीशी होईल. मग भगवंत दृढालिंगन कोणाला देणार, मन मोकळे करण्यासाठी कोणाशी बोलणार, प्रेमळ नजरेने कोणाकडे पाहणार ? अर्जुन ज्ञानानंदी झाला तर माझा आणि त्याचा प्रेमभाव कलंकित होईल. श्रोतेहो, तुम्हांला ऐकायला हे जरी विचित्र वाटले, तरी कृष्णाचे अर्जुनप्रेम हे असे सुंदर आणि विचित्र होते. अर्जुन हा श्रीकृष्णाच्या मैत्रीचे घर आहे. सुखाने शृंगारलेले श्रीकृष्णाचे मन पाहण्याचा आरसा अर्जुन आहे. श्रवणापासून आत्मनिवेदनापर्यंत ज्या नऊ प्रकारच्या भक्ती आहेत, त्यांपैकी 'सख्य' ह्या आठव्या भक्तीच्या ठिकाणाची अर्जुन ही मुख्य देवता आहे. त्यामुळे अर्जुनाची स्तुती केली तर ती भगवंतांना अधिक आवडते.
पुढे तर माऊली म्हणतात "अर्जुनाच्या प्रेमापायीच निराकार ब्रह्माने श्रीकृष्णाचा अवतार धारण केला आणि त्याच्या सर्व इच्छा पूर्ण असूनही अर्जुनाच्या सख्याची त्याला उत्कंठा उत्पन्न झाली." देवकीया उदरी वाहिला | यशोदा सायासे पाळीला | का शेखीं उपेगा गेला | पांडवासी || म्हणौनी बहु दिवस वोळगावा | कां अवसरु पाहुनि विनवावा | हाही सोसु तया सदैवा | पडेचिना || असे म्हणून पार्थाने सहजपणे प्रेमाने कसे माधवास जिंकून घेतले आहे हे ज्ञानोबा सांगतात. ज्या समर्पण भावनेने ईश्वरासही जिंकले जाऊ शकते तो आपल्यात आला तर आणि काय हवे..
खरंतर इथे एक लक्षात घ्यायला हवं की, आनंदाने एखाद्याची जबाबदारी उचलून त्याला मार्गी लावणारा माधव होणे सोपे आहे पण, आपल्या स्वयं-इच्छा आणि मीपणा सोडून पुर्णपणे समर्पित होणारा 'पार्थ' होणे महाकठीण..
तरी आपल्या आयुष्यातही समर्पित झालेला एखादा पार्थ असेल तर त्याप्रती जबाबदारी घेऊन आपण माधव होण्याचा प्रयत्न करावा आणि जर माधवासारखा जीव ओवाळून टाकणारा मित्र असेल तर आपला अहं बाजूला ठेवून संपूर्ण समर्पणाने पार्थ होण्याचा प्रयत्न जरुर करावा.. मैत्री अजरामर झाल्यावाचून राहणार नाही.
पार्थमाधव
रणमस्तबहाद्दर
✍🏻 स्वप्नील महेंद्र जाधवराव.


Comments
Post a Comment