देवराज्य आणि देवभाषा

 “संस्कृत वाणी देवे केली तरी प्राकृत (मराठी) काय चोरापासून झाली" असे संत एकनाथ महाराज संस्कृतास मोठेपण देऊन मराठीस दुय्यम स्थान देणाऱ्या पढतमुर्खांना खडसावून विचारतात. मराठीचं कौतुक करताना ज्ञानोबा तर अजिबात थकत नाहीत, "माझा मराठाचि बोलु कौतुकें | परि अमृतातेंही पैजां जिंके ||" म्हणत देवाच्या मुखीचे ज्ञान अमृतसम  देवभाषेत 'भावार्थदीपिका' अर्थात ज्ञानेश्वरी च्या रुपाने त्यांनी या देवराज्यास सुलभ केले. 



            सातवाहन हे सर्वात प्राचीन मराठी भाषिक राज्यकर्ते समजले जातात. मराठीतील सर्वात प्राचीन ग्रंथ म्हणजे 'गाथासप्तशती' हा सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीचा मानला जातो. तर मुकुंदराजाने इ.स. १११० च्या सुमारास 'विवेकसिंधु' हा वेदांतावरील टीकात्मक ग्रंथ लिहिला. या कालखंडात पर्यंत मराठी हि देववाणी इथल्या जनमाणसांची सामान्य वापरातील भाषा झाली होती तथापि धर्मग्रंथांवर अजूनही संस्कृताचा पगडा फार मोठा होता. त्यामुळे महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामींनी आपला उपदेश सर्वसामान्य लोकांना समजेल अशा मराठी बोलीतून केला. त्यांच्या चरित्रावर त्यांचे शिष्य म्हाइंभट यांनी इ.स. १२७८ मध्ये 'लीळाचरित्र' नावाचा ग्रंथ लिहिला. चक्रधरांनी आपला उपदेश मराठीतून केल्याने पुढे महानुभाव पंथीयांनी मराठीत विपुल साहित्य रचना केला. पं केशीराजासारखा संस्कृततज्ञ जेव्हा चक्रधरांचा सूत्रपाठ संस्कृतातून लिहायला जातात तेव्हा नागदेवाचार्य त्यांना विरोध करताना म्हणतात "ना गां केशवदेयां ! एणे माझीया स्वामींचा सामन्य परिवारू नागवेल कीं गा" इतकी आस्था तेव्हा सामान्यजन आणि मराठीबद्दल निर्माण झाली होती. तर माऊली महावैष्णव ज्ञानेश्वरांनी गीतेचे ज्ञान सुलभ करुन इ.स. १२९० मध्ये 'ज्ञानेश्वरीचे' लिखाण केले. तोच पायंडा वारकरी संप्रदायाने देखील चालवला. संत एकनाथांनी 'एकनाथी भागवत', 'भावार्थ रामायण' आणि 'रुक्मिणी स्वयंवर' अशा ग्रंथांसोबतच तत्कालीन मराठजनांच्या लोकजीवनाचा आधार असलेल्या भारुडे, ओव्या, गवळणी, गोंधळ व आरती इत्यादी विविध माध्यमांतून मराठीचा शृंगार वाढविला. 
            धर्मसत्तेतील मराठीवर असलेले संस्कृताचे प्रभुत्व संत, कवी आणि साहित्यिकांनी ज्या कालखंडात धुडकावून लावला तो कालखंड देखील अशाच विद्रोही देवसत्तेचा होता ज्यांनी राजसत्तेतील संस्कृत आणि कन्नडाची मक्तेदारी मोडून काढत अमृतवाणी देवभाषा मराठीस आपली राज्यकारभारभाषा म्हणून सन्मानित केले. ही देवसत्ता होती यादवांची. हे यादव राजे आपल्या नावापुढे 'सिंघणदेव', 'कृष्णदेव', 'महादेव', 'रामचंद्रदेव' याप्रमाणे देव ही उपाधी धारण करत असत. त्यांनी आपल्या राजधानीसही 'देवगिरी' अर्थात देवांचा पर्वत असे नाव दिलेले होते. महाराष्ट्राचा अत्यंत वैभवशाली काळ समजली जाणारी अशी ही देवगिरीच्या यादवरायांची सत्ता ! 
            यादवराजे स्वतःस 'द्वारावतीपुरवराधीश्वर' अर्थात द्वारकेचे राजे आणि 'विष्णूवंशोद्भव' आशा श्रीकृष्णाचे वंशज म्हणून सांगणाऱ्या राज-उपाधी लावत असत. यांच्या सुवर्णकाळात आपले 'प्रतापचक्रवर्ती' हे बिरुद सार्थक करत त्यांनी उत्तरकालीन चालुक्य, होयसळ नृपती वीरबल्लाळ, काकतीय राजा महादेव, खानदेशातील लक्ष्मीदेव, कोल्हापूरचा शिलाहारवंशी दुसरा भोज, चांद्याचा भोजदेव परमार, माळव्याचा अर्जुनवर्मन, वाराणसीचा रामपाल, गुजरातचा लवणप्रसाद वाघेला, भृगुकच्छचा सिंधुराजा, चोलनृपती राजेंद्र 
(तिसरा), छत्तीसगड व कोसलराजा, उत्तर कोकणाचा शिलाहार सोमेश्वर (आरमार युद्ध), चेदीराजा इत्यादींचा पराभव करुन वाराणसीपर्यंत मजल मारत तेथील मुसलमानांना हाकलून लावत शार्ङ्गधराचे देऊळ बांधले. काशीपासून मध्यप्रदेश, गुजरात, छत्तीसगड, ओडीसा, आंध्र, कर्नाटक, तामिळनाडू, गोवा आणि संपूर्ण महाराष्ट्र अशा भारताच्या अधिकांश भूभागावर प्रभाव पाडणाऱ्या या 'जादवकुलकमलकलिकाविकासभास्कर' यदुरायांनी आपली राजभाषा मराठीच्या प्रचार, प्रसार आणि वापरावर विशेष लक्ष दिले. आपले बहुतेक शिलालेख मराठीत कोरण्यावर भर दिला. याच देवराज्यात देवभाषा विशेष समृद्ध झाली. 
           दैवयोगाने याच देवांचे वंशज लक्ष्मणदेव अर्थात लखुजीराजे जाधवराव यांचे नातू शककर्ते श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांनी यादवसत्तेच्या अस्तानंतर पुन्हा एतद्देशियांचे देवराज्य स्थापन करताना राज्यकारभारातील परकीय फारसी भाषेचे जोखड फेकून देऊन मराठीस पुन्हा आपली प्रतिष्ठा प्राप्त करवून दिली. राज्यव्यवहारकोषाच्या माध्यमातून मऱ्हाठी पुन्हा समृद्ध केली. तेथून त्यांचे नातू शाहूछत्रपतींच्या कालखंडात मराठीची घोडदौड आलम हिंदूस्थानभर झाली. आज आपण बाळबोध-देवनागरी लिपी मराठीसाठी वापरत असलो तरी आजवर ती ब्राह्मी, हळे-कन्नड, देवनागरी आणि सोबतच तिची स्वतंत्र अशा मोडी लिपीत लिहिली गेलेली आहे. अनेक संत, राज्यकर्ते, साहित्यिक, कवी आणि लेखकांनी आपापल्या परीने मराठीची अखंड सेवा करुन मराठी उत्तरोत्तर समृद्धच केली. 

ज्ञानोबांच्याच भाषेत मराठीची थोरवी सांगायची तर..


तीर्थांमध्ये काशी। व्रतांमध्ये एकादशी।

भाषांमध्ये तैशी। मर्‍हाटी शोभिवंत।।

#रणमस्तबहाद्दर


         

                       ✍🏻 स्वप्नील महेंद्र जाधवराव.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

हैबतबाबा पवार आरफळकर

शेखमिरा संस्थान

गावकुसावरील देवता