नरसोबा | सीमाभागातील वैविध्यपूर्ण दैवत
नरसोबा
सीमाभागातील वैविध्यपूर्ण दैवत
आपल्याकडे बहुतांश समाजात शक्यतो भैरवस्वरुप शैव (शिव-अवतारी) कुळदैवते आढळतात, तर खास करुन कोकणस्थ ब्राह्मणांमध्येच वैष्णव (विष्णू अवतारी) कुळदैवते असतात. विष्णूचा चतुर्थ अवतार असलेला नरसिंह/नृसिंह तर ब्राम्हणांचेच कुळदैवत म्हणून प्रसिद्ध आहे. पण महाराष्ट्रात कर्नाटक सीमाभागात हाच नरसिंह नरसोबा रुपात ब्राम्हणांसह मराठा तसेच बारा बलुतेदार समाजासोबतच जैनांचे देखील कुळदैवत आहे.
महाराष्ट्रात विविध कालखंडात बांधलेली नरसिंहाची अनेक प्रसिद्ध मंदिरे आहेत, ज्यामध्ये केवल-नरसिंह, उग्र नरसिंह, लक्ष्मी नरसिंह अशा प्रकारातील नरसिंहाच्या मुर्ती स्थापित आहेत. ज्या दशावतारी विष्णूच्या चौथ्या अवताराची साक्ष देतात.
नरसोबाचे या नरसिंहाहून स्वतःचे असे एक वेगळेपण आहे. याची स्थाने प्राचीन असून ती तांदळा स्वरुपात आहेत. विशेष म्हणजे नरसोबा या रुपात तो फक्त विष्णू-अवतार नसून त्यात रुद्रांश (शिव-अंश) देखील असल्याचे मानले जाते. अर्थात हा नरसोबा विष्णू आणि शिवाचे एकत्रित स्वरुप आहे. दशावताराहून पलिकडे हा नरसोबा एक लोकदैवत म्हणून खंडोबा/जोतिबा प्रमाणे आपले वैशिष्ट्य दाखवतो. त्याचे प्रमुख स्थान सांगवडे सांगितले जाते.
![]() |
| लक्ष्मी-नरसिंह (नरसोबा) मंदिर, सांगवडे |
सांगवडे (कोल्हापूर) इथे नरसोबा तांदळा (स्वयंभू पाषाण) स्वरुपात असून मुर्तीसमोरच आपल्यास एखाद्या शिवालयाप्रमाणे नंदी पहायला मिळतो. तसेच नेहमी वामांगी असलेली पत्नी लक्ष्मी इथे उजव्या बाजूला विराजमान आहे. देवाच्या उपासनेचा वार देखील शनिवार सोबतच सोमवार मानला जातो. जैन समाजाकडून कुळाचार म्हणून इथे मुंजे जेवायला घातले जातात. नरसोबाच्या अभिषेकास (इतर ठिकाणांप्रमाणे) फक्त पुरुषसुक्त/पवमान याने अभिषेक न करता रुद्र सुक्ताचा देखील अभिषेक केला जातो. तर पालखीवेळी गुलाल उधळून "शिवहरी" असा जयघोष केला जातो. सांगवडेसह महाराष्ट्रातील कुटवाड, टाकवडे, निमशिरगाव तर कर्नाटकात कल्लोळ अशी नरसोबाची ठिकाणे प्रसिद्ध आहेत. यातील काही ठिकाणे स्वयंभू तर काही सांगवड्याची उपस्थाने आहेत.
या देवाच्या देवघरात पुजल्या जाणाऱ्या मुर्ती देखील भैरव सदृश्य, घोड्यावर हाती तलवार घेऊन बसलेला वीर या स्वरुपात असतात. यात नरसिंहाचा चेहरा सिंहाचा नसून तो मानवी असतो. नरसोबाची लोकदैवत म्हणून समाजमान्यता दाखवणारी ही फार मोठी खूण आहे. कल्लोळ (कर्नाटक) येथील मंदिरात तर आजही नरसोबाचा मानवी मुखवटाच पुजला जातो.
नाईकबा, चांदोबा, दरगोबा, नरसोबा ही अशी वैविध्यपूर्ण लोकदैवतं आहेत ज्यांचा धांडोळा शास्त्रात घेऊन वेळेचा अपव्यय करायचा नाही तर यांच्या नावातील 'बा' या प्रत्ययातील बापाचा प्रत्यय घेऊन त्याच्या नित्य कृपाछत्रात रहायचं. या नरसोबा भक्तांची निष्ठा, श्रद्धा आणि आदरभाव कुटवाड, कल्लोळ आणि सांगवड्यात जवळून अनुभवता आला.
शिवहरी!
#रणमस्तबहाद्दर
✍🏻 स्वप्नील महेंद्र जाधवराव.

Comments
Post a Comment