छत्रपती गादी
छत्रपती गादी
क्षत्रियकुलावतंस श्रीराजा शिवछत्रपतींनी स्वतःस राजाभिषेक करवून घेत राज्यारोहण केले आणि या भूमंडळावर नवे साम्राज्य जन्मास घातले. स्वराज्याच्या स्वतंत्र लढ्यास राज्याभिषेकाने पूर्णत्व प्राप्त झाले. आजमितीस राज्याधिकार नसले तरी छत्रपती गादी अबाधित आहे. आजवर झालेल्या छत्रपती आणि त्यांच्या सत्तासंघर्षाचा थोडक्यात घेतलेला आढावा म्हणजे 'छत्रपती गादी.'
भाग १
राजसिंहासनास महाराष्ट्रात "गादी/तख्त" हा शब्द प्रसिद्ध आहे. यातील तख्त हा फारसी शब्द आहे. फिरंग्यांप्रमाणे महाराष्ट्रात (भारतात) खुर्चीसारखी सिंहासने नसून ती पसरट व साधारणतः आयताकार असून त्यावर गादी अंथरुण वर विविध उंची सुवर्णजडीत वैगरे वस्त्रे अंथरुण त्यावर राजा सुखासनात विराजमान होत असे. सिंहासनावर अंथरलेल्या गादीवरुनच या आसनास "गादी" हेच नाव रुजु झाले असावे. वरकरणी ही गादी सामान्य वाटत असली तरी ती त्यावर बसणाऱ्या अगदी सर्वसामान्य व्यक्तीसही त्या राज्याचा सर्वशक्तिमान ईश्वर बनवत असे. म्हणूनच ही गादी नाती, मुल्य, भावना यांच्या लालभडक रक्ताभिषेकाने कायम रंगीत असायची.
श्रीमंत कैलासवासी थोरले स्वामी छत्रपती शिवाजी महाराज यांनी जेष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके १५९६ अर्थात ६ जून १६७४ रोजी सिंहासनाधीश्वर होऊन, राज्याभिषेक करवून घेत, स्वतःवर आणि परिणामी जनतेवर छत्र धरुन 'छत्रपति' नामाधिमान सार्थक केले. “या युगी सर्व पृथ्वीवर म्लेंच्छ पातशाह.. मऱ्हाटा पातशाह एवढा छत्रपती जाहला, ही गोष्ट सामान्य झाली नाही.” या शब्दात सभासद बखरीत येणारे वर्णन त्या सुवर्णक्षणाचे महत्व जगास पटवून द्यायला पुरेसे आहे.
खरंतर यासाठी अनेकांनी पुर्वीही अनेक महत्प्रयास केले. शाहाजीराजे तर मुर्तझा निजामशहास मांडीवर घेऊन गादीवर आरुढ झाले पण हे प्रयत्न फार काळ टिकले नाहीत. शिवबांचे मातुल आजोबा लखुजीराजेंच्या खटापटी देखील स्वतंत्र गादीच्या दिशेनेच चालल्या होत्या पण त्यांनाही अपयश आले, पण त्यांची उर्मी लेक जिजाऊ साहेबांच्या रुपाने जिवंत राहिली. बालशिवबास हाताशी धरुन जिजाबाईंनी पुण्यात जणू स्वतंत्र गादीची बीजेच रोवली होती आणि त्यालाच राज्याभिषेकाच्या रुपाने शिवरायांनी पुर्णत्व दिले. इथून महाराष्ट्राच्या पुण्यभूमीत छत्रपती गादीची सुरुवात झाली.
पण इतर सर्वच गाद्यांप्रमाणे 'छत्रपती गादी' साठीही चढाओढ सुरु झाली आणि गादीचा खूनी खेळ सुरु झालाच..
दुर्दैवाने हा खेळ थोरले महाराज हयात असतानाच सुरु झाला होता.
![]() |
| फोटो : सातारा येथील छत्रपतींची गादी/तख्त. शिवराय किल्ले सातारा (अजिंक्यतारा) येथे दोन महिने वास्तव्यास असताना त्यांनी ही गादी वापरली होती अशी माहिती इतिहास अभ्यासक देतात. |
महाराजांच्या राज्याभिषेकावेळी पट्टराणीचा मान सोयराबाईंना मिळाला पण युवराजपद त्यांचे सुपुत्र राजाराम यांना न मिळता थोरले सुपुत्र संभाजीराजे यांना मिळाले. राज्याभिषेकावेळी संभाजीराजेंना सिंहासनाच्या पायरीवर बसवण्यात आले यातूनच त्यांचा गादीवरील हक्क स्पष्ट झाला. जिजाऊसाहेबांच्या मृत्यूनंतर घरात कलहाची ठिणगी पेटली. एक दिवशी सोयराबाई शिवरायांना म्हणतात - "जेष्ठ पूत्र दौलतीचे अधिकारी आहेत. त्यांचे व पदरच्या मनुष्यांचे बनत नाही, माझा मूल लहान आहे. याजवरी सरकारचा लोभ आहे. त्यास अधिकार द्यावयाचा किंवा वडिलाचा वडिलाकडे सोपवायचा हे सांगावे" (शिवदिग्विजय). गृहकलह वाढीस लागल्यावर शंभूराजे दिलेरखानास जाऊन मिळाले त्यासंबंधी इ.स. १६८० च्या एका दानपत्रात ते म्हणतात - "मंत्र्यांच्या सांगण्यावरून मला राज्य दिले नव्हते. सावत्र आईच्या रागाने बापाने मला वाईट रितीने वागविले. तरी मी रामचंद्राप्रमाणे वागलो. अर्धकोटीचे राज्य व किलेकोट असलेले राज्य टाकून मी थोड्या घोड्यांसह सैन्याला मिळालो" १३-१-१६८० रोजी शिव-शंभू पितापुत्रांचे पुनर्मिलन झाले. त्यावेळी महाराज म्हणतात - "आपले पुत्र दोघेजण, एक तू संभाजी व दुसरा राजाराम. ऐसियास हे राज्य आहे. यास दोन विभाग करतो. एक चंदीचे राज्य, यांची हद्द तुंगभद्रा तहद कावेरी. दुसरे राज्य तुंगभद्रा अलिकडे गोदावरी नदीपर्यंत. ऐंशी दोन राज्ये आहेत. त्यात तू वडील पुत्र. तुजला कर्नाटकचे राज्य दिधले. इकडील राज्य राजारामास देतो." त्यावर शंभुराजे म्हणतात - "आपणास साहेबांच्या पायाची जोड आहे. आपण दूधभात खाऊन साहेबांचे पायाचे चिंतन करुन राहिन.'(सभासद बखर)
यावरुन स्वराज्याच्या फाळणीचा दुर्दैवी विचार महाराज हयात असतानाच समोर आल्याचे दिसते, पण यास संभाजी राजेंचा विरोध होता.
३ एप्रिल १६८० रोजी शिवसुर्य मावळताच १९ दिवसांनी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर २१ एप्रिल १६८० रोजी अनाजीपंत सुरनीस सचिवाने राजारामांचे मंचकारोहण करुन संभाजीराजे यांस कैद करावे असा तह करुन मोरोपंत पेशव्यासह पन्हाळ्यावर चालून गेले. (शिवचरित्र प्रदीप) राजारामांना गादीवर बसवण्याची मसलत ठरल्यानंतर सोयराबाईंनी हवालदार कान्होजी भांडवलकर आणि सरनोबत शहाजी भोसले यांना रायगडावर बंदोबस्त ठेवण्यास सांगून किल्ल्याचे दरवाजे बंद करण्याची आज्ञा दिली. पाचाड येथे दहा हजार मावळे ठेवून, मुख्य ठाण्यांवर सरदार व पत्रे पाठवली. या बंडाची बातमी लागताच पन्हाळ्यावर सरसेनापती हंबीरराव मोहितेंच्या साथीने शंभूराजेंनी हालचाल सुरु केली. १९-४-१६८० च्या सुमारास असंख्य सैन्य स्वतःहून संभाजींना सामिल होऊ लागले. सर्व सुभेदार हवालदार लोकांना संभाजींनी स्वतःच्या नावे पत्र पाठवून बोलवून घेतले. त्यांनी कटात सामील असलेल्या अनेकांना रायगडावर कैद केले तर काहींना ठार केले. १८ जून १६८० ला संभाजीराजेंनी रायगडावर येऊन छत्रपती गादी हस्तगत केली. त्याच वेळी त्यांनी राजारामांना नजरकैदेत ठेवले. पुढे सव्वा वर्षाने सोयराबाई विषप्रयोग किंवा विषप्राशनाने मयत झाल्या. १६ जानेवारी १६८१ ला अभिषिक्त होत शंभूराजे छत्रपतींच्या गादीवर आले. पुढेही गादी हस्तगत करण्यासाठी शंभूराजेंना जीवे मारण्याचे कट रचले गेले यात अण्णाजी दत्तोसह अनेकांना यमसदनी धाडले गेले. यानंतर अत्यंत धिरोदात्तपणे शिवछाव्याने राज्यकारभार हाकला. औरंगजेब, पोर्तुगीज, सिद्दी, इंग्रज अशा अनेकांशी निकराने लढा दिला.
जेमतेम ९ वर्षे स्वराज्याची गादी संभाळून शंभूराजेंना ११ मार्च १६८९ ला वीरगती प्राप्त झाली. लगेचच १२ मार्च १६८९ रोजी राजारामांना गादीवर बसवत येसूबाईंनी धैर्य आणि प्रसंगावधानाची पराकाष्ठा केली. मराठे अजूनही हार मानत नाहीत हे पाहून औरंगजेबाने राजधानी रायगडास वेढा घातला. नूतन छत्रपतींना रायगड सोडून दूर जिंजीस जावे लागले. पूर्व छत्रपती शंभूराजेंचे सुपुत्र युवराज शिवाजीराजे (शाहूराजे) व येसूबाई यांना औरंगजेबाने कैद केले. राजारामांनी सुदूर जिंजीवरुन स्वराज्याचा राज्यकारभार केला. सेनापती व सर्व सरदारांना हाताशी धरुन स्वराज्य आणि औरंगजेबामध्ये भक्कम भिंत बनून ते उभे राहिले.
३ मार्च १७०० रोजी छत्रपती राजाराम महाराजांना सिंहगडावर देवाज्ञा झाली. राज्य औरंगजेबाच्या दुष्टचक्रात असतानाच राज्याच्या राजाचे अकाली जाणे भयंकर होते. पण या प्रसंगी खचून न जाता ताराराणी आईसाहेबांनी चार वर्षांचे राजारामपूत्र दुसरे शिवाजी यांना गादीवर बसवून स्वतः राज्यकारभार हाती घेतला. मर्दानी ताराबाईंनी अक्षरशः काळदाढेतून महाराष्ट्र वाचवण्याचे महत्कार्य पार पाडले.
पुढे १७०७ मध्ये औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्याचा पुत्र आझमने शाहूंना मोगली कैदेतून मुक्त केले. शाहूंनी परत येताच छत्रपती गादीवर आपला अधिकार सांगितला. ताराबाईंनी त्यांना तो देण्यास पुर्णतः विरोध दर्शवला. दोघांमध्ये गादीसाठी वर्षभर निकराचा लढा झाला शेवटी साताऱ्यावर विजय मिळवून शाहूंच्या बाजूने निकाल लागला. १२ जानेवारी १७०८ रोजी स्वतःस राज्याभिषेक करवून घेत शाहूंनी छत्रपतींची गादी प्राप्त केली. तरीही ताराबाई शांत बसल्या नाहीत. त्यांनी दोन वर्षे शिरोळ येथून गादी चालवली व पुढे इ.स. १७१० मध्ये शिवाजी दुसरे यांनी किल्ले पन्हाळा येथे कोल्हापूर गादीची स्थापना केली.
अशा रितीने शिवछत्रपतींच्या गादीचे अवघ्या तिसऱ्याच पिढीत सातारा व कोल्हापूर (करवीर) असे विभाजन झाले.
सातारा गादी काहीकाळासाठी स्थिर झाली पण करवीर गादीने पुन्हा रक्तवर्ण धारण केला. ताराबाईंचे बरेच विश्वासू सरदार शाहूंच्या गोटात गेले होते याचाच फायदा घेऊन राजारामांच्या दुसऱ्या पत्नी राजसबाई आणि चिरंजीव दुसरे संभाजी यांनी इ.स. १७१४ मध्ये तख्तापलट करुन करवीर गादी आपल्या ताब्यात घेतली. दुसरे संभाजी यांनी गादीवर येण्यासाठी ताराबाई व छत्रपती दुसरे शिवाजी यांना पन्हाळगडावरच कैद केलेले होते. याच काळात छत्रपतींच्या सातारा व कोल्हापूर गादीमध्ये आपापसात अनेक युद्ध सुरु होती. यावर प्रतिबंध म्हणून १७३१ मध्ये वारणेचा तह करुन शांती प्रस्थापित करण्यात आली. यापूर्वी ४ मार्च १७२६ ला दुसऱ्या शिवाजींचा कैदेतच मृत्यू झाल्याने सातारा गादीचे छत्रपती शाहू महाराज यांनी आपल्या काकी ताराबाई यांना दुसऱ्या संभाजींच्या कैदेतून सोडवून आपल्यासोबत सातारा येथे नेले.
दुर्दैवाने दि. १८ डिसेंबर १७६० रोजी छत्रपती दुसऱ्या संभाजीराजेंसोबतच करवीर गादीचा छत्रपती रक्ताच्या वंशाचा शेवट झाला. संभाजीराजेंच्या पत्नी मातोश्री जिजाबाईंनी खानवटकर भोसले घराण्यातून दत्तक घेऊन त्यांचे शिवाजी तृतीय असे नामकरण करत त्यांस करवीर गादीवर बसवले.
इकडे छत्रपती शाहूराजेंच्या यशस्वी नेतृत्वाखाली सातारा गादीचे राज्य आलम हिंदुस्थाभर पसरले. छत्रपती शिवाजी महाराजांनतर सर्वात प्रभावी, यशस्वी व सामर्थ्यशाली छत्रपती म्हणून शाहूराजे उदयास आले. पण दुर्दैवाने त्यांचे एकुलते एक सुपुत्र बालपणीच मृत झाले. शाहूराजेंच्या अखेरच्या काळात गादीच्या उत्तराधिकाऱ्याचा प्रश्न समोर आला. अखेरच्या काळात शाहूराजे दुर्धर आजाराने ग्रस्त होते, तरी त्यांनी वंशजासंबंधीत नागपूरचा किंवा ताराबाईंचा नातू दत्तक घेण्यासंबंधी विचार केल्याचे कळते. ताराबाईंनी आपला नातू रामराजा (शिवाजी दुसरे यांचा पुत्र) हे त्यांच्या जिवितास धोका असल्याने पानगाव येथे आपली नात दर्याबाई वैरागकर निंबाळकर यांच्याकडे गुप्तपणे असल्याचे सांगून रक्ताचा वंशज दत्तक घेण्याप्रकरणी शाहूराजांना गळ घातली. हे बालक लहानपणीच मृत झाल्याची अफवा शाहू महाराजांनी ऐकली होती. पण तो बावड्यास बाजीराव आमात्याकडे सुखरुप होता असे सांगताच, परमपवित्र कृष्णेचे पाणी हातात घेऊन आमात्यास सत्य सांगण्याची आज्ञा छत्रपतींनी केली व त्यांची खात्री पटली. दुर्दैवाने नंतरच्या काळात ताराबाई आईसाहेबांना गादीची अभिलाषा उत्पन्न झाल्याचे म्हणावे लागेल. यातूनच अजान रामराजा आपल्या हातचे बाहुले होऊन राज्य करील अशी आशा त्यांनी बाळगली होती.
अशीच अपेक्षा दुसरीकडे धूर्त नानासाहेब पेशव्याने बाळगल्याचे लक्षात येते. छत्रपती शाहू महाराजांनी मृत्यूसमयी सनद करुन ठेवली होती. त्यातील पहिल्या सनदेप्रमाणे "बाळाजी प्रधान यास आज्ञा.. राजभार चाला पाहिजे तर पुढे वंस बसवने, कोलापूरचे न करने, चीटनीसा सरव सांगितले तसे करने, बंस होईल त्याच्या आज्ञेत चालून राजमंडळ चालवने, चीटणीस स्वामीचे इसवासू त्याच्या तुमच्या विचारे राज राखने वंस होईल तो तुमची घालमेल करनार नाहीं सुदन आसा."
तर दुसऱ्या सनदेप्रमाणे "बालाजी पंडीत प्रधान आज्ञा जे राजभार तुह्मी चालवाल हा भरवसा स्वामीस आहे पहिले सांगीतले खातरजमा ती चीटनीसानी आसल कली (केली) तुमचे मसतकी हत (हात) ठेविला आहे वस होईल तो तुमचे पद प्रधान चालवील करील आतर (अंतर) तर सफत (शपथ) आसे त्याचे आज्ञेत चालून सेवा करने राज राखने बहुत काय लिहीने सुदन आसा."
दोन्ही सनदेतील फरक सहज स्पष्ट आहे. दुसऱ्या सनदेतून नानासाहेबाचा लोभ आणि फेरफार सहज लक्षात येतोय.
१५ डिसेंबर १७४९ रोजी शाहू महाराजांना देवाज्ञा झाली. रामराजास दत्तक घेण्यास शाहूपत्नी सकवारबाई यांनी प्रतिनिधी (औंधकर) यांच्या सहाय्याने विरोध केल्याने, कलह टाळण्यासाठी आपल्या पश्चात रामराजास इकडे आणावे अशी आज्ञा शाहूराजांनी केली. ठरल्याप्रमाणे रामराजांना ४ जानेवारी १७५० रोजी सातारा गादीवर बसवून छत्रपती करण्यात आले.
छत्रपती राजाराम गादीवर येताच नानासाहेब व ताराबाईंच्या रुपाने त्यांच्यावर संकट घोंगावू लागले. सुरुवातीस छत्रपतींचे सार्वभौमत्व राखण्यासाठी रघूजी भोसले, दर्याबाई निंबाळकर व ताराबाई प्रयत्न करत होते. ताराबाई, यमाजी शिवदेव, बापूजी नाईक व युवराज फत्तेसिंह भोसले यांनी पेशव्यांच्या प्रभावाखाली मराठेशाही जाण्यापासून वाचवण्यासाठी सशस्त्र लढा सुरू केला. या सर्व धामधूमीचा फायदा घेत ताराबाईंच्या महत्वकांक्षांची भिती घालून नवनिर्वाचित छत्रपती सांगोल्यास नेऊन २५ सप्टेंबर १७५० रोजी नानासाहेब पेशव्यांनी दुर्दैवी सांगोला करार छत्रपती रामराजांकडून लिहून घेतला. या जुलमी कराराने सर्वाधिकार पेशव्यांकडे जाऊन छत्रपती गादी नामधारी केली गेली. हजारो कोटी मुलुखाचा धनी ६५ लाख वार्षिक पगारावर जायबंदी केला. नानासाहेब यास पेशवे पदावरून हटवावे म्हणून ताराबाई रामराजांस जबरदस्ती करु लागल्या पण ते ऐकेनासे झाले. २४ नोव्हेंबर १७५० रोजी ताराबाईंनी छत्रपती राजाराम यांना सातारा येथे अंधारकोठडीत कैद केले व दोन वर्षे आपल्या हाती कारभार घेतला. एवढेच नव्हे तर हा आपला नातूच नसून कोणी गोंधळ्याचा पोर आहे असा अपप्रचार केला. यानंतर पेशवे व ताराबाई यांच्यात बराच बखेडा होऊन १४ सप्टेंबर १७५२ रोजी जेजुरी येथे खंडोबा समोर बेलभंडारा उचलून दोघांनी आपसात तह केला. तदनंतर पुन्हा रामराजांना मुक्त करुन नामधारी गादी सुपुर्द केली गेली. १७६१ मध्ये ताराबाईंचा सातारा येथे मृत्यू झाला. पुढे पेशव्यांनी रामराजांना वेडे ठरवून पुन्हा कैदेत टाकले. ११ डिसेंबर १७७७ रोजी छत्रपतींचा रक्ताचा शेवटचा वंशज कैदेतच मृत्यूमुखी पडला. त्यांनी आपल्या मृत्यूपूर्वी वावीकर भोसले घराण्यातील मुलगा दत्तक घेऊन दुसरे शाहू असे नामकरण केले. पुढे हेच छत्रपती दुसरे शाहू सातारच्या गादीवर आले.
क्रमशः
#रणमस्तबहाद्दर
#GameOfThrones
✍🏻 स्वप्नील महेंद्र जाधवराव.

Comments
Post a Comment