छत्रपती गादी

 छत्रपती गादी 

भाग २ 


हिंदू धर्मशास्त्रानुसार दत्तक पुत्र पोटच्या पुत्राइतकाच औरस मानला जातो आणि त्याचे अधिकार व कर्तव्ये समानच असतात. साधारणतः रक्ताचा किंवा स्वकुळातील मुलगा दत्तक घेण्याचा दंडक प्रसिद्ध आहे. मागच्या भागात आपण पाहिले की शिवछत्रपतींनंतर सातारा गादीवर चौथ्या पिढीत तर करवीर गादीवर तिसऱ्याच पिढीत दत्तक वारस विराजमान झाले. दोघेही स्वकुळातील अर्थात भोसले कुळातीलच होते. 

छत्रपती थोरल्या शाहू महाराजांनंतर नानासाहेब पेशव्याने सातारचे सर्वाधिकार पुण्यास हलवल्यावर पेशव्यांची सत्ता उन्मत्त होऊ लागली. सातारा व करवीर अशा दोन्ही छत्रपतींना आपले स्वातंत्र्य आणि अस्तित्व टिकवण्यासाठी पेशव्यांशी दिर्घकालीन लढा द्यावा लागला. 


सातारच्या शाहूपुत्र छत्रपती रामराजांनी आपल्या मृत्यूपूर्वी वावीकर भोसले घराण्यातील विठोजी भोसले या मुलास दत्तक घेऊन त्यांचे दुसरे शाहू असे नामकरण केले. आपल्या दत्तक पित्याप्रमाणे छत्रपती दुसरे शाहू अर्थात आबासाहेब महाराज फक्त नामधारी राज्यकर्ते होते. पुण्यात प्रधान पेशव्यांमध्ये सत्तासंघर्षाचा कलह माजला होता, सवाई माधवरावास पेशवा केल्यावर बारभाईंनी कारभार हाती घेतला. यातल्या कुटील नाना फडणीसाने सत्ता स्वतःच्या अधिकारात घेण्यासाठी छत्रपतींवर बंधने लादायला सुरुवात केली. याविरुद्ध छत्रपतींचे जनकबंधू आणि सेनापती चतुरसिंग भोसले (वावीकर) यांनी आवाज उठवला. छत्रपतींना स्वतंत्र सर्वाधिकार पुन्हा प्राप्त करुन देण्याकरिता या सेनानीने जंगजंग पछाडले. यातच पुण्याची सत्ता दुसऱ्या बाजीरावाकडे येताच त्याने थेट छत्रपतींवर चौक्या पहारे बसवले. दौलतीचे धनी पुन्हा नजरकैदेत गेले. 


बाजीराव मराठा साम्राज्याच्या सर्वच सरदारांना गिळंकृत करायला निघाला. बाजीरावाचा मुजोरपणा जिरवण्यासाठी यशवंतराव होळकरांनी पुण्यावर स्वारी केली तेव्हा बाजीरावाने इंग्रजांशी हातमिळवणी केली. शिंदेंविरुद्धच्या लढाईतही बाजीरावाने इंग्रजांस मदत केली. इकडे छत्रपतींना कैदेतून सोडवण्यासाठी चतुरसिंगाने तत्कालीन विविध मातब्बर मंडळींची मोट बांधायला सुरुवात केली. व्यासराव डबीर, बापु फडणीस, मल्हार रामराव चिटणीस, मुंगीकर मालोजीराजे, रघुनाथ गुजर, भवानजी शिर्के अशांसह रानोमाळ फिरुन त्यांनी सिंदखेडराजाला राव जगदेवराव जाधवराव, पुढे दौलतराव शिंदे, यशवंतराव होळकर, नागपूरला रघूजीराजे भोसले, भरतपूरचा जाट राजा, दिल्लतील माल्कन, जोधपूर, जयपूर, उदयपूर, मंदसौर, बडोदेकर गायकवाड, धारचे पवार अशा अनेक राजमंडळींची भेट घेऊन छत्रपतींची गादी मुक्त करण्याचे प्रयत्न केले. हे प्रयत्न चालू असतानाच ४ मे १८०८ रोजी धाकट्या शाहूराजांचे निधन झाले. बाजीरावाने गडबडीत शाहूंचे थोरले अल्पवयीन सुपुत्र प्रतापसिंह यांचा राज्याभिषेक उरकून त्यांनाही पुन्हा नजरकैदेत टाकले. त्यामुळे चतुरसिंगाने आपले प्रयत्न थांबवले नाहीत. चतुरसिंगाचे प्रयत्न जोर धरतायत पाहून बाजीरावाने त्र्यंबकजी डेंगळे यास त्यांच्याकडे पाठवले. डेंगळेनी बेल भंडारा उचलून विश्वासाची शपथ घेतल्याने चतुरसिंग त्यास भेटायला आले पण त्या गद्दाराने रात्री सर्व बेसावध असताना वेढा घालून चतुरसिंगास साथिदारांसह कैद केले. कांगोरीच्या किल्ल्यात कैदेत अनेक हालअपेष्टा सहन करुन १५ एप्रिल १८१८ रोजी एका स्वामीनिष्ठ स्वातंत्र्यवीराचा अंत झाला. दुर्दैवाने हा दिर्घकालीन स्वातंत्र्यलढा आणि स्वातंत्र्यवीर इतिहासाच्या पानांत देखील अनभिज्ञ राहिला. 

छत्रपती प्रतापसिंह महाराजांचा राज्याभिषेक प्रसंग 
शेजारी महाराजांचे बंधू युवराज शहाजीराजे उर्फ आप्पासाहेब
सातारा गादी 


इकडे कोल्हापूरात माणकोजी उर्फ दुसरे शिवाजी (त.टी.१) यांना संभाजीराजेंच्या पत्नी जिजाबाई यांनी खानवटकर भोसल्यांकडून दत्तक घेऊन १७६० मध्ये गादीवर बसवले. बाल शिवाजी अजाण असल्याने राजमाता जिजाबाई सर्व कारभार पाहत होत्या. शककर्ते शिवाजी महाराज व जिजाऊ आऊसाहेबांची आठवण करून देणारी ही मायलेकाची जोडी देखील अगदी तशीच गाजली. नवखे करवीर राज्य या काळात अत्यंत संकटात होते. पुणेकर पेशवा नावाचा शत्रू त्यांच्यावर डाव धरुन बसलेला होता. सांगलीच्या पटवर्धनाला माधवराव पेशव्याने करवीरविरुद्ध उभे केले. त्याविरुद्ध जिजाबाईंनी हैदराबादच्या निजामाची मदत घेतली‌. इकडे इंग्रजांनी करवीरकरांचा समुद्र किनारा ताब्यात घ्यायला सुरुवात केली. औंधचे प्रतिनिधी आणि सांगलीचे पटवर्धन यांचा सतत मारा चालू असताना राजमाता जिजाबाई १७७२ मध्ये स्वर्गवासी झाल्या. छत्रपती शिवाजी अजूनही अल्पवयीनच असल्याने सरदार यशवंतराव शिंदे यांनी कोल्हापुरचे नेतृत्व हातात घेतले. माधवरावाने कागल, बावडा व विशाळगडावरील सरदारांना बंड करण्याची फुस लावली तेव्हा यशवंतरावाना म्हैसूरच्या हैदरअलीची मदत घ्यावी लागली. इकडे सावंतवाडीच्या खेम सावंताच्या रुपाने नवी डोकेदुखी राज्यात उभी राहिली. करवीर छत्रपती चहुबाजूंनी संकटांनी घेरलेले होते. अशातच शिवाजी महाराजांनी स्वतः मोहिमांवर जाऊन शांती प्रस्थापित करायला सुरुवात केली होती, पण परशूराम भाऊ पटवर्धनाने कोल्हापूरास वेढा घालून छत्रपतींकडून सुटकेसाठी तीन लाख रुपये उकळले. पुढे पुण्यातील अनागोंदीचा फायदा घेत शिवाजींनी भुदरगड, चिकोडी, मानोली पटवर्धनाकडून परत मिळवले. 


दुसरा बाजीराव पेशवा झाल्यावर पेशव्यांचे प्रस्थ उलथून टाकण्यासाठी सातारचे धाकटे शाहूराजे व कोल्हापूरचे दुसरे शिवाजीराजे यांच्यात तह झाला होता. याची माहिती मिळताच मोठे सैन्यबळ देऊन बाजीरावाने परशुराम भाऊ पटवर्धनाला कोल्हापूरवर पाठवले या लढाईत १७९९ मध्ये परशुराम भाऊचा मृत्यू झाला. दुसरे शिवाजी यांनी तहयात आपल्या राज्याचे रक्षण करण्यासाठी चहुबाजूंच्या शत्रूंविरुद्ध निकराचा लढा दिला. १८१२ मध्ये त्यांचे निधन झाले त्यानंतर त्यांचा थोरले सुपुत्र दुसरे संभाजी उर्फ शंभूराजे करवीर गादीवर आले. 


दुसऱ्या शिवाजी राजांनंतर त्यांचे थोरले चिरंजीव दुसरे संभाजी उर्फ आबासाहेब महाराज गादीवर आले. त्यांनी आपल्या राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी पेशव्यांविरुद्ध इंग्रजांशी तह केला. कराडच्या मोहित्यांनी आबासाहेब छत्रपतींच्या राहत्या वाड्यातच त्यांचा जमिनीच्या वादातून खून केला. तदपश्चात त्यांचे अल्पवयीन सुपुत्र शिवाजी यांना गादीवर बसवण्यात आले पण अवघ्या काही महिन्यांत कांजिण्याने त्यांचाही मृत्यू झाला.


त्यानंतर दुसऱ्या शिवाजींचे दुसरे सुपुत्र व आबासाहेबांचे बंधू शहाजीराजे उर्फ बुवासाहेब महाराज गादीवर विराजमान झाले. त्यांना कोल्हापूरच्या इतिहास उग्र आणि बेपर्वा राजा म्हणून ओळखले जाते. यांच्या काळात इंग्रजांशी आणखी दोन तह होऊन करवीरचे सार्वभौमत्व नष्ट झाले. कॉलेरा/पटकीच्या आजाराने १८३७ मध्ये त्यांचा मृत्यू झाला. 

फोटो: सातारा छत्रपती गादीवर विराजमान श्रीमंत क्षत्रियकुलावतंस छत्रपती शहाजीराजे उर्फ अप्पासाहेब महाराज 

या फोटोतून मराठा राजे प्रत्यक्ष दरबारात गादीवर कसे बसत असत हे लक्षात येते.


या बाजूला सातारकर छत्रपतींची कैद दिवसेंदिवस कठोर होत चालली होती. पण स्वातंत्र्य आणि छत्रपती हे दोन्ही एकमेकांस समानार्थीच शब्द आहेत जणू ! 

प्रतापसिंह उर्फ बुवासाहेब महाराजांच्या राज्याभिषेकानंतर लगेचच सातारच्या अजिंक्यतारा किल्ल्यावर अत्यंत कडक पहाऱ्यात छत्रपती कुटुंब नजरकैदेत ठेवलेले होते. छत्रपतींना शिक्षण घेण्याची किंवा इतर कुणाला सोडाच पायथ्याशी आपल्या कुटुंबीयांना भेटण्याची सुद्धा परवानगी नव्हती. यातही छत्रपती आणि त्यांच्या निष्ठावान मावळ्यांनी महाराजांच्या सुटकेचा घाट घातला. दुसऱ्या बाजीरावाविरुद्ध इंग्रजांशी तह पक्का झाला. याचा सुगावा लागताच दुसऱ्या बाजीरावाने छत्रपती कुटुंब वासोट्यावर कैदेत टाकले. आष्टी येथे झालेल्या इंग्रजांसोबत झालेल्या घनघोर युद्धात बाजीराव छत्रपतींना सोडून पळाला, तेव्हा छत्रपती प्रतापसिंह एल्फिन्स्टनला जाऊन मिळाले. इंग्रजांनी आम्ही छत्रपतींना मुक्त करण्यासाठी पेशव्यांविरुद्ध लढत आहोत असा जाहिरनामा प्रसिद्ध करुन युद्धास सुरुवात केली. छत्रपती कुटुंबाला पेशव्याच्या कैदेतून सोडवताना वासोट्यावर झालेल्या युद्धात छत्रपतींचे दुसरे बंधू राजाराम उर्फ भाऊसाहेब मृत्यूमुखी पडले. 

        १० फेब्रुवारी १८१९ रोजी अजिंक्यताऱ्यावर विजय मिळवून प्रथम युनियन जॅक व तो उतरवून दोन मिनिटांनी जरीपटका फडकावून त्यास विजयी लष्करी सलामी दिली गेली. दुसऱ्या दिवशी सातारा शहरात राजदरबार भरवून प्रतापसिंह महाराजांना दुसऱ्यांदा राज्याभिषेक करण्यात आला. छत्रपती प्रतापसिंह महाराज स्वतंत्र सातारा राज्याचे राजे झाले होते. २५ सप्टेंबर १८१९ च्या तहानुसार 

१) फलटणचे नाईक निंबाळकर 

२) औंधचे पंतप्रतिनिधी 

३) जतचे सरदार डफळे 

४) भोरचे पंत सचिव 

५) अक्कलकोटचे राजेभोसले 

६) पसरणीचे शेखमीरा 

अशा जहागिरींना मिळून सातारा राज्याची रचना करण्यात आली. अर्थात आजचे संपूर्ण सातारा व सांगली जिल्हा आणि भोर तालुका इतके हे राज्य होते. परंतू महाराजांना छत्रपतींच्या अखत्यारीत पेशव्यांचा संपूर्ण मुलूख किंवा अगदीच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचा मुलुख मिळणे अपेक्षित होते, पण तसे झाले नाही. सातारचा चेहरा मोहरा बदलणारे, शिवरायवंश शोभतील असे प्रतापसिंह लोकोत्तर राजे म्हणून पुढे आले. महाराजांनी अनेक सामाजिक, धार्मिक व भौतिक सुधारणांचा पाया सातारा राज्यात घातला. हे यश अनेकांना रुतल्यामुळे भुईंजजवळील पाचवडच्या नीच बाळाजीपंत नातूच्या पुढाकारात भोरच्या पंत सचिवास हाताशी धरुन बामनी कावा घातला गेला. यातच भस्मासूर इंग्रजांनी संधी साधून महाराजांवर कंपनी सरकार विरुद्ध द्रोह केल्याचा गुन्हा दाखल केला व माफी मागण्यास सांगितले. महाराजांनी त्यास ताठ मानेने व कडक शब्दात विरोध केला. पण दुर्दैवाने याच काळात छत्रपतींचे धाकटे बंधू व्यसनाधीन होऊन या चांडाळांच्या कच्छपी लागले. 


४ सप्टेंबर १८३९ रोजी छत्रपती प्रतापसिंह महाराजांना मध्यरात्री अंगावरील एका चोळण्यासह (वस्त्रासह) राजवाड्यातून अटक करुन गादीवरून पद्च्यूत केले गेले. लिंब येथे कैदेत ठेवून पुढे त्यांची सहकुटुंब काशीला रवानगी केली गेली. (तिथे छत्रपतींची अन्नान्न दशा होऊन घरातील भांडी विकण्याची वेळ कुटुंबावर आली. स्वामिनिष्ठ रंगो बापुजी गुप्तेंनी इंग्लंडला जाऊन अनेक वर्षे छत्रपतींसाठी लढा दिला शेवटी अपयशी होऊन महाराष्ट्रात १८५७ चा उठाव घडवून आणला.)

दुसऱ्या दिवशी सकाळीच शहाजीराजे उर्फ अप्पासाहेबांच्या नावे छत्रपतींची द्वाही देण्यात आली. संपूर्ण राज्य प्रतापसिंह महाराजांसाठी तळतळत असताना ब्राम्हण पेठांत गुढ्या तोरणे उभारण्यात आली. १८ नोव्हेंबर १८३९ रोजी शहाजीराजेंचा राज्याभिषेक पार पडला. नवीन तहानुसार छत्रपतींच्या अधिपत्याखालील ६ जहागिरीही स्वतंत्र संस्थान म्हणून इंग्रजांच्या स्वाधीन झाल्या व सातारा राज्य आणखी लहान झाले. अल्पकाळ राज्य करुन ५ एप्रिल १८४८ रोजी आप्पासाहेबांचे निधन झाले. 


प्रतापसिंह महाराज पदच्युत होऊन काशीस जात असताना त्यांचे सेनापती बळवंतराजे भोसले (वावीकर) यांना पुत्ररत्न झाले होते, त्याचे नाव त्र्यंबकजी ठेवण्यात आले पण त्याचा जन्म जंगलात झाल्याने त्यांस जंगली महाराज हे नाव प्राप्त झाले. आपल्या अंतसमयी १० ऑक्टोबर १८४६ च्या मृत्यूपत्रात त्यांनी जंगली महाराज यांना विधीपूर्वक दत्तक घेऊन त्यांचे नाव तिसरे शाहू ठेवण्यात आल्याचे जाहीर केले होते. तर आपल्या मृत्यूशय्येवर शहाजीराजे उर्फ अप्पासाहेबांनी बळवंतराव अंबाजी भोसले राजाज्ञा या मुलास दत्तक घेऊन व्यंकोजीराजे नाव ठेवून सन‌ई चौघड्यांचा गजर केला. 

पण कंपनी कंट्रोल बोर्डाचा चेअरमन सर जॉन हॉलहौसने लॉर्ड डलहौसीला पत्र पाठवून आधीच सातारा राज्य गिळंकृत करण्याचा डाव आखला होता. त्यानूसार छत्रपती आप्पासाहेबांच्या मृत्यूनंतर त्यांचा दत्तकवारस नामंजूर करुन कंपनीने सातारा गादीस वारस नसल्याने सातारा राज्य १ मे १८४९ रोजी खालसा केल्याचे जाहीर केले. 


मुळातच छत्रपती हे पद श्रीमंत क्षत्रियकुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज शिवाजी राजांनी निर्माण केलेले होते तो कुणी ऐऱ्यागैऱ्याने दिलेला खिताब किंवा जहागिरी नव्हती तर स्वतंत्र स्वराज्याची स्वाभिमानी गादी होती. त्यामुळे ही गादी खालसा करण्याचा अधिकार इंग्रजांना मुळीच नव्हता, तथापि या इंग्रजांनी अनेक दुटप्पी भूमिका घेतल्याचे पुढेही पाहता येते. इंग्रजांना विरोध केल्याने सातारा गादी खालसा झाली तर जुळते घेतल्याने करवीर गादी शाबूत राहिली पण जवळपास या काळात दोन्ही राज्यांवर इंग्रजांचा वरचष्मा झाला होता. 

क्रमशः 


#रणमस्तबहाद्दर 

#GameofThrones 


                                      ✍🏻 स्वप्नील महेंद्र जाधवराव.


टिप : छत्रपतींच्या दोन्ही गाद्यांच्या स्वतंत्र दोन वंशावळी आहेत. सातारा गादीची वंशावळ ही प्रथम/थोरले छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून सुरु होते, त्यामुळे शिवाजी पहिले/दुसरे हा नावांचा क्रम थोरल्या महाराजांपासूनच मोजला जातो. 

        तर करवीर गादीची वंशावळ गादीच्या स्थापनेपासून सुरु होते. त्यामुळे राजाराम+ताराबाई पुत्र शिवाजी हे करवीरला पहिले शिवाजी म्हणून ओळखले जातात. तर थोरले महाराज शककर्ते शिवाजी या नावाने अधोरेखित केले जातात. छत्रपती थोरले शिवाजी महाराज व त्यांचे दोन्ही सुपुत्र करवीर गादीच्या वंशावळीत पहिले/दुसरे या आकडेवारीचा भाग नाहीत. 



Comments

Popular posts from this blog

हैबतबाबा पवार आरफळकर

शेखमिरा संस्थान

गावकुसावरील देवता