चंदनाला साप कवटाळी

 चंदनाला साप कवटाळी 


मनुष्याच्या संसारीक आणि अध्यात्मिक आचरणास सर्वात योग्य संप्रदाय आजमितीस कोणता अस्तित्वात असेल तर तो म्हणजे वारकरी संप्रदाय !


वारी करणारा म्हणजे 'वारकरी' इतकी सहज याची व्याख्या आहे. "आषाढी कार्तिकी विसरु नका मज | सांगतसे गुज पांडुरंग ||" नामदेवांच्या या अभंगात आषाढी कार्तिकी या दोन वाऱ्या करण्याचा नेम स्वतः पांडुरंग घालून देतोय असे उद्धृत केले आहे. हि वारी कुणी सुरू केली हे ठामपणे सांगता येत नाही. ज्ञानेश्वरांचे वडील देखील वारी करत असत असा उल्लेख येतो. तथापि संत बहिणाबाईंच्या अभंगात वारकरी संप्रदायाची घडणावळ येते ती पुढीलप्रमाणे- 

        संतकृपा झाली । इमारत फळा आली ।।

        ज्ञानदेवे घातला पाया । उभारिले देवालया ।।

        नामा तयाचा किंकर । तेणे केला हा विस्तार ।।

        जनार्दन एकनाथ । खांब दिला भागवत ।।

        तुका झालासे कळस । भजन करा सावकाश ।।

        बहेणी फडकते ध्वजा । निरुपण आले ओजा ।।

ज्ञानेश्वर माऊलींनी या संप्रदायास तात्विक ज्ञानाचे अधिष्ठान दिले. भग्वतगिता ग्रंथ प्रमाण मानून त्यावर वारकरी संप्रदायाचे मूळ तत्वज्ञान सांगणारा भावार्थदीपिका अर्थात ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला. वारकरी संप्रदायाचा पाया घालणारा दुसरा संत म्हणजे संतश्रेष्ठ नामदेव महाराज. वारकरी संप्रदायाची बांधनी, आचारसंहिता आणि प्रसार याचे संपूर्ण श्रेय नामदेवरायांनाच द्यायला हवे. नामदेव महाराज वारकरी संप्रदायासाठी पंढरपूरात निर्विवादपणे विठ्ठलाचे पूर्ण प्रतिनिधित्व करीत होते. तत्कालीन जातीपातीची कर्मठ बंधने झुगारून स्वतः विठ्ठल म्हणजेच नामदेव या अर्थाने त्यांनी सर्व जातीच्या संत व वारकऱ्यांना पोटाशी धरले. त्यामुळेच हा संप्रदाय खोलपर्यंत रुजला. फक्त नामसंकीर्तनाने विठ्ठलास जिंकता येते हे दाखवून देऊन नामदेवांनी संप्रदायास निर्मळ निस्सीम भक्तीमार्गाची ओढ लावली. ज्ञान आणि नामाची सांगड घालून अगदी एखाद्या साहित्यिकाप्रमाणे अलंकारिक पद्धतीने स्वतः विठ्ठलानेच संप्रदायाची रचना केली असावी असे वाटते.


संतजन या संप्रदायास 'भागवत धर्म' म्हणतात. भगवान श्रीकृष्णास परमेश्वर मानून त्याची आराधना करणारा हा धर्म वैष्णवांची एक शाखा आहे. विठ्ठल आणि कृष्ण एकच आहेत ही प्रत्येकच संतांची ठाम धारणा आहे, फक्त स्थळमहात्म्यातून कृष्णास विठ्ठल हे नाव प्राप्त झाले आहे. भक्त पुंडलिकामुळे श्रीहरी पंढरपुरी राहिला हे मनोगत अनेक अभंगातून तमाम संतांनी व्यक्त केले आहे तेच सांगताना माऊली म्हणतात -

           पुंडलिकें वैद्यराजें पूर्वी साधिलें साधन ।

           वैकुंठीचें मूळपीठ डोळां घातले तें अंजन ॥


याच संप्रदायास 'माळकरी' संप्रदाय म्हणून देखील ओळखले जाते, कारण संप्रदायाची दिक्षा देताना अत्यंत सोपी पद्धत पार पाडली जाते ती म्हणजे, व्यक्तीच्या गळ्यात संप्रदायातील एखाद्या जाणत्या व्यक्तीकडून किंवा (फड परंपरा असेल तर) फडकऱ्याकडून तुळशीमाळ घातली जाते. याचा अर्थ माळ घालून घेणारा व्यक्ती स्वतःच्या देहावर तुळशीपत्र ठेवून "श्रीकृष्णार्पणमस्तू" म्हणत देह आणि आत्मा विठ्ठलाच्या चरणांवर अर्पण करतो. त्या क्षणापासून अन्य कोणत्याही दैवतास, शक्तीस व आलेल्या संकटास तो व्यक्ती जुमानत नाही. विठ्ठलाशी एकनिष्ठ राहून संतांनी घालून दिलेल्या मार्गावर निर्मोहीपणे चालणे हे एकच त्याच्या आयुष्याचे ध्येय बनते. 



यादव काळात महाराष्ट्र त्याच्या संपन्नतेच्या सर्वोच्च शिखरावर असतानाच समाजात जातीयवाद व स्पृश्य अस्पृश्याची कीड देखील भयंकर फोफावली तेव्हा "परित्राणाय साधूनाम् विनाशाय च दुष्कृताम् । धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ।।" या भगवंताने गीतेत दिलेल्या धर्मपुनर्स्थापणेच्या वचनाची पुर्तता करण्यासाठीच जणू तेराव्या शतकात वारकरी संप्रदायाची स्थापना केली. पण यावेळी विनाशाय च दुष्कृताम् न म्हणता "जे खळांची व्यंकटे सांडो तया सत्कर्मी रती वाढो" ही त्याहूनही व्यापक संकल्पना अमलात आणली. त्यामुळेच कदाचित तत्कालीन टोकाच्या सामाजिक भेदाभेदी विरुद्ध थेट लढा न देता लोकांच्या बौद्धिक व अध्यात्मिक प्रगतीकडे लक्ष देऊन वारकरी संप्रदायाने त्यांना धार्मिकदृष्ट्या स्वयंपूर्ण बनवले. 

        वारकरी संप्रदायाने ईश्वरभक्तीसाठी त्रयस्थाची असलेली मक्तेदारी मोडीत काढून अखंड नामाचे सहज साधन भक्तांना दिले. इतकेच काय ज्या पांडुरंगास परमात्मा मानून शरण गेले त्याच्या पाषाण मूर्तीची गरजही या संप्रदायाने शिल्लक ठेवली नाही. पंढरी व पांडुरंग हे केंद्र असले तरी मंदिरात किंवा मंदिराबाहेरुनच विठ्ठलाचे/कळसाचे दर्शन घेऊन उलट पाऊली भजन करत चंद्रभागेच्या वाळवंटात यायचे व जाती, कुळ, स्त्री, पुरुष असे सगळे भेद विसरून 'सर्वाघटी राम देहादेही एक' या ज्ञानेश्वर वचनास प्रमाण मानून वाळवंटातच भजन किर्तनात तल्लीन होऊन जायचे. हेच चंद्रभागेचे वाळवंट महाराष्ट्राच्या सामाजिक क्रांतीचा केंद्रबिंदू ठरले. तेराव्या शतकात ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, सोपानदेव, नामदेव, चोखामेळा, गोरा कुंभार, सेना न्हावी, नरहरी सोनार, सावतामाळी अशा विविध जातींच्या संतसोयऱ्यांनी एकत्र येत विठ्ठल आपापल्या रंगात रंगविला व तळागाळातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहचवला. मुक्ताबाई, जनाबाई, सोयराबाई, कान्होपात्रा अशा विविध स्तरातील स्त्रियांना धर्म, अध्यात्म आणि ईश्वरावर इतक्या अधिकारवाणीने बोलण्याचे सामर्थ्य देणारा वारकरी पंथ तत्कालीन समाजात महाक्रांतीकारकच म्हणावा लागेल. संप्रदायाने अध्यात्मविद्या ही कुणाचीही मक्तेदारी नाही हे समाजातील प्रत्येक स्तरावरील व्यक्तीस पटवून दिले. हे करताना अगदी ज्ञानदेवांपासून प्रत्येकच संताने स्थानिक मराठी भाषेचा अट्टाहास धरला. 

             तत्कालीन समाजातील जातीय उतरंडीत सर्वात खाली असलेल्या महार जातीत चोखोबा, त्यांची पत्नी सोयराबाई, मेहुणा बंका महार, मुलगा कर्ममेळा असे महान संत झाले. पंढरीचे नीच ब्राम्हण व बडवे चोखामेळास छळतात असे अनेक अभंगातून समजते पण त्याचवेळी वारकरी असलेले मेहुणपुरीचे कुलकर्णी स्वतः अक्षरशून्य चोखोबांचे अभंग लिहून काढतात. इतकेच काय तर, 

       देहासी विटाळ म्हणती सकळ ।

       आत्मा तो निर्मळ शुध्द्बुध्द ॥

       देहिंचा विटाळ देहीच जन्मला ।

       सोवळा तो झाला कवण धर्म ॥

असे अधिकाराने "चोखियाची महारी" ही गौरवी नाममुद्रा वापरुन सोयराबाई सर्वांना ठामपणे सांगतात. वारकरी संप्रदायास कोणताच विटाळ मान्य नाही. खरंतर हा नश्वर देह विटाळातून जन्म घेतो आणि मृत्यूपश्चातही विटाळच देतो, ज्यास आपण विटाळ म्हणतो तो देखील याच देहात निर्माण होतो त्यामुळे कोणताच देह विटाळापासून कधीच अलिप्त राहू शकत नाही. म्हणूनच सोवळ्या ओवळ्याचे अवडंबर निव्वळ ज्ञानी म्हणविणाऱ्यांचा बालिशपणा आहे. आत्मा हा नित्य निर्मळ असतो आणि ज्यास आत्मा जाणता आला तोच खरा ज्ञानी असे मला वाटते. 

             या संतमांदीयाळी नंतर जवळपास अडीचशे वर्षांचा काळ अंधारात गेला. महाराष्ट्र इस्लामी आक्रमणात पराकोटीची स्थित्यंतरे अनुभवत होता. त्यानंतर संप्रदायाची धुरा सांभाळली शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी. नाथांनी संप्रदायाचे अजान ज्ञान पुन्हा मोकळे केले. एकनाथी भागवताचा खांब मराठी जनांना मराठीत दिला. याचसोबत भारुड, गोंधळ, गवळणी, पिंगळा अशा लोककलांना महत्व देऊन विविध प्रभावी रुपके वापरुन नाथांनी समाजप्रबोधन केले. जातीची बंधने झुगारून वारकऱ्यांचे समता, बंधुता आणि नामजप या शिकवणी समाजात आणखी घट्ट केल्या. संप्रदायाची इमारत ठोस झाल्यावर त्यावर पुर्णत्वाचा कळस चढवला तो जगद्गुरु तुकाराम महाराजांनी ! अनन्य भक्ती, उत्तम चारित्र्य, भूतदया, विठ्ठलनाम निष्ठा अशा वारकरी संप्रदायाच्या तत्वांनी ओतप्रोत भरलेले तुकोबांचे चरित्र म्हणजे संप्रदायाचा जिवंत वस्तुपाठच. 

विशेष म्हणजे तुकोबांच्या सोळा शिष्यांपैकी न‌ऊ ब्राह्मण होते पैकी एक स्त्री देखील होती, तर बाकी विविध जातींचे होते. धार्मातील जातीय मक्तेदारीवर तसेच अंधश्रद्धांवर अखेरचा सडेतोड घाव तुकोबांनीच घातला. शेख महंमदासारखा मुस्लीम संतही याच काळात विठ्ठलापायी आला. निळोबाराय या मांदियाळीत अखेरचे. तद्नंतर जवळपास दिडशे वर्षांनी श्रीगुरु हैबतरावबाबांनी वारकऱ्यांना वारीचे नियम घालून दिले तर त्यांवर सैन्यातील तुकडीच्या अधिकाऱ्यांप्रमाणे फडकऱ्यांची नियुक्ती व विभागणी केली. 

               वारकरी संप्रदाय हा लोकाभिमुख भक्तीपंथ द्वैताची कास धरुन अद्वैतापर्यंत पोहोचतो पण तिथे गेल्यावरही निरंतर भक्तीची कास न सोडता चिद्विलासवाद हे आपले तत्वज्ञान सार्थक करतो. अमृतानुभवात माऊली म्हणतात 'एकच डोंगर पोखरून त्यातून देव, देऊळ व बाजूचा परिसर(परिवार) निर्माण होतो त्याचप्रमाणे एकाच आत्मतत्त्वाच्या विलासातून भक्तीचा व्यवहार होऊ शकतो.' वारकरी संप्रदायाचे आधारभूत ग्रंथ ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, तुकाराम गाथा ही प्रस्थानत्रयी आहे. तर संप्रदायीक संतांचे अभंग आणि चरित्र म्हणजे वारकऱ्यांची मार्गदर्शक तत्वे आहेत. मगाशी वरती म्हटल्याप्रमाणे एका साहित्यिकाप्रमाणे भगवंताने संप्रदायाची रचना केली आहे. ती कशी तर, संसारात राहूनच संसारीक मोह पाशातून 'निवृत्त' होऊन परमात्मतत्वाचे 'ज्ञान' झाल्यावर शांती प्राप्त होऊन त्या एक पांडुरंग 'नाथाचे' सतत 'नाम' चिंतन करुनच 'अणुरेणियां थोकडा तुका आकाशाएवढा' हि चिद्विलास भावना प्राप्त करता येते. संप्रदायाने आपले विचार समाजावर लादले नाहीत तर अतिशय संयमीतपणे लोकांना कळेल या प्रकारे ते रुजवले. संप्रदायाने चातुर्वर्ण्य वैगरेला थेट विरोध न करता पुर्वी फोल ठरलेल्या बौद्ध, जैन व समकालीन कुचकामी झालेल्या महानुभाव, लिंगायत पंथांचा अनुभव गाठीशी ठेवून बौद्धिक व अध्यात्मिक विकासातून सामाजिक क्रांतीचा मार्ग धरला. वारकरी संतांनी महाराष्ट्रभूमी वैचारिकदृष्ट्या सुपीक केली आणि यामुळेच पुढील काळात समाजसुधारकांची क्रांतीची बीजे महाराष्ट्रात घट्ट रुजली. आजमितीस देखील महाराष्ट्र देशातील सर्वात पुरोगामी राज्य आहे याचे श्रेय वारकऱ्यांच्या बौद्धिक मशागतीसच जाते. 

               

भारतातील बहुतांश धर्म संप्रदाय जिथे संन्याशांनी सुरु केले किंवा संन्याशांची मक्तेदारी होते तिथे वारकरी संप्रदाय पुर्णतः सांसारिकांचा संप्रदाय होता. सामान्य संसारिक व्यक्तीस समोर ठेवूनच संप्रदायाची रचना केली गेली. संसारात राहूनच परमार्थ करावा ही शिकवण संप्रदायाने दिली व एक भक्कम आदर्श समाज निर्माण केला. 

___________________________________


हि झाली पवित्र चंदनाची महती पण चंद्रावरती जसे डाग तसे चंदनाला साप कवटाळून येतातच..! 

नाथांनी व तुकोबांनी त्यांच्या काळात हे साप झाडून काढले असले तरी काळाचा महिमा म्हणून आज पुन्हा त्यावर सापांचा कळप घेरा करुन बसला आहे. संप्रदायाचा 'बुरखा' पांघरून बरेच बाटगे आज संप्रदायात राजरोसपणे वावरत आहेत. 


वारकरी संप्रदायाचे सर्वात महत्वाचे तत्व म्हणजे 'विठ्ठलनिष्ठा' ! विठ्ठला व्यतिरिक्त इतर कोणाचीही महती संप्रदाय गात नाही. अगदी कोणत्याही जाती धर्माची व कोणत्याही स्तरातील व्यक्ती माळ घालून वारकरी होऊ शकते. पण वारकरी झाल्यावर त्याची श्रद्धा फक्त पांडुरंगाच्या चरणांशी हवी इतर कोठेही नाही. त्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही गोष्टीवर आस्था ठेवणारा वाया गेला असे ज्ञानोबा म्हणतात "विष्णुविण जप व्यर्थ त्याचे ज्ञान । रामकृष्णी मन नाही ज्याचे ॥" . "शेख महंमद अविंध त्याचे हृदयी गोविंद ||" अर्थात जन्माने मुस्लीम असलेल्या माझ्या हृदयात फक्त गोविंद आहे शेख महंमद सांगतात. त्याचवेळी डोक्यावर मुस्लीम टोपी वैगरे घालून अभीर बुक्क्याची फारकत करणारा कोणी दिखाऊबाज वारीत आला तर तो निव्वळ खोटारडा समजला पाहिजे. तसेच नावापुढे 'हरिभक्तीपरायण' बिरुद लावून वारकरी नसलेल्या सत्पुरुषांची तळी उचलणारा त्यांच्या चमत्कारांना नमस्कार करणारा महामुर्ख वेळीच संप्रदायाने बेदखल केला पाहिजे. एकाच वेळी वेगवेगळ्या संप्रदायांचे/धर्माचे पालन करणारा व्यक्ती निव्वळ धोब्याचा कुत्र्या होऊन राहतो यात शंका नाही. 

            कथा प्रवचने हा प्रकार संप्रदायात नसून भजन व किर्तनाचा दंडक आहे. त्यातही नारदीय किर्तन न करता नामदेवांनी पायंडा पाडलेले हरिकिर्तनच संप्रदायात मान्य आहे. यात ज्ञानोबांपासून निळोबांपर्यंतचेच अभंग निरुपणासाठी घेतले जातात पण यात रामदासांना स्थान दिले जात नाही. राउळात जाऊन विठ्ठल दर्शन घेतल्यानंतर देवाला पाठ न दाखविता भजन करीत मागेमागे जाऊन चंद्रभागेच्या वाळवंटात यायचे आणि मग कीर्तनास आरंभ करायचा, ही किर्तनाची जुनी पद्धत होती. गावोगावी ही अवलंबण्यास कठीण जाऊ लागल्याने एकोणिसाव्या शतकातील किर्तनकार विष्णुबुवा जोग महाराजांनी किर्तनाची पद्धत बदलून पुर्वरंग व उत्तररंग अशी विभागणी केली ज्यात प्रथम अभंग गायन व उत्तरभागात निरुपण समाविष्ट असते‌. संप्रदायास नामदेव, तुकाराम यांपासूनच किर्तनकारांची फार समृद्ध परंपरा आहे. विविध किर्तनकारांनी विविध शैली आत्मसात करुन किर्तन प्रभावी केले. पण किर्तन मनोरंजनाचे साधन नसून ज्ञानदानाचे व्यासपीठ आहे हे किर्तनकारांनी काटेकोरपणे लक्षात ठेवायला हवे. इंदोरीकर महाराजांनी किर्तनाची नवी शैली तयार करुन लोकांची नस ओळखली. समाजातील व्यंगावर चपखल बोट ठेवले, ज्याची आज खरंच गरज आहे, पण असे करताना संप्रदायीक नियमांची पायमल्ली होतेय का याकडे त्यांनी लक्ष द्यायला हवे. दुर्दैवाने त्यांचे अनेक तोतये देखील मोठ्या प्रमाणात तयार झाले, किर्तनाची कॉपी करता करता ते 'महामूर्ख' त्यांच्या नैसर्गिक हातवाऱ्यांची सुद्धा हुबेहूब कॉपी करायला लागले. किर्तन करावे तेथील अन्नही खाऊ नये असा दंडक असताना लाखात 'सुपारी' घेणारे किर्तनकार तमासगीर म्हणावे लागतील. सेवा म्हणून किर्तन करणे हा प्रकार कालौघातच गेलाय जणू, आणि त्यास किर्तनकारांसोबतच सोकावलेली जनता देखील तेवढीच कारणीभूत आहेत.     

              याचसोबत एक प्रकार फोफावला तो म्हणजे किर्तन भजनात हिंदी गाणी/पद गाणे. इतका अमाप संत अभंग सागर असताना हिंदी पदांचा आसरा घेणे दारिद्र्याचे लक्षण नाही का ? Zee Talkies ने किर्तनासाठी उत्तम व्यासपीठ तयार करुन दिले पण प्रसिद्धीच्या हव्यासापोटी आंधळे होऊन आता हिंदी पट्ट्याप्रमाणे किर्तनाच्या कार्यक्रमात कथांचा बाजार‌ सुरु आहे. या कथाकारांनी वेशभूषा सुद्धा हिंदी पट्ट्याचीच चोरलेली असते. यांचेच देखादेखी कथा कशासोबत खातात माहिती नसलेल्या आमच्या खेडेगावांत आणि टिव्ही चॅनेलवर हभप म्हणविणारे पोटार्थी काळी शाल घेऊन कथा करु लागलेत ते पण शिवपुराण आणि स्वामींच्या चरित्राच्या. वैचारिक दिवाळखोरीचे याहून मोठे उदाहरण कोठेच मिळणार नाही 

              जोग महाराजांनीच 'वारकरी शिक्षण संस्था' हा शिक्षणपद्धतीचा नवीन प्रकार अस्तित्वात आणला पण दुर्दैवाने यातून ज्ञानार्थी कमी आणि पोटार्थीच जास्त तयार होऊ लागले. दुष्काळी भागातील गरीब घरच्या व अनाथ मुलांना गोळा करुन संस्था चालवणारे काही संस्थाचालक निव्वळ निधी गोळा करण्यासाठी वाट्टेल तशी संस्था चालवतात. संस्थेतील मुलांवर शारीरिक व लैंगिक अत्याचार होत असल्याच्या चर्चाही आजवर दबक्या होत्या पण आता उघड होत आहेत. इतकंच काय तर एखाद्या कार्यक्रमात किंवा लग्नात बॅंडवाल्यांसारखी ही मुलं टाळकरी म्हणून रोजाने दिली जातात ही किती लज्जास्पद बाब आहे. 

               काही दुधखुळे किर्तनकार स्त्रियांना किर्तन करण्याचा किंवा किर्तनात अभंग गाण्याचा अधिकार नसल्याचे म्हणतात. पण त्यांना वारकरी संप्रदायाच्या सुरुवातीपासूनच देवावर आणि संप्रदायावर स्त्रीयांची असलेली अधिकारवाणी लक्षात येत नसावी कदाचित! वारकरी संप्रदायात जातीभेद व कुळश्रेष्ठत्वाला मुळीच थारा नाही. "वर्णअभिमान विसरली याती | एकएकां लोटांगणीं जाती ||" असे तुकोबा सांगतात तेव्हा ज्यास स्वतःच्या श्रेष्ठत्वाचा गर्व वाटून तो समोरच्या व्यक्तीतील ब्रह्मतत्वास प्रणाम करत नाही तो ढोंगी म्हणून ओळखला पाहिजे. भेदाभेद करणे म्हणजे सरळसरळ संप्रदायाची पायमल्ली आहे. 

               संप्रदायाची घडी नीट बसावी म्हणून सैन्यदळावर जसे अधिकारी नेमले जातात तसे ठराविक भागातील वारकऱ्यांचे फड (गट) करुन त्यावर फडकरी नेमले गेले. नामदेवांपासून फड परंपरा सांगितली जाते. देहूकर, आजरेकर, वासकर, शिरवळकर, धोंडो पंत दादा, सातारकर असे काही मुख्य फड आहेत. पुर्वी लोकशाही किंवा गुरु परंपरेने चालणारे हे फड आता बहुतांशी वंशपरंपरागत झाले. यातील फक्त आजरेकर फडच आजही लोकशाही नुसार चालतो. प्रत्येक फडाच्या आचार विचारात काहीअंशी फरक आहेच. पण हे फड वारकरी सलोखा तयार करण्यासाठी केले असताना आता फडांमध्येच अंतर्गत व आपापसात वादविवाद चव्हाट्यावर येत आहेत. कुणी कोणता गजर घ्यायचा किंवा अभंग म्हणायचा यावरुनही यांचे बाष्कळ वाद चालतात. 

              वारकरी संप्रदाय पुर्णतः कर्मकांड रहित आहे. यात अगदी माळजपाचाही दंडक नाही. काही भामटे मुद्दामहून बुद्धीभेद करुन कर्मकांडाचे रोपण वारकऱ्यांमध्ये अगदी सुप्तपणे करत आहेत. आणखी एक म्हणजे काही महाभाग कोण्या संघटनेच्या किंवा पक्षाच्या विचारांचे आंधळे अनुकरण करुन ते संप्रदायात घुसवू पाहत आहेत. प्रत्येक सजीवावर प्रेम करायला शिकवणाऱ्या वारकऱ्यांच्या डोक्यात धार्मिक कट्टरतेच्या नावाखाली परधर्माचा द्वेष भरणे ही संतांची अवहेलना आहे. याविरुद्ध अती पुरोगामीत्वाने डोक्यात राख घेऊन वारकरी आस्था व विठ्ठलाचे परब्रह्मरुपही मान्य नसलेल्यांनी संप्रदायाकडे न फिरकलेलेच बरे. वारकरी हा वारकरी संप्रदायाच्या उदात्त विचारांचाच असावा, हिंदूत्ववादी किंवा अती पुरोगामी विचाराच्या लांडग्यांनी झुल पांघरुण मेंढरात सामील होऊ नये. 

या नमुद केलेल्या सापांनी वेळीच सावध होऊन सुधारावे नाहीतर 'म‌ऊ मेणाहूनि आम्ही विष्णुदास' 'नाठाळाच्या माथी काठी' हाणून ठेचायला कमी करत नाही. 


                खरा वारकरी कायम अंतरातून शांत, मृदूभाषी, अल्पभाषी, हसतमुख, गर्व व क्रोधरहीत आणि सर्वांप्रती आदर आणि स्नेह ठेवणारा असतो. यातील एकही गुण जर नसेल तर तो व्यक्ती फक्त बहुरुपी जाणावा. आपल्या आजुबाजूला खरा वारकरी शोभेल असा प्रसन्नचित्त व्यक्ती एखादातरी नक्कीच असतो ज्याच्या दर्शनमात्रे आपणही सुखाचा आनंद घेतो. तुळशीमाळ घालून कृष्णार्पण झालेल्या व्यक्तीने वरील गुण अंगी बाणवतानाच शाकाहारी, निर्व्यसनी, निर्मोही आणि कुणाबद्दलही द्वेषभावना नसलेला अंतरातून निर्मळ आत्मा बनून रहावे. 


योगी आणि ज्ञानी जनांना हा भवसागर तरायला अनेक मार्ग आहेत. पण मुक्ताबाई म्हणतात "भवनदीचे पाणी गड्या मोठे ओढीते, भल्या भल्या पोहणाऱ्यांना उलटूनी पाडीते" यासाठी देवानेच वारकरी संप्रदाय रुपी सोपी पायवाट केली असे सांगताना तुकोबा म्हणतात "तुका म्हणे सोपी केली पायवाट, उतरावया भवसागर रे". 

एखाद्या निर्मळ खऱ्या वारकऱ्याच्या सानिध्यात विठ्ठलाच्या चरणी बुद्धी लीन करुन संसार करतानाच नित्य चिद्विलास देणारा वारकरी संप्रदाय आत्मसात करण्यास आजमितीस सर्वात योग्य आहे. पण आजच्या मायेच्या जोखडातून हंसाप्रमाणे फक्त निर्मळ भक्तीचे दुध पिऊन ते जे सुख जे प्रत्येकास हवंय त्या आंतरीक शांततेची प्राप्ती करायला तरुणांनी वारकरी संप्रदायाची कास धरायला हवी. 

सरतेशेवटी, 

       बोलिले लेकुरे | वेडी वाकुडी उत्तरे ||१||

     करा क्षमा अपराध | महाराज तुम्ही सिद्ध ||धृ.||

           नाही विचारिला | अधिकार म्यां आपुला ||२||

           तुका म्हणे ज्ञानेश्वरा | राखा पायांपे किंकरा ||३||

                     जय जय विठोब्बा रखुमाई!

#रणमस्तबहाद्दर 


                                      ✍🏻 स्वप्नील महेंद्र जाधवराव.

Comments

Popular posts from this blog

हैबतबाबा पवार आरफळकर

शेखमिरा संस्थान

गावकुसावरील देवता