पालीचा खंडोबा

श्री म्हाळसाकांत मल्हारी मार्तंड खंडोबा यात्रा 

पाली-पेंबर

पालाईच्या भक्तीने शंभूघळीतला महादेव तारळी नदीकाठी प्रथमच मार्तंड भैरव नावाने द्विलिंग (जोडलिंग) रुपात शक्तीसहीत अवतरला. पुढे जेजुरीवर मणीमल्लाचा वध करुन मल्हारी नावाने पाली गावात देवांनी पहिली संसार लिला रचण्याचा निर्धार केला. याच कारणाने पाल-पेंबर हे क्षेत्र लोकपरंपरेत आणि वाघ्या मुरळीच्या कवनांमध्ये खंडोबाचे मुळठाण (मूलस्थान) म्हणून प्रसिद्ध झाले. नेवासे येथील तिमशेठ वाणी यांची माता पार्वती व मोहिनी यांचा एकत्रित अवतार असलेली कन्या म्हाळसा हिच्यासोबत देवांचा विवाह निश्चित झाला. पौष महिन्याच्या मृग नक्षत्रावर मुळठाण पाली येथे दोघांचा विवाह पार पडला. 

(काहींच्या मते हा घटनाक्रम उलटा घडला अर्थात आधी लग्न व नंतर पालाईस दर्शन पण असे झाल्यास पालीत देवांनी विवाह सोहळा घडवण्याचे कारण प्रयोजनच मिळत नाही.)


दुसरा एक मतप्रवाह असा की,

पाली गावाचे मुळ असलेले पेंबर हे गाव प्रेमपुरी या नावाचा अपभ्रंश आहे. प्रेमपुर शब्दाचा पेंबर असा अपभ्रंश झाला असे काही ग्रंथ व जुने माहितगार लोक सांगतात. 

त्यांच्या मते सप्तर्षींच्या तपास प्रसन्न होऊन देव खंडोबा सर्वप्रथम येथेच प्रेमपुरीत (पेंबरात) अवतरीत झाले. पुढे याच प्रेम-नगरात खंडोबा-म्हाळसा यांचा विवाह पार पडला व प्रेम नगरीचे नाव सार्थक झाले. देव अद्वैयलिंग रुपात सपत्नीक इथे निवास करु लागले. 

नवखंडाचा राजा इथे निवास करत असल्याने याच गावास राजापूर म्हणूनही काही काळ ओळखले जात होते.

त्यानंतर साधारणतः तेराव्या शतकात पालाई गौळणीची कथा घडली व पाल नगरी साकार झाली.

फोटो : आमचे मामा श्री.अर्जुनराव हणमंतराव पवार (आरफळकर) यांच्या देवघरातील कुळस्वामी मल्हारी म्हाळसाकांत महाराजांचे पारंपारिक चित्र.

प्रतिनिधीक रुपात आजही हा सोहळा मोठ्या उत्साहात पालीत साजरा होतो. चंपाषष्ठीस देवास हळद लावून तेलवणाचा विधी पार‌ पडतो आणि विवाह सोहळा सुरु होतो. तिथपासून लग्नापर्यंत रोज भंडारप्रिय देवास कुंकवाचा मळवट भरून मंडवळी बांधली जाते. पौष महिन्यात मुख्य यात्रेच्या आदल्या दिवशी गाव पुरोहित कुलकर्ण्यांकडे व्याही भोजन होते. कोल्हापूरकर मंडळी मुलीची बाजू सांभाळतात. करवीर छत्रपतींकडून चोपदार व मानाचा अश्व येतो नंतर त्याच अश्वावर बसून करवली म्हणून काळभोर पाटलांची मुलगी येते तर दुसरीकडे ईंजाई देवीचे प्रतिनिधी म्हणून ईंजेकर पुजाऱ्यांच्या स्त्रिया करवलीचा रुखवत आणतात. 

देवाचे मुख्य मानकरी म्हणून काळभोर पाटील देव (मुखवटे) पोटास बांधून हत्तीवर बसून देवळातून लग्नमंडपात जातात. (सध्या रथातून जाण्याचा प्रघात आहे.) देवाच्या कारखान्यात बारा बलुतेदारांचे विविध मानपान आहेत. हत्तीच्या मागे पुढे अनेक गावांचे-मानकऱ्यांचे गाडे, सासनकाठ्या व पालख्या अशा भक्तांच्या वऱ्हाड्यांच्या गर्दीतील थोर लवाजम्यासह देव संध्याकाळी बोहल्यावर चढतात. 


मंत्रघोषात अंतरपाट धरुन देवांवर अक्षतांचा वर्षाव होतो. देव म्हाळसापती म्हणून 'येळकोट' गजरात दुंदुभी होते. संपूर्ण रात्रभर नवदाम्पत्य बोहल्यावर मानपान स्विकारत असते. दुसऱ्या दिवशी खंडोबा म्हाळसा पालखीत बसून पालीस नगरप्रदक्षिणा करुन पुन्हा देवळात येतात. त्या दिवशी मुळ अद्वैयलिंगावर पितळेचे आवरण चढवले जात नाही, भक्तगण तारळीच्या पाण्याने लिंगास अभिषेक घालतात. 

दुपारी पुन्हा अभिषेक आरती होऊन गादीवर देवांची आईसाहेबांसह पुजा बांधली जाते. 


छत्रपती शिवाजी महाराजांसमोर काळभोर पाटलांनी पालीच्या देवळातच रवा दिव्य घेऊन गावची पाटीलकी व देवाचे मानपान खराडे पाटलांकडून माघारी मिळवले होते. 

मध्ययुगात इंजेकर गुरुवांच्या समूळ वंशाचा देखील एक कत्लेआम झाल्याची कथा ऐकिवात आहे. 

पालीचे खंडेराव महाराज हे पश्चिम महाराष्ट्रातील जाधवरावांचे कुळदैवत असल्याने सरसेनापती धनाजीराव जाधवरावांनी देवास सभामंडप व ओवऱ्या बांधल्या. त्यावर त्यांची "म्हाळसाकांत चरणी तत्पर" मुद्रा देखील आहे. 

कराडकर यादव देशमुखांकडून धनाजींनी पाली व आसपासची देशमुखी विकत घेतली होती, सोबतच यात्रेच्या वाटीचा मुख्य मान देखील मिळवला होता. पण पुढे छत्रपती ताराराणींनी यात हस्तक्षेप केला. 


आज रोजी या मराठदेशीच्या क्षत्रिय देवांचा वाणी म्हाळसाबाईंसोबत विवाह सोहळा पार पडतोय.. 


म्हाळसाकांताचा येळकोट घे..

सदानंदाचा येळकोट घे..

#रणमस्तबहाद्दर 


                                      ✍🏻 स्वप्नील महेंद्र जाधवराव.



Comments

Popular posts from this blog

हैबतबाबा पवार आरफळकर

शेखमिरा संस्थान

गावकुसावरील देवता