छत्रपती गादी
छत्रपती गादी
भाग ३
पहिल्या भागात आपण छत्रपती गादीच्या स्थापनेच्या आणि स्थिरतेच्या काळातील संघर्ष बघितला तर दुसऱ्या भागात पेशव्यांविरुद्ध दोन्ही गाद्यांचा लढा आणि रोगापेक्षा जालीम झालेले इंग्रजी औषध बघितले आता तिसऱ्या भागात इंग्रज वावटळीतही तग धरुन राहिलेल्या चिवट छत्रपती गादीचा संघर्ष पाहूयात...
इंग्रज कंपनी सरकारने सातारची गादी खालसा केल्याचे पत्रक काढले असले तरी सातारच्या दोन्ही छत्रपतींना वंश मंजूर केला होता व त्यान्वये मृत छत्रपतींच्या राण्या व वारसांना थोड्याशा मालमत्तेसह तनखा सुरु केली होती. छत्रपतींचे निवासस्थान असलेला जुना राजवाडा व नवा राजवाडा देखील सरकारजमा झाले होते. यावरुनच इग्रजांचा दुटप्पीपणा लक्षात येतो की, विधीपूर्वक दत्तक विधान झाले असताना तसेच ते कागदोपत्री देखील कायदेशीररीत्या बरोबर असताना फक्त राज्य गिळंकृत करण्याच्या हेतूने इंग्रजांनी सातारच्या दोन्ही छत्रपतींना गादीवर दत्तक नामंजूर केले पण त्यांना वंशज म्हणून मान्यता दिली.
प्रतापसिंह महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांनी इंग्रजांकडून सातारला परत येण्याची परवानगी मिळवली. १८५४ साली छत्रपतींसाठी लंडनमध्ये लढा देणारे रंगो बापूजी देखील सातारला माघारी आले,व माघारी येताच त्यांनी इंग्रजांविरुद्ध उठावाची तयारी सुरु केली. छत्रपती कुटुंबाने याला पूर्ण पाठिंबा दिला. छत्रपती गादीच्या स्वातंत्र्यासाठी पुन्हा युद्ध पुकारले गेले. इंग्रजांचे राज्य उलथवून छत्रपतींना पुन्हा गादीवर बसवण्याच्या उद्देशानेच उठावाची तयारी सुरु झाली. १८५७ च्या उठावाचे नेतृत्व दक्षिणेत साताऱ्याकडे आले होते. पण दुर्दैवाने उत्तरेत ठरलेल्या तारखेच्या आधीच धामधूम माजली व बंड फसले. इकडे भोरच्या पंत सचिवाने फितूरी करुन मराठा कटवाले इंग्रजांना पकडून दिले. साताऱ्यात इंग्रजांनी फार मोठ्या प्रमाणावर कतलेआम केला. उठावाचा उद्देश इंग्रज सरकार हटवून प्रतापसिंहांचे पुत्र तिसरे शाहू यांना गादीवर बसवण्याचा होता त्यामुळे उठावाचे नेतृत्व केल्याच्या आरोपाखाली तिसरे शाहू व बळवंतराव सेनापतींचे दत्तकपुत्र दुर्गासिंग यांना अटक करण्यात आली. तर राजमाता राजसबाई यांना सातारचे पोलीसप्रमुख अंताजीराजे शिर्के यांना फितवून ४०,००० रोहिल्यांची फौज छत्रपतींसाठी साताऱ्यात आणणार असल्याच्या आरोपावरून अटक केले. या सर्वांची रवानगी मुंबई जवळील बुचर बेटावर करण्यात आली तर पुढे मार्च १८५८ मध्ये पाकिस्तानात कराची येथे एकमेकांचा संबंध येणार नाही असे नजरकैदेत ठेवण्यात आले.
या कटाची संपूर्ण माहिती आणि त्यात अप्रत्यक्ष सहभाग असल्याने छत्रपती आप्पासाहेबांचे दत्तकपुत्र व्यंकोजीराजे यांस आधी अहमदाबाद व नंतर अहमदनगर येथे स्थानबद्ध करण्यात आले.
याच काळात कोल्हापूरमध्ये बुवासाहेब छत्रपतींचा पटकीने मृत्यू झाल्याने त्यांचे चिरंजीव छत्रपती तिसरे शिवाजी उर्फ बाबासाहेब महाराज गादीवर आले. ते अल्पवयीन असल्याने दाजी कृष्ण पंडित या मंत्र्याकडे इंग्रजांनी कारभार सोपवला. पण त्याच्या मनमानी कारभारामुळे कोल्हापूर राज्यात असंतोष निर्माण झाला, यातूनच १८४४ मध्ये राज्यातील गडकऱ्यांनीही इंग्रजांविरुद्ध बंड केले. बाबासाहेब महाराजांनी सत्ता आपल्या हाती घेऊन राज्यात स्थिरता प्रस्थापित केली. १८५७ च्या उठावाची सातारची ठिणगी कोल्हापूरातही पडली होती. गादीवरील बाबासाहेब महाराज यांचे धाकटे बंधू शाहू उर्फ चिमासाहेब महाराजांनी नेतृत्व आपल्या हाती घेतले. उत्तरेतील उठावाच्या बातम्या कळताच त्यांनी करवीर नगरीत सशस्त्र उठाव सुरु केला. कोल्हापूर नगरीत इंग्रजांविरुद्ध एक नव्हे तर लागोपाठ दोन उठाव झाले. इंग्रजांनी ते उठाव मोडून चिमासाहेबांना गुपचूप कैद केले व कराचीस नजरकैदेत टाकले आणि तिथेच चिमासाहेबांचा मृत्यू झाला.
१८५७ च्या उठावातनंतर भारतात इस्ट इंडिया कंपनीच्या हातातून सत्ता काढून घेत राणीने ती आपल्या हाती घेतली. चिमासाहेबांचे बंड मोडून काढल्यावर कोल्हापूर दरबारात आपली पकड फार मजबूत केली. बाबासाहेब महाराजांवर अनेक बंधने लादली तथापि उठावात भाग न घेतल्याने इंग्रजांनी बाबासाहेब महाराजांना दत्तक मंजूर केला. महाराज मृत्यूशय्येवर असताना त्यांनी आऊबाई या आपल्या थोरल्या बहिणीचा मुलगा नागोजीराव पाटणकर दत्तक घेतला व त्याचे राजाराम पहिले असे नामकरण करण्यात आले. छत्रपती घराण्यात रक्ताचा वारस या नात्याने घराण्यातील मुलीचे आपत्य दत्तक घेण्याचा हा पहिलाच प्रसंग होता, पुढे करवीर घराण्यात हाच पायंडा पडल्याचे दिसते.
२९ ऑक्टोबर १८६६ रोजी पुण्यात मोठा दरबार भरवून पहिले राजाराम महाराज करवीर छत्रपती गादीवर आले. छत्रपती परिवारातील अत्यंत राजबिंडे आणि पुढारलेले व्यक्तीमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. महाराज अल्पवयीन असल्याने इंग्रज रेसिडेंट कॅ. एडवर्ड वेस्ट याच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे शिक्षण पार पडले. राजगादीवर असताना युरोपचा दौरा करणारे तमाम भारतवर्षातील ते पहिले राज्यकर्ते होते. युरोप दौऱ्यात ब्रिटनची राणी व्हिक्टोरिया, प्रिन्स ऑफ वेल्स, ग्लॅड्स्टन, डिजलेरी, बेल्जियमचा राजा अशा अनेक मान्यवरांच्या त्यांनी भेटी घेतल्या. पण परतीच्या प्रवासादरम्यान इटलीतील फ्लॉरेन्स येथे त्यांचे निधन झाले.
![]() |
| छत्रपती राजाराम पहिले यांचे फ्लॉरेन्स इटली येथील स्मारक |
राजाराम महाराजांच्या मृत्यूवेळी त्यांच्या राणी सकवारबाई साहेब अवघ्या ११ वर्षांच्या होत्या. त्यामुळे दत्तक वारसाची शोधाशोध सुरु झाली. शेवटी निवडलेल्या सात मुलांपैकी नारायणराव या दिनकरराव भोसले सावर्डेकर यांच्या साडे आठ वर्षांच्या मुलास २३ ऑक्टोबर १८७१ रोजी चौथे शिवाजी या नावाने राणीसाहेबांना दत्तक देऊन गादीवर बसवण्यात आले. कळत्या वयाचे होताच महाराजांनी अनेक लोकोपयोगी कामे केली त्यासाठी व्हिक्टोरियाने ‘नाईट कमांडर ऑफ दि स्टार ऑफ इंडीया’ हा किताब देऊन त्यांचा गौरव केला. पण महाराजांनी तो सविनय नाकारला. हळूहळू महाराजांनी स्वतःस स्वतंत्र करण्यासाठी इंग्रजांविरुद्ध बंड सुरु केले. त्यामुळे इंग्रजांनी १८७८ मध्ये स्टेट कारभारी म्हणून महादेव बर्वे या दिवाणाची नेमणूक केली. कपटी बर्वेनी दरबारातील इंग्रज स्नायडर याच्या मदतीने कोल्हापूर संस्थान खालसा करण्याचे षडयंत्र सुरु केले. यानुसार महाराजांना वेडे ठरवून कोल्हापूरात बंदिस्त केले गेले. प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत त्यांची रवानगी अहमदनगरच्या (अहिल्यानगर) भुईकोट किल्ल्यात केली गेली. १९ वर्षाच्या राजास एकांतात ठेवून अत्यंतिक मानसिक व शारीरिक छळ करण्यात आला. प्रायव्हेट ग्रीन नावाच्या इंग्रज सर्जंटने केलेल्या मारहाणीत २५ डिसेंबर १८८३ रोजी वयाच्या विसाव्या वर्षी त्यांची हत्या झाली. लोकांमध्ये असंतोष होऊ नये म्हणून नगर शहराबाहेर जंगलात महाराजांवर अंत्यसंस्कार केले गेले. सोसायटी हायस्कूलच्या भोसले नामक एका शिपायाने महाराजांना अग्नी दिला. त्यांच्यानंतर दत्तक म्हणून राजर्षी शाहू महाराज कोल्हापूर गादीवर आले.
![]() |
| राजर्षी शाहू महाराज यांनी इटली मधील फ्लॉरेन्स येथील राजाराम महाराज यांच्या समाधीस २४ जुलै १९०२ रोजी दिलेली भेट... त्याच भेटीचे चित्रकार रावबहाद्दूर धुरंदर यांनी साकारलेले चित्र.. |
कागलच्या मातब्बर अशा घाटगे या सरदार घराण्यातील जयसिंगराव व आनंदीबाई यांच्या पोटी शाहूंचा जन्म झाला. जयसिंगराव कोल्हापूर छत्रपतींचे नातू व जावई होते. कोल्हापूर दरबारात जयसिंगरावांचा विशेष दबदबा होता, चौथ्या शिवाजी राजेंच्या काळात दरबारात मुख्य प्रधान म्हणून जयसिंगराव कारभार पाहत होते. शिवाजीराजेंच्या दुर्दैवी हत्येनंतर जयसिंगरावांनी आपला सुपुत्र यशवंतराव यास करवीर गादीवर बसविण्यासाठी इंग्रज व इतर सरदारांशी संधान साधून यशस्वी डावपेच केले. आपल्या पद आणि प्रतिष्ठेचा सुयोग्य उपयोग करुन जयसिंगरावांनी फक्त आपले घराणेच नाही तर करवीर राज्य आणि परिणामी महाराष्ट्र यशवंत करत आपला सुपुत्र छत्रपती शाहू या नावाने २ एप्रिल १८९४ रोजी छत्रपती गादीवर अभिषिक्त केला.
करवीर घराण्यात अगदी दैवी राज्य करणारा हा राजा पराकोटीचा लोकप्रिय आणि स्वकर्तृत्वाने 'राजर्षी' म्हणून अजरामर झाला. शाहू महाराजांना चार अपत्ये होती पैकी दोन अपत्ये प्रिन्स शिवाजीराजे व आऊबाई हे लहानपणातच वारले.
राजर्षी शाहू महाराजांच्या मृत्युपश्चात त्यांचे सुपुत्र छत्रपती राजाराम द्वितीय हे करवीर छत्रपती गादीवर आले. महाराजांना दोन पत्नी होत्या पैकी थोरल्या ताराराजे यांना अपत्य नसून धाकट्या विजयमालांना प्रिन्सेस पद्माराजे उर्फ बेबीराजे नावाच्या एकुलत्या कन्या होत्या. आपल्या पित्याप्रमाणेच लोककल्याणकारी आणि सुधारणावादी राज्यकारभार करुन राजारामराजे इ.स. १९४० मध्ये परलोकी गेले. त्यांच्यानंतर चावरेकर भोसले घराण्यातील मुलास दत्तक घेऊन छत्रपती शिवाजी पाचवे या नावाने छत्रपती गादीवर बसवले गेले, पण ते अल्पवयीन असतानाच वयाच्या ४ थ्या वर्षी १९४६ साली मयत झाल्याने करवीर छत्रपती गादी रिक्त झाली आणि पुन्हा सुरु झाले गादीसाठी कुटील राजकारणाचे एक सलग डावपेच..!
क्रमशः
#रणमस्तबहाद्दर
#GameofThrones
✍🏻 स्वप्नील महेंद्र जाधवराव.



Comments
Post a Comment