संजीवन गुप्तहेर ०४
संजीवन गुप्तहेर
०४
एका छोट्याशा टेकडीच्या माथ्यावर पोहचल्यावर समोर विस्तीर्ण प्रदेशात पसरलेला आश्रम कचच्या नजरेस पडला. त्या आश्रमाची व्याप्ती पाहून कच अवाक् झाला होता. बाहेरच्या बाजूस युद्ध प्रशिक्षण वर्ग तर आतील बाजूस शास्त्राभ्यास सुरु होता. मद्यपी, मांसाहारी, असंस्कृत आणि वीभत्स असे कच ने मनोमन ठरवलेल्या आश्रमाचे रुप इथे दूरवर कुठेही दिसत नव्हते. 'एका असंस्कृत जमातीला इतके सुसंस्कृत बणवने, त्यांच्यात एकी निर्माण करणे हिच शुक्राचार्यांची सर्वात मोठी उपलब्धी असावी' असा विचार करत तो टेकडी उतरु लागला. कच आश्रमाच्या व्दाराजवळ आला तोच त्याची नजर आश्रमाच्या मधोमध असलेल्या भल्यामोठ्या वृक्षराजाखाली आपल्या शिष्यांमध्ये ध्यानस्थ बसलेल्या एका तेजस्वी पुरुषाकडे गेली. "हेच शुक्राचार्य असणार !" अशी त्याची खात्री पटली आणि तो थेट त्यांच्या दिशेने चाल करु लागला.
आश्रमातील सर्व शिष्य, विविध राक्षस आणि मानव वंशातील राजपुत्र कच कडे विस्मयकारक नजरेने पाहत होते. पहिल्यांदाच त्यांनी एक ऋषीपुत्र या आश्रमात पाहिला होता. कच त्या सर्वांकडे दुर्लक्ष करत शुक्राचार्यांजवळ आला आणि आपल्या मधाळ आवाजात "राक्षसगुरु भृगूनंदन शुक्राचार्य... माझा प्रणाम स्वीकार करावा" असे म्हणत त्याने प्रणाम केला. आपले डोळे उघडत शुक्राचार्यांनी "शुभम् भवतु !" असा आशिर्वाद दिला. "मी बृहस्पती पुत्र कच !" हे कचचे शब्द ऐकताच शुक्राचार्य आपल्या आसनावरुन उठले आणि त्याच्या डोक्यावरुन मायेने हात फिरवत आपल्या हृदयाशी कवटाळू लागले. अकस्मातच दोन आनंदाश्रु शुक्रांच्या तेजस्वी डोळ्यांत डबडबले. आपण आपल्या जिवलग मित्रालाच अनेक वर्षांनी कडाडून मिठी मारतोय असा त्यांना भास झाला. कचला घेऊन शुक्र आपल्या पर्णकुटीत गेले. तेथे त्याचे यथोचित आदरातिथ्य केल्यावर शुक्रांनी त्याला विचारले "बाळ कच, तु इथे कसा ?"
"आचार्य मी आपल्याकडे अध्ययनासाठी आलोय ?" कच नम्रपणे उत्तर देऊ लागला. "माझ्याकडे ? अरे बाळ, पण तुझे पिता तर साक्षात देवगुरू आहेत..?" शुक्रांनी पुढचा प्रश्न विचारला. "मला बाबांनीच आपल्याकडे पाठवले आहे" हे कचचे उत्तर शुक्राचार्यांना भुतकाळात घेऊन गेले "नियतीचा खेळ पहा कच.. काही वर्षांपूर्वी माझे पिता भृगूऋषी जे स्वत: सप्तर्षींपैकी एक, त्रिकालज्ञानी आणि ज्योतिष शास्त्राचे जनक असे परिपूर्ण आचार्य असूनही त्यांनी मला तुझे आजोबा ऋषी अंगीरसांकडे अध्ययनासाठी पाठवले. जिथे संपूर्ण जगत् माझ्या पित्याचे शिष्यत्व मिळवू इच्छित होते तिथे मी दुसऱ्या कुणाचा तरी शिष्य झालो होतो. पण सुदैवाने तिथेच मला तुझा पिता आणि माझा परंमित्र बृहस्पती भेटला.. कदाचित आज त्याच नियतीने मला माझ्या गुरुचे ऋण फेडण्याची संधी दिली असावी... मी तुझा शिष्य म्हणून स्वीकार करतोय कच !" असे शुक्रांचे शब्द ऐकताच कचने त्यांच्या चरणांवर लोटांगण घातले.
कचला बाहेर आपल्या दुसऱ्या शिष्याकडे घेऊन जात शुक्र म्हणाले "सुकर्ण.. हा कच ! तुझा नवा सहपाठी.. याला आपला संपूर्ण आश्रम दाखव व सगळ्यांची ओळख करून दे.. पण कच.. एक लक्षात ठेव.. मी सोबत असेपर्यंत तू आश्रमाच्या बाहेर एक पाऊलही टाकायचे नाही..!" कचला शुक्राचार्यांच्या शब्दांची गंभीरता जाणवत होती. शुक्र तेथून निघून गेले. सुकर्ण कचला पूर्ण आश्रम दाखवू लागला, सर्वांची ओळख करून देऊ लागला. तो देखील कमालीचा मनमिळाऊ आणि बडबड्या होता त्यामुळे दोघांची क्षणात मैत्री झाली. फिरत फिरत दोघे आश्रमाच्या एका कोपऱ्यात गेले. तिथले दृश्य पाहताच कचची नजर खिळून राहिली. सुकर्ण एकटाच बडबडत पुढे निघून गेला पण कचची पाऊले जड झाली होती... कच त्याचे भान हरवून गेला होता.. डोळ्याची पापणीही न लवता तो एकटक तिकडेच बघत होता...
कोपऱ्यातील एका जतीपुष्पाच्या झुडुपावर घुटमळणारे पंचरंगी फुलपाखरू पकडण्यात एक युवती व्यग्र होती. संध्यापुजेसाठी ती साठवत असलेल्या फुलांची दुरडी तिच्या हातून सुटून बाजूला कलंडली होती तरी त्याकडे तिचे लक्ष नव्हते.. अल्लडपणे ते फुलपाखरू पकडण्यात ती सर्व विसरून गेली होती. तीचे मृगनयनी निळशार डोळे पाणीदार होते, अगदी कुणीही त्यात सहजपणे बुडून जाईल इतके... चाफेकळी नाकाच्या तिक्ष्ण दांडीखाली टच्च डाळींबाच्या दाण्याप्रमाणे दिसणारे रक्तवर्णी ओठ फारच मनमोहक दिसत होते. तिचा कमनीय बांधा इतका रेखीव होता की परमात्म्याने एखाद्या निवांत क्षणी प्रफुल्लित अंतःकरणाने तिची रचना केली असावी असा भास होईल. धावपळीत तिच्या जर्द काळ्या केसांचा अंबाडा सुटला आणि केस मोकळे होऊन त्यात माळलेला मालती पुष्पांचा गजरा मातीत मिसळला. पण मघाशी आकर्षक वाटणारे ते दुष्ट केस तो गौरवर्णी मुखडा आता कचच्या नजरेपासून लपवत होते. त्यामुळे कचला त्या केसांचा आता राग येऊ लागला.. हातात व गळ्यात फक्त रुद्राक्षमाला परीधान केलेली ती युवती विविध अलंकाराने भुषित अप्सरेलाही लाजवेल अशी होती. 'हिची रचना करणारा परमात्मा आपल्याच रचनेवर कसा भाळला नाही ? असुरांच्या राज्यात हे सौंदर्याचे दान कुणाच्या पदरी पडले असेल ?' असे विचार करत असतानाच कचला आश्रमात कसलीतरी खळबळ जाणवली. पुढे गेलेला सुकर्ण माघारी येऊन कचला गदगदा हलवत होता....
क्रमशः
रणमस्तबहाद्दर
क्रमशः
रणमस्तबहाद्दर
✍️ स्वप्नील महेंद्र जाधवराव.
भाग ०५ :
https://swapnsutra.blogspot.com/2020/05/blog-post_30.html
https://swapnsutra.blogspot.com/2020/05/blog-post_30.html

भावा पुढच्या भागांची आतुरतेने वाट पाहत आहे ❤
ReplyDeleteलेखक महाशय तरुण युवती देवयानी तर नव्हे ना...??😀😀
ReplyDeleteपुढच्या भागात समजेलच की.. 😜
DeleteComplete kar patkan
ReplyDeleteजसं वाटतं होतं त्याहीपेक्षा वेगळाच भासलेला आश्रम गुरु शुक्राचार्य अन् जुने ऋनानुबंध भारी वाटतात. नेहमीप्रमाणे शेवट उत्साह वाढवणारा आहेच
ReplyDelete