संजीवन गुप्तहेर ०५


संजीवन गुप्तहेर
०५

कचचे मन सुकर्ण कडे असले तरी त्याचे डोळे अजूनही त्याच दृष्याकडे पाहत होती. कचला तेथून आपली नजर हटवणे अशक्यप्राय वाटत होते. ते सौंदर्य आपल्या नजरेतून त्याला सुटू द्यायचे नव्हते. कच आणि सुकर्णची धडपड त्या युवतीच्या कानावर गेली आणि कच सोबत तिची नजरानजर झाली. त्या निळ्या डोळ्यांच्या अथांग सागरात कचचे काळेभोर डोळे अलगद बुडून गेले. दोघांचीही नजर एकमेकांसोबत बांधली गेली इतकी घट्ट.. की दोघांनाही ती काही केल्या सोडवत नव्हती‌.. तेवढ्यात सुकर्ण कचचा दंड पकडून त्याला ओढत आश्रमाकडे नेऊ लागला. एक तिरस्कृत कटाक्ष सुकर्णकडे टाकून कच पुन्हा मागे वळून पाहू लागला.. ती देखील याला वाकून पाहण्याचा प्रयत्न करत होती. 

                आता दोघेही एकमेकांच्या नजरेआड गेले होते. सुकर्णची बडबड अजूनही सुरुच होती, पण कचचे त्याकडे थोडेही लक्ष नव्हते. "अरे कच लवकर चल.. आश्रमात.." त्याला मधेच थांबवत "ते सोड.. सुकर्ण ती कन्या कोण होती ?" असे कच विचारु लागला. "आचार्यांची कन्या.. देवयानी..!" 

               'देवयानी' हा शब्द ऐकताच कचचा तेजोयमान चेहरा काळा ठिक्कर पडला. एखाद्या निस्तेज अंगाराप्रमाणे.. त्याला कशाची तरी आठवण झाली आणि तो काही काळासाठी पुन्हा एकांतात हरवला. कचला पुन्हा भानावर आणत सुकर्ण बोलू लागला "कच.. लवकर आश्रमात चल.. आचार्य संजीवनी विद्येचा प्रयोग करणार आहेत.." "काय संजीवनी विद्येचा प्रयोग ?" कच अक्षरशः उडालाच ! "हो.. आज देवतांशी लढताना एक राक्षसवीर धारातिर्थी पडला होता. आता आचार्य त्याला पुन्हा जिवंत करणार आहेत. फारच कर्तृत्ववान आणि भाग्यवान असणार तो मृत राक्षस.. कारण आचार्य सहजपणे कोणासही पुन:रोज्जीवीत करत नाहीत. त्यामुळे आज हा प्रयोग पाहणे आपल्यासाठी मोठी पर्वणी असणार आहे." सुकर्ण संपूर्ण वृतांत कचला सांगत होता.  

                   दोघेही धावतच आश्रमातील त्या ठिकाणी पोहचले. पण शुक्रांनी संजीवन विद्येचा प्रयोग केल्या जाणाऱ्या कुटीत यायला सर्वांना मज्जाव केला होता. शुक्र संजीवनी विद्येची गुप्तता काटेकोरपणे पाळत होते. दोघांचेही मन खिन्न झाले. संजीवन विद्या या मार्गाने तर मिळणारच नाही हे कचच्या ध्यानात आले होते. दुःखी होऊन कच आपल्या पर्णकुटीत आला. संपुर्ण आश्रमात निरामय शांतता पसरली होती. पण कचच्या अंतःकरणात एक वेगळाच प्रक्षोभ उसळला होता. 'पिताश्री, शुक्राचार्य, देवयानी, संजीवनी विद्या, धर्म, प्रेम' हे सर्व शब्द सागराच्या विक्राळ लाटांनी किनाऱ्यावर धडकून किनारा पोखरत जावा तसे त्याच्या काळजाचे लचके तोडत होते. 'आता हेच आपले प्रारब्ध आहे' हे स्वत:लाच समजवण्याचा तो प्रयत्न करत होता. 

                 सकाळी पुन्हा नदी वरुन पाणी घेऊन येणारी देवयानी त्याला दिसली. तो धावतच तिच्याजवळ गेला आणि तिला मदत करु लागला. काल काही घडलेच नव्हते असा आव आणत कचने बोलण्याचा प्रयत्न केला.
"मी कच.. आचार्यांचा नवा शिष्य.."
"मी देवयानी.. शुक्राचार्यांची कन्या.."
"हो माहितेय !"
"कसे ?" देवयानीने चकित होऊन विचारले.
"अमममम.... काल सुकर्ण सर्वांबद्दल सांगत होता तेव्हा समजले.." कचने वेळ मारुन नेली.
"ठीक आहे." देवयानी सगळं माहीत असूनही मंद हसली.

आता या वरवरच्या भेटी रोजच्याच झाल्या होत्या. कच आपल्या दिनचर्येतून वेळ काढून देवयानीला कामात मदत करु लागला. देवयानी देखील त्याला अभ्यासात मदत करु लागली. कचच्या बोलक्या स्वभावाने त्या दोघांमध्ये मैत्री व्हायला वेळ लागला नाही. दररोज सायंकाळी दोघे कितीतरी वेळ गप्पा मारत बसायचे. दोघांमधील मैत्री कदाचित पुढचं पाऊल घेऊ इच्छित होती.


                   आचार्य, सुकर्ण आणि देवयानी यांच्या सानिध्यात कचचे दिवस आनंदात जात होते पण रात्री वैरीणी बनून त्याला त्रास देत होत्या. कचचे ध्येय त्याला क्षणोक्षणी छळत होते. आचार्यांची कच वर कायम नजर असे. त्याच्या जिवीताला इथे धोका आहे हे ते ओळखून होते. पण त्याहूनही करडी नजर ठेवणारे अनेक लोक कचच्या आजुबाजूला घुटमळत होते. देवगुरुंचा पुत्र अनेक राक्षसांच्या डोळ्यात खुपत होता. कचला देखील या गोष्टी आता ध्यानात येत होत्या. पण या सर्वांकडे दुर्लक्ष करत कच आपले इप्सित साध्य करण्यासाठी काय करता येईल याच विचार गुंतलेला असे.
 
                एके दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे आश्रमातील कामांची विभागणी करण्यात आली. कच दररोज आवर्जून वृक्ष संगोपनाचे कार्य घेत असे. कारण यामुळे त्याला जास्तीत जास्त वेळ देवयानी सोबत घालवता येई. सुकर्णकडे गाई चरायल्या न्यायचे कार्य होते. आज कार्याची अदलाबदल करु असा प्रस्ताव त्याने सुकर्ण समोर मांडला. सुकर्णने त्याला नकार दिला. "कच.. एक लक्षात ठेव.. मी सोबत असेपर्यंत तू आश्रमाच्या बाहेर एक पाऊलही टाकायचे नाही..!" हे आचार्यांचे शब्द सुकर्णच्या कानी आजही घुमत होते. कचने आर्जव करुन सुकर्णला तयार केले आणि कोणाला समजायच्या आत गाई घेऊन अरण्यात निघून गेला. सुकर्ण कडून हि बातमी देवयानी पर्यंत पोहोचली. ती देखील चिंतातुर झाली. 

                गाई निबीड अरण्यात घुसू लागल्या. तसे "जीव सांभाळ कच..! तू जर मेलास तर आचार्य तुला जिवंत करणार नाहीत. तू त्यांच्या आज्ञेचे उल्लंघन केले आहेस.." असे अनिष्ट विचार कचच्या मनात येऊ लागले. कच चहू दिशांना नजर ठेवून होता. तेवढ्यात 'सूं SSS' करत एक बाण समोरुन आला आणि 'रप्प..' करुन कचच्या हृदयात घुसला. एक गरम रक्ताची उबळ त्याच्या तोंडातून बाहेर पडली आणि तो जमिनीवर कोसळला... सर्व जीव एकवटून त्याने डोळे उघडायचा प्रयत्न केला आणि हृदयाजवळून उचललेल्या हाताकडे पाहिले तर तो पुर्णपणे रक्ताने माखलेला होता. बोटांवरुन रक्त ठिबकत होते. ग्लानी आलेल्या डोळ्यांनी कचला समोर दिसत होता तो फक्त काळ...!

क्रमशः
रणमस्तबहाद्दर

                                  ✍️ स्वप्नील महेंद्र जाधवराव.



भाग ०६ :
https://swapnsutra.blogspot.com/2020/06/blog-post.html


सुरुवाती पासून वाचण्यासाठी :
https://swapnsutra.blogspot.com/?m=1

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

हैबतबाबा पवार आरफळकर

शेखमिरा संस्थान

गावकुसावरील देवता