संजीवन गुप्तहेर ०६

संजीवन गुप्तहेर

०६ 


एक भयानक हास्य कचच्या कानावर पडत होते. असह्य वेदनांनी कच विव्हळत होता. अचानक एक जोरदार लाथ कचच्या हृदयाजवळ बसली. "आ...." अशा मोठ्या किंकाळीसह त्याचे डोळे खाडकन उघडले गेले. तो चारही बाजूंनी राक्षसांनी घेरला गेला होता. त्यातील एकाने कचचे बाहू पकडून त्याला उभे केले तेवढ्यात रक्ताच्या चिळकांडी सोबत एक खड्ग कचच्या पोटातून आरपार गेले. पुन्हा एक रक्ताची उष्ण उबळ त्याच्या तोंडून बाहेर पडली. काही कळायच्या आतच असंख्य खड्ग त्याचे शरीर पुन्हा पुन्हा क्रुरपणे भेदू लागले. त्या निर्दयी हास्यासोबत कच गतप्राण झाला.

               जसे सुर्य मावळून अंधाराचे सावट दाटू लागले तसे सुकर्ण आणि देवयानी यांच्या हृदयाची धडधड वाढू लागली. कच सोबत नक्कीच काहीतरी बरे वाईट घडले असणार या विचाराने दोघांनी आचार्यांकडे धाव घेतली. आचार्यांचा चेहरा लालबुंद झाला. त्यांना आपल्या आज्ञेची अवहेलना कदापि सहन होत नसे. त्यातच त्यांना कच कडून अशी अपेक्षा नव्हती. तरीही त्यांनी आश्रमातील शिष्यांना कचचा शोध घेण्याची आज्ञा केली. अथक प्रयत्नानंतर मध्यरात्री कचचा मृतदेह काही विद्यार्थ्यांना सापडला. तो तातडीने आश्रमात आणला गेला. देवयानीवर अक्षरशः आभाळ कोसळले होते. तीच्या निळशार डोळ्यांमधील समुद्र कडांचा बांध तोडून ओसंडून वाहत होता. तीने शुक्राचार्यांकडे संजीवनी विद्येच्या प्रयोगाची मागणी केली. त्यावर शुक्राचार्य फार भडकले "देवयानी.. संजीवनी विद्या मी बालहट्ट पुर्ण करण्यासाठी मिळवली नाही. कचने गुरु आज्ञेचे उल्लंघन केले आहे. 'आश्रमाबाहेर त्याच्या जिवीतास धोका आहे' याची कल्पना मी कचला दिली होती आणि तरी देखील.." आचार्यांची उद्वीगणता सर्वांच्या लक्षात येत होती. पण देवयानी काही ऐकायला तयार नव्हती. शुक्राचार्यांच्या आयुष्यातील देवयानी हा सर्वात नाजूक धागा आहे हे संपुर्ण ब्रम्हांडाला ज्ञात होते. शेवटी शुक्राचार्यांना संजीवनी विद्येचा प्रयोग करण्यासाठी देवयानीने तयार केलेच.

                 " ...... स्वाह:" अशा मंत्राच्या शेवटच्या अक्षरासह कचने ताडकन डोळे उघडले. त्याला समोर फक्त शुक्राचार्य दिसत होते. आपला पुनर्जन्म झालाय हे कचच्या ध्यानात आले, तसे त्याने उठून आचार्यांना पदस्पर्श केला. कच आचार्यांची माफी मागू लागला पण ते फक्त कचच्या डोक्यावर हात ठेवून "बाळ.. पुन्हा असे करु नकोस.." असे बोलून त्या पर्णकुटीतून बाहेर निघून गेले. कच खजील झाला होता. बाहेर जाऊन त्याने देवयानीचे आभार मानले.
"तुझे हे उपकार मी कधीच विसरू शकणार नाही.. देवयानी.."
"अरे उपकार कसले ? सखी म्हणतोस ना तु मला..मग हे माझे कर्तव्य होते.." देवयानीचे दुःखाश्रु आता आनंदाश्रुंमध्ये परावर्तित झाले होते.

               कचचे जीवन आता पुर्वपदावर आले होते. आश्रमातील लोक वाईट स्वप्नवत असणारी ती दुःखद घटना विसरुन देखील गेले होते. पण आचार्यांची दररोजची ती नजर कचला बोचत होती. त्या नजरेत त्याला त्याच्या बद्दलचा अविश्वास दिसत होता. त्या अविश्वासाचे विश्वासात परिवर्तन करण्यासाठी तो जिवाचे रान करत होता. आणि आता तो हळूहळू यात यशस्वी होऊ लागला होता. कच मन लावून सर्व विद्यांचा आभ्यास करु लागला. कचचे परिश्रम पाहून आचार्य देखील पाघळले. पाहता पाहता कच आचार्यांचा पट्टशिष्य झाला.

               इकडे त्याच्या प्रेमाचा गुलमोहर देखील उत्तरोत्तर फुलतच होता. कच आणि देवयानी यांच्या भावना मैत्रीची पायरी ओलांडून कधी पुढे गेल्या ते त्यांना देखील समजले नाही. त्यांची मनं आता एकमेकांत गुंतत होती. तशी तर ती त्या पहिल्याच भेटीत गुंतली होती पण मैत्री या सोज्वळ नावाखाली दोघेही आपल्या भावना मनात दाबायचा अयशस्वी प्रयत्न करत होते. दोघेही आपल्या प्रेमाची कबुली द्यायला तयार नव्हते. प्रेमाच्या बाबतीत कचच्या मनात एक उद्विग्नता होती आणि तीच ओळखून देवयानीनेही आजवर आपले प्रेम व्यक्त केले नव्हते.


                 एक एक करत कचने सर्व विद्या आत्मसात केल्या. शास्त्र आणि शस्त्र या दोन्ही मध्ये तो इतर शिष्यांहून अधिक पारंगत झाला. आपल्या सिद्धींनी तो आचार्यांनाही अनेकदा संभ्रमित करत असे. त्याची प्रत्येक उपलब्धी त्याला स्वर्गसुख देत होती. आपण परिपुर्णतेकडे वाटचाल करतोय अशी त्याची भावना बळकट होत होती. पण अजूनही ती रात्रीची झोप त्याला कवेत घ्यायला तयार नव्हती. त्याचे ते ध्येय, ती कामगिरी त्याच्या मनमेंदूला एखाद्या महिषा प्रमाणे धडका देत होती. आपले शिक्षण पूर्ण होत आले आहे आता संजीवनी विद्येसाठी आपल्याला शिघ्र अती शिघ्र प्रयत्न करायला हवेत असे त्याला वाटत होते. अशाच एका काळरात्री देवगुरु पुत्राच्या मनात एका असूरी विचाराने उसंडी मारली.

                एकदा झालेली चूक पुन्हा मुद्दामहून करण्याचा त्याचा मानस होता. आपण आचार्यांचे पट्टशिष्य बनलोय त्यामुळे आता ते नकार देणार नाहीत. आणि त्यांनी नकार दिलाच देवयानी आपल्याला नक्कीच वाचवेल यावर त्याचा भलताच विश्वास होता. थोडक्यात तो आपल्या प्रेमाचा आपल्या ध्येयासाठी पुरेपूर वापर करु इच्छित होता. आचार्य जेव्हा आपल्याला पुनःरोज्जीवीत करतील तेव्हा आपल्या जवळच्या सिद्धीचा वापर करून आपण मृत असल्याचा आभास निर्माण करु‌न आचार्यांना पुनश्च विद्येचा प्रयोग करायला भाग पाडू आणि तेव्हाच ती विद्या शिकून घेऊ अशी ढोबळ योजना त्याने आखली.

                    वर्षातून फक्त एकदाच उगवणारे वसंतमुखीचे फुल देवयानीला फार आवडायचे. हलक्या फिकट रंगाच्या कोमल पाकळ्या, त्यातील नाजूक परागकण आणि त्याचा सुगंध...‌ आ हा हा हा.. कोणालाही मोहित करेल अशी मोहिनीच जणू... हेच वसंतमुखीचे पुष्प निबीड अरण्यातून आणून देण्याचा वचन त्याने देवयानीला दिले होते. देवयानीने त्याला विरोध केला खरा पण कचने नेहमीप्रमाणे आपल्या मधाळ शब्दांनी तिला तयार केले‌.

                  पण या सर्व गडबडीत कचने आपल्या शत्रूंची मानसिकता लक्षातच घेतली नव्हती, आणि हिच गोष्ट आता त्याच्या सर्वनाशास कारणीभूत ठरताना त्याला दिसत होती. दोन्ही हात आणि पाय विलग झालेले आपल्या देहाचे अर्धमेले धुड अग्नीच्या भक्षस्थानी पडलेले तो अनुभवत होता. तो भडकलेला अग्नी त्याचा देह गिळंकृत करत होता...


क्रमशः
रणमस्तबहाद्दर

                                         ✍️ स्वप्नील महेंद्र जाधवराव.


भाग ०७ :
https://swapnsutra.blogspot.com/2020/06/blog-post_5.html


सुरुवाती पासून वाचण्यासाठी :
https://swapnsutra.blogspot.com/?m=1

Comments

  1. प्रवाही.. प्रभावो..उत्सुकता वाढत आहे
    👍👍👍

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

हैबतबाबा पवार आरफळकर

शेखमिरा संस्थान

गावकुसावरील देवता